आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुडानकुलम प्रकल्प: आंदोलकांसोबत झालेली बोलणी ठरली निष्फळ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुनवेल्ली: तामिळनाडूतील कुडानकुलम अणुप्रकल्पाबाबत पंतप्रधान नियुक्त 15 सदस्यीय समिती आणि प्रकल्पविरोधी समितीमध्ये शुक्रवारी झालेली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपुष्टात आली. सरकारी समितीने आमचे म्हणणे विचारात घेतले नाही, असे आंदोलकांनी बैठकीनंतर सांगितले.
आम्हाला फसवले जात असून सरकार आमच्या मुद्द्यांवर गंभीर नाही, असे बैठकीत सहभागी झालेल्या एका आंदोलकाने सांगितले. राज्य आणि केंद्रीय समितीमध्ये या मुद्द्यावर दुसºयांदा बैठक झाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्राची 15 सदस्यीय समिती स्थापन केली असून समितीने या महिन्याच्या सुरुवातीला प्रकल्पस्थळाला भेट दिली होती. राज्याच्या समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे निराकरण करण्याचे मुख्य आव्हान केंद्रीय समितीकडे आहे. चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर केंद्रीय समितीने अणुऊर्जा प्रकल्पस्थळाला भेट दिली होती. समितीने घेतलेल्या सुरक्षात्मक आढाव्यामध्ये अणुप्रकल्प सुरक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, आंदोलकांचे त्यावर समाधान झाले नाही. बैठकीत सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली जातील, असे आश्वासन बैठकीपूर्वी दिले होते.

आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

लोकांच्या मनातील भीती दूर करण्यात तसेच गेल्या बैठकीत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर समितीकडून योग्य खुलासा झाला नसल्याचा आरोप आंदोलकांचे नेते पुष्यरायन यांनी केला. पुरेशी कागदपत्रे देण्याऐवजी त्यांनी केवळ 38 पानी अहवाल सोपवला. त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार पुष्यरायन यांनी व्यक्त केला. 13,600 कोटींच्या या प्रकल्पातील पहिले युनिट डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.
किरणोत्सर्गाबाबत अनेक गैरसमज
सुरक्षा, किरणोत्सर्ग, कर्करोगाचा धोका, आण्विक धोक्याची भीती आदी विषयांवर सादरीकरण करण्याची आम्ही तयारी केली होती. मात्र, आंदोलकांनी आम्ही तुमचे व्याख्यान ऐकायला आलो नसल्याचे सांगतले. त्यांनी अहवाल घेतला आणि बैठकीतून बाहेर पडले, असे पर्यावरणतज्ज्ञ व केंद्रीय समितीतील सदस्य मुथुनायागम यांनी सांगितले. किरणोत्सर्गाबाबत अनेक गैरसमज आहेत. कल्पकम आणि अन्य ठिकाणी त्यावर संशोधन झाले आहे. त्यामुळे किरणोत्सर्गाची अकारण भीती बाळगण्याचे कारण नाही, असे समिती सदस्य व्ही. शांथा यांनी सांगितले.