आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल मिळते 3 ते 18 रुपये लिटर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका रात्रीत लिटरमागे साडेसात रुपयांची वाढ करीत भारत सरकारने सर्वसामान्यांचे बजेट भुईसपाट करून टाकले. जगभर पेट्रोल दरवाढ झाल्याचा युक्तिवाद केंद्र सरकार करीत आहे. काही प्रमाणात हे खरे मानले तरी जनतेला स्वस्त पेट्रोल देणारे अनेक देश आहेत. परवडणा-या दरात पेट्रोल देता यावे यासाठी सबसिडीचा बोजा ती सरकारे आनंदाने सहन करतात. ब्रिटनमधील स्टॅव्हली हेड या इन्शुरन्स कंपनीने स्वस्त पेट्रोल असणा-या दहा देशांची यादी जाहीर केली आहे. (56 रुपयांना एक डॉलर गृहीत धरून ही किंमत काढण्यात आली आहे.)

बहारिन - 11 रुपये 76 पैसे
मध्यपूर्वेतील बहारिनकडे शेजारी देशांच्या तुलनेत तेल साठे कमी आहेत. राजे हमद यांच्या राजवटीने पर्यटन आणि रिटेल यातून अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. अरब जगतातील सर्वात वेगाने वाढणा-या या अर्थव्यवस्थेत हमद यांचे सरकार असेपर्यंत सबसिडीच्या जोरावर बहारिनच्या नागरिकांना स्वस्तात पेट्रोल मिळत राहील.
कतार - 13 रुपये 44 पैसे
द्रवरूप नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा निर्यातदार देश अशी ओळख असलेल्या कतारचे जीडीपी जगात दुस-या क्रमांकाचे आहे. तेल आणि वायूतून मिळणारे उत्पन्न हे त्या देशाच्या जीडीपीचा निम्मा हिस्सा आहे. कतारमध्ये 2000 सालापासून पेट्रोलच्या वापरात तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. येथेही सरकारने सबसिडीच्या जोरावर पेट्रोलच्या किमती आटोक्यात आहेत.
इजिप्त - 16 रुपये 80 पैसे
स्वत:ला पुरतील एवढे तेलसाठे असलेला इजिप्त हा आफ्रिका खंडातील सर्वाधिक तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेला देश आहे. सुएझ कालव्यातून होणारी तेलवाहतूक हा अखंड उत्पन्नाचा स्त्रोत इजिप्तजवळ आहे. आपल्या गरजेपुरते इंधन देणारे तेलसाठे आहेत. त्यात आता नैसर्गिक वायूचे नवे साठे सापडल्याने देशाच्या उत्पन्नात भर पडत आहे. तेथे सबसिडीचा आधारे स्वस्त पेट्रोल तेथे दिले जाते.
ओमान - 17 रुपये 92 पैसे
ओमानने 2007 पासून तेल उत्पादनात 20 टक्क्यांची वाढ केली आहे. आशियातील देशांना ओमान तेल पुरवठा करतो. तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीचा जीडीपीमधील वाटा 47 टक्के एवढा आहे. तेल उत्पादनाशिवाय कृषी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि उच्च शिक्षण या क्षेत्रांत ओमानने मोठी गुंतवणूक केली आहे. येथेही सबसिडीच्या आधारे सरकारने स्वस्त पेट्रोल उपलब्ध करून दिले आहे.
अल्जीरिया - 17 रुपये 92 पैसे
लिबीया आणि नायजेरियानंतर सर्वात मोठे तेलसाठे असलेला अल्जीरिया हा आफ्रिकी देश आहे. येथील पेट्रोलचा दर्जा आणि तुलनेने कमी असलेले गंधकाचे प्रमाण यामुळे युरोपातील अनेक देश पेट्रोलसाठी अल्जिरियावर अवलंबून आहेत. तेल कंपन्यांवर सरकारचे पूर्णपणे नियंत्रण आहे. त्यामुळे सरकार पेट्रोलियम पदार्थांच्या आयात आणि निर्यातीवर लक्ष ठेवून असते. अल्जिरियाच्या उत्पन्नाचा 60 टक्के हिस्सा तेलाच्या माध्यमातून येतो.

व्हेनेझुएला 2 रुपये 80 पैसे
दक्षिण अमेरिकेतील पेट्रोल उत्पादक देश. एकूण राष्टÑीय उत्पन्नाचा 80 टक्के भाग पेट्रोल आयातीतून मिळणा-या कमाईचा. 1989 मध्ये सरकारने दरवाढीचा प्रयत्न केला तेव्हा दंगली उसळल्या. शेकडो लोक मरण पावले. यंदा आॅक्टोबर महिन्यात तेथे निवडणुका होत असल्याने तोपर्यंत तरी दरवाढ होणार नाही.

सौदी अरेबिया : 7 रुपये 28 पैसे
जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार. सौदीवर जगाला पेट्रोल पुरवण्याची सर्वाधिक जबाबदारी आहे. हे उत्पन्न डोळे फिरवणारे आहे. तेलसाठ्यांच्या बाबतीत केवळ व्हेनेझुएलाच सौदीला मागे टाकू शकतो. पण तेथील राजवट हा मोठा अडथळा आहे. पेट्रोलसाठी जग वाटेल तेव ढे पैसे देत असताना सौदीत नागरिकांना स्वस्तात पेट्रोल मिळते.

लिबिया : 7 रुपये 56 पैसे
तेलसंपन्न लिबियातून तेल मिळणे सुरु झाले की जगाचे तेल संकट ब-याच प्रमाणात कमी होईल. गद्दाफींची राजवट उलथवून टाकताना झालेल्या रणसंग्रामादरम्यान तेल खाणी आणि रिफायनरीजचे मोठे नुकसान झाले. अनेक प्रकल्प बंद आहेत. ते सुरु झाल्यास अनेक देश सुटकेचा नि:श्वास सोडतील. निर्यात ठप्प असली तरी तेथील जनतेला स्वस्तात पेट्रोल मिळते.

तुर्कमेनिस्तान : 10 रुपये 64 पैसे
मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानात गुर्बांगली बेर्दीमुखामेदोव यांची राजवट आहे. जनतेला 2030 पर्यंत स्वस्तात पेट्रोल देण्याचे वचन त्यांनी दिले. आज 10 रुपये 64 पैसे प्रतिलिटर पेट्रोल मिळते. तज्ज्ञांच्या मते या देशातील साठे फार काळ तेल देऊ शकणार नाहीत. त्यामुळे स्वस्त पेट्रोलची चंगळ किती काळ चालेल सांगता येत नाही.

कुवैत 12 रुपये 32 पैसे
कुवैतची अर्थव्यवस्था तेलावर चालते. 2020 सालापर्यंत दिवसाला 40 लाख बॅरल तेलाचा उपसा करण्याचे लक्ष्य ठेवणारा कुवैत पेट्रोलियम पदार्थांवर वर्षाला दरडोई 2800 डॉलर्स सबसिडीवर खर्च करतो. पेट्रोलियम पदार्थांवर दिली जाणारी ही सर्वाधिक सबसिडी आहे. या सबसिडीमुळे येथील नागरिकांना पेट्रोल एवढ्या कमी दरात मिळू शकते.