आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे गणित - मोदी-केशुभाई वाद अभ्यासक्रमातही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातच्या राजकारणात पुन्हा एकदा आजी - माजी मुख्यमंत्र्यांचा वाद शिगेला पोहोचला असून शैक्षणिक वर्तुळातही त्याचे पडसाद उमटत आहेत. बारावीच्या अभ्यासक्रमात विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या पदाचा उल्लेख देण्यात आलेले गणिताचे उदाहरण वादात सापडले आहे. या प्रकाराबद्दल केशुभाई समर्थक व राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात नाराजीचे सूर उमटत आहेत.
गेल्या दीड दशकांपासून गुजरातची सत्ता नरेंद्र मोदी आणि केशुभाई पटेल या दोन नेत्यांभोवती केंद्रित आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोघांचा प्रभाव 12 वीच्या अभ्यासक्रमावरही पडला आहे. 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना गणित विषयात आजी आणि माजीमधील संबंध दर्शवण्यासाठी मोदी आणि केशुभाईंचा दाखला देण्यात आला आहे. गणिताच्या पुस्तकातील हा पहिलाच धडा असून यात मोदी आणि केशुभाईंच्या नावाचा त्यांच्या पदासह उल्लेख करण्यात आला आहे. गणिताचा पहिला धडा संबंध दर्शवणारा आहे. यात विद्यार्थ्यांना वारसदार आणि पूर्वजांमधील संबंध समजावून सांगताना केशुभाईंना सत्तेवरून काढून नरेंद्र मोदी मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे मोदी हे केशुभाईंचे वारसदार झाले, तर केशुभाई हे मोदींचे पूर्वज झाले, असे उदाहरण देण्यात आले आहे.
विद्यार्थी पूर्वग्रहदूषित होतील: गुजरात पाठ्यपुस्तक मंडळातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अहमदाबादेतील दिवाण बल्लूभाई स्कूलचे प्राचार्य यांनी सांगितले की, खरे तर अभ्यासक्रमात अशा प्रकारचा उल्लेख करण्यामागे राजकारण्यांचा कोणताही हेतू नसेल. पाठ्यपुस्तके तयार करताना जबाबदार लोकांनी सतर्क राहायला हवे होते. अशा प्रकारे राजकीय उदाहरण दिल्याने विद्यार्थी पूर्वग्रहदूषित होतील.
आधीच तयार होती पुस्तके - यासंबंधी गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाचे कार्यकारी नियामक एच. के. पटेल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मी पदावर येण्याआधीच पुस्तके छापण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये राजकारण्यांचा उल्लेख करणे योग्य आहे की नाही यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
केशुभाई समर्थकांची नाराजी - दरम्यान, या प्रकारबद्दल माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत पटेल यांनी मोदींविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मेळावे व जाहीर सभांमधून केशुभाई मोदंीवर टीका करत आहेत.अभ्यासक्रमातील या नव्या वादाने केशुभार्इंच्या समर्थकांना नवा विषय मिळाला आहे. या प्रकारामागे मोदींप्रेमी शिक्षतज्ज्ञांचा हात असावा, अशी शंका त्यांना येत आहे. हे उदाहरण अभ्यासक्रमातून वगळावे, यासाठीही पटेल गटातून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.