आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On 10 Ruppes Of Recharge 9 Hr Nonstop Electricity

10 रुपयांच्या रिचार्जवर गावात 9 तास अखंड वीज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील टोडरसिंह मंडल गाव. परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांप्रमाणेच या गावावरही अंधाराचे साम्राज्य. मोबाइल चार्ज करण्यासाठी लोक दुस-या गावी जात. एक मोबाइल चार्ज करण्यासाठी पाच रुपये मोजावे लागत. पण अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने ही परिस्थिती बदलली. या मुलाच्या प्रयत्नाने गावक-यांची अंधारलेली घरे उजळली, तीही अगदी स्वस्तात.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग करणारा जयपूरचा यशराज खेतान हा तरुण महाविद्यालयाच्या प्रकल्पाच्या निमित्ताने टोडारसिंह मंडल गावात पोहोचला. सायंकाळी गावातील घराघरातून रॉकेलचे दिवे झगमगले अन् समजले की, गावात वीज पोहोचलेलीच नाही. अनेक सरकारे आली अन् गेली, आश्वासनांचे पूर आले अन् ओसरले; पण गावात वीज आली नाही. विजेअभावी गावातील मुलांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान व ठप्प झालेला विकास पाहून यशराजने गावात वीज आणण्याचा निर्धार केला.
आपले हे ध्येय साध्य करण्यासाठी यशराजने अमेरिकेतून एक उपकरण आणले. यशराजला या प्रकल्पात मदत करण्यासाठी अमेरिकेतून त्याचा मित्र जेकब डिकेन्सन हाही भारतात आला. दोघा मित्रांनी मिळून टोडरसिंह मंडल गावात वीजनिर्मिती व वितरण प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेवर आधारित या प्रकल्पातून गावातील 20 कुटुंबांना वीजपुरवठा सुरू झाला. अंधारलेल्या घरात विजेचा प्रकाश पोहोचताच ग्रामस्थांचे चेहरेही उजळून निघाले. मोठमोठे राजकारणी गेल्या अनेक वर्षांत जे करू शकले नाहीत ते या मुलांनी काही दिवसांत करून दाखवल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ग्राम पॉवर यंत्राला दोन केव्ही क्षमतेचे सोलर पॅनल जोडण्यात आले. इन्व्हर्टरप्रमाणे यात वीज साठवली जाते. गोळा झालेली वीज बॅटरीच्या माध्यमातून वितरित होते. वीज घेण्यासाठी प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मोबाइलच्या रिचार्जप्रमाणे विजेसाठी ग्रामस्थांना गावात उभारलेल्या रिचार्ज सेंटरमधून रिचार्ज कूपन घ्यावे लागते. 10 रुपयांच्या रिचार्ज व्हाऊचरवर 9 तास अखंड वीज मिळते. नागरिकांच्या घरात बसवलेले हे स्मार्ट मीटर वायरलेस उपकरणाशी जोडलेले असल्यामुळे वीज चोरी होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.
संयंत्राची वैशिष्ट्ये- सौर ऊर्जा, बायोगॅस प्रकल्प किंवा वीज वितरणाच्या ग्रीडशी हे उपकरण जोडता येते. यापैकी कोणत्याही माध्यमातून संयंत्रात साठवलेली वीज गरजेनुसार वापरता येते. गुगल इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष एरिक ब्रेवर यांनी तयार केलेल्या या उपकरणाची अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने गेल्या वर्षी सर्वोत्तम दहा संशोधन प्रकल्पांमध्ये निवड केली होती.