आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Singles Out Us based Ngos For Idle Kudankulam

कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पात एनजीओंचाच खोडा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताच्या विकासात अणुऊर्जेची महत्त्वाची भूमिका असून अमेरिकास्थित काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पात अडथळे निर्माण करीत असल्याचा थेट आरोप पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या या विधानामुळे सरकार आणि एनजीओमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
फुकुशिमा आण्विक दुर्घटनेनंतरही भारताला अणुऊर्जेची गरज वाटते काय, असे विचारले असता पंतप्रधान होय म्हणाले. भारताच्या संबंधात म्हणाल तर भारतीय लोकसंख्येपैकी विचार करणारे लोक अणुऊर्जेबाबत सकारात्मक आहेत. काही एनजीओंना भारताच्या ऊर्जेची वाढती गरजच माहीत नाही. या एनजीओंमुळेच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यापैकी बहुतांश एनजीओ अमेरिकेच्या आहेत, असे मला वाटते. भारताच्या वीजनिर्मितीमध्ये वाढ होण्याची गरज आहे हे लक्षात घ्यायलाच त्या तयार नाहीत. परिणामी 1000 मेगावॅट वीजनिर्मितीच्या दोन रिअ‍ॅक्टरच्या कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे काम केवळ अशा विरोधामुळेच ठप्प झाले आहे, असे पंतप्रधानांनी ‘सायन्स’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
बीटी वांग्यावर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीबाबत विचारले असता पंतप्रधान म्हणाले की, जैवतंत्रज्ञाला भरपूर वाव आहे. काळाची पावले ओळखून भारतानेही शेतमालाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी औत्पत्तिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करायलाच हवा. पण त्याबाबत वाद आहेत. अमेरिका आणि पाश्चात्त्य राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर निधी घेत असलेल्या एनजीओंना भारताच्या विकासातील आव्हानेच माहीत नाहीत, परंतु आम्ही लोकशाही राष्ट्र आहोत, आम्ही चीनसारखे नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
विज्ञान संशोधनात चीनने भारताला मागे टाकले आहे, असे निरीक्षण स्वत: डॉ. सिंग यांनीच नोंदवले होते. त्याबाबत विचारले असता पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही राष्ट्रे विकासाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे एकमेकांशी स्पर्धा करतानाच आम्हाला सहकार्यही करावे लागणार आहे. 1960 मध्ये जी समस्या होती, ती आता राहिलेली नाही, चीनबरोबर द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याचे मार्ग आम्ही शोधत आहोत.
जनआंदोलनाने फेटाळला आरोप - कुडानकुलम अणुप्रकल्पविरोधी आंदोलनात परदेशी निधी घेणा-या एनजीओंचा हात असल्याचा पंतप्रधानांचा आरोप अणुऊर्जाविरोधी जनआंदोलनाने (पीएमएएनई) फेटाळून लावला आहे. पंतप्रधानांचा हा आरोप ‘बिनबुडाचा’ असल्याचे या जनआंदोलनाने म्हटले आहे. पंतप्रधानांनी कोणताही कागदोपत्री पुरावा न देता हा आरोप केला आहे. कुडानकुलम प्रकल्पविरोधी आंदोलनाला परदेशातून पैशांची रसद पुरवण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आम्ही फेटाळून लावतो, असे पीएमएएनईचे समन्वयक एस.पी. उदयकुमार यांनी म्हटले आहे. आरोपाच्या समर्थनार्थ पंतप्रधानांनी कागदोपत्री पुरावा द्यावा किंवा आपले विधान मागे घ्यावे. पंतप्रधानांना प्रकल्पाला असलेला लोकांचा विरोध कळलाच नाही, असे उदयकुमार म्हणाले.
वस्तुस्थिती जाहीर करा - कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाबाबत पंतप्रधानांनी केलेले विधान अत्यंत महत्त्वाचे असून त्याची वस्तुस्थिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. पंतप्रधानांनी महत्त्वाचे विधान केले आहे. देशातील लोकांना काय खरे, काय खोटे हे कळण्यासाठी त्यामागील वस्तुस्थिती जाहीर झाली पाहिजे. -अरुण जेटली, भाजप नेते
एकटे पाडण्याचा प्रयत्न - कुडानकुलमच्या स्थानिक जनतेमध्ये काम करणा-या क्रियाशील एनजीओंना एकटे पाडण्याचा प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत. -जी. राजा. भाकप नेते
रासुकाखाली अटक करा - पंतप्रधानांनी तत्काळ पावले उचलावीत आणि कुडानकुलम प्रकल्पाला विरोध करणा-या आंदोलकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी. - सुब्रह्मण्यम स्वामी, जनता पार्टीचे नेते.
तीन एनजीओंनी वळवला निधी कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाचा सगळा ठपका पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एनजीओंवर ठेवला असतानाच त्यांच्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ केंद्रीय मंत्री व्ही. नारायणसामी यांनी तीन एनजीओंनी अणुऊर्जा प्रकल्पविरोधी मोहिमेसाठी परदेशी निधी वळवल्याचा सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. सामाजिक कार्यासाठी देण्यात आलेला निधी कुडानकुलममधील अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलन भडकावण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे गृहमंत्रालयाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर कुडानकुलम परिसरातील तीन एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आले असल्याचे नारायणसामी यांनी सांगितले. या एनजीओंना शारीरिकदृष्ट्या अपंगांना मदत आणि कुष्ठरोग निर्मूलन यासारख्या सामाजिक कार्यासाठी परदेशातून निधी मिळत होता, परंतु या एनजीओ प्रचंड मोठा निधी अणुप्रकल्पविरोधी आंदोलनाला खतपाणी घालण्यासाठी वापरताना आढळून आल्या आहेत. त्यानंतरच सरकारने कारवाई केल्याचे नारायणसामी म्हणाले. नारायणसामी हे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आहेत. प्रकल्पस्थळी जे लोक आंदोलन करीत आहेत, त्यांचे हे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. विविध खेड्यांतील लोकांना ट्रकमध्ये भरून आणले जात आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. ज्या कारणासाठी निधी दिला जातो त्या कारणासाठी त्याचा वापर न करता अन्य कामासाठी निधी वळवून तीन एनजीओंनी एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केले आहे. अणुप्रकल्पविरोधी मोहिमेबाबत पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाने केलेल्या चौकशीनंतरच निरीक्षण नोंदवलेले आहे.
कुडानकुलम काम दोन आठवड्यांत सुरू होणार- पंतप्रधानांची राशियात घोषणा