आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रपती निवडणूकः प्रादेशिक पक्षांवरच सर्वांची मदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सामाईक हिताच्या मुद्यांवर विविध प्रादेशिक पक्षांनी नुकत्याच केलेल्या शक्तीप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आगामी राष्टपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला सर्व सहमतीने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा उत्तराधिकारी निश्चित करण्यात अपयश आले तर याबाबतचा निर्णय शेवटच्या क्षणीच होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती भवनात कोणाला पाठवायचे याबाबत सर्वसहमतीसाठी उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत ‘आदान- प्रदाना’च्या फॉर्म्युल्याची शक्यताही नाकारता येत नाही. कॉंग्रेस आणि भाजपप्रणित आघाड्यांकडे स्वत:चे बहुमत नसल्यामुळे त्यांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्या आघाड्यांच्या बाहेरील राजकीय पक्षांची मदत घेणे क्रमप्राप्त होणार आहे. कॉंग्रेसकडे एकूण 31 टक्के तर भाजपकडे 24 टक्के मते आहेत. सध्या संयुक्त पुरोगामी आघाडीकडे 40 टक्के मते आहेत. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांच्याकडे 57 टक्के मते होती. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सुमारे 30 टक्के मते आहेत. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी विविध नावांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस, सप, बसप आणि बिजू जनता दलाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मागच्या वेळी डाव्या पक्षांनी प्रतिभा पाटील यांचे नाव सूचवले होते. त्यामुळे त्या सहजगत्या निवडूनही आल्या होत्या.

निवडणूक राष्ट्रपतींची
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चार महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना अद्याप संभाव्य उमेदवार म्हणून एकही नाव पुढे येऊ शकलेले नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेच नाव काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते, मात्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच ही शक्यता फेटाळून लावली आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचेही नाव घेतले जात आहे. मात्र सध्या केंद्र सरकारला एका पाठोपाठ एक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्या अडचणी सोडवण्यात मुखर्जी यांची महत्वाची भूमिका असल्याने कॉंग्रेस नेतृत्व त्यांच्याबाबत अशी भूमिका घेण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते.

आदान-प्रदान फॉर्म्युला शक्य
यावेळी सप आणि बसपबरोबरच तृणमूल कॉंग्रेसही प्रतिकुल आहे. उत्तर प्रदेशातील विजयामुळे मुलायमसिंह यादव प्रचंड उत्साहात आहेत तर ममता बॅनर्जी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. सरकारने आधी उमेदवार निश्चित करून चर्चेसाठी आले पाहिजे, असे भाजप नेते अरूण जेटली यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंब्याच्या बदल्यात भाजप उपराष्ट्रपतीपद मागू शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
जयललितांचे महत्व वाढले
प्राप्त परिस्थितीत कॉंग्रेसने जयललितांशी हातमिळवणी करण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर भाजपही जयललितांना आपल्या गोटात ओढण्यासाठी प्रयत्नशील आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जयललितांसाठी सुरू असलेल्या मोर्चेबांधणीमुळे जयललिता यांचे महत्व चांगलेच वाढले आहे.