आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान रश्दी जयपूरला येणार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनामध्ये इंग्रजीतील प्रसिद्ध साहित्यिक सलमान रश्दी सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राजस्थान आणि दिल्ली सरकार तसेच पोलिसांना अलर्ट जारी केला आहे.
साहित्य संमेलनामध्ये रश्दी सहभागी होण्याची शक्यता पाहता कोणतीही अप्रिय स्थिती निपटण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रश्दी यांना भारतात येण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असून गृह मंत्रालय त्यांना रोखण्याच्या विचारात नाही, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. रश्दींच्या येण्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोेत यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यक्त केली होती. गहेलोत यांनी व्यक्त केलेले मत आणि काही समाजघटकांना रश्दी यांच्याबद्दल असणा-या आक्षेपामुळे हा अलर्ट जारी करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.
रश्दी भारतात आल्यास ते दिल्लीत येतील. त्यामुळे दिल्लीसाठी हा अलर्ट जारी करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. दिल्लीमध्ये त्यांचे जुने मित्र आणि निकटवर्तीय असल्यामुळे त्यांची इथे येण्याची शक्यता अधिक आहे. अनेक धार्मिक संघटनांनी रश्दी यांच्या भारत दौ-यास विरोध केला आहे. रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावर या संघटनांना आक्षेप आहे. दुसरीकडे रश्दी यांच्याकडे पर्सन आॅफ इंडियन ओरिजिन( पीआयओ) कार्ड असल्यामुळे ते व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतात, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यांना इथे येण्यापासून सरकार रोखू शकत नाही आणि सरकारचाही तसा विचार नाही, असे सांगण्यात येते.