आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रश्दी जेएलएफला येणार की नाही?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - ‘सेटॅनिक व्हर्सेस’मुळे मुस्लिम धर्मगुरूंची नाराजी ओढवून घेतलेले ब्रिटिश लेखक सलमान रश्दी जयपूर लिटररी फेस्टिव्हलला उपस्थिती लावणार की नाही, याबाबत अनिश्चितता व उत्सुकता कायम आहे. शुक्रवारपासून सुरू होणा-या या साहित्याच्या उत्सवासाठी इतरही अनेक भारतीय व अभारतीय दिग्गज लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत जयपूरमध्ये दाखल झाले आहेत.
इंग्रजीत लिखाण करणा-या भारतीय वा भारतीय वंशाच्या साहित्यिक, विचारवंतांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या दृष्टीने दहा वर्षांपूर्वी नमिता गोखले, विल्यम डॅलरिम्पल आणि संजय रॉय यांनी राजस्थानातच निमराणा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचेच, दरवर्षी चढत्या कमानीने वाढणारा जयपूर लिटररी फेस्टिवल (जेएलएफ)हे सध्याचे रूप. तेव्हा प्रायोजक, सहभागी साहित्यिक, रसिक या सर्वच आघाड्यांवर हा उत्सव लहान होता. गेल्या वर्षी जेएलएफला तब्बल 60 हजार रसिक उपस्थित होते, यावरून जेएलएफची व्याप्ती प्रत्येक वर्षी किती वाढत आहे, याचा अंदाज रसिकांना येऊ शकतो.
सलग पाच दिवस चालणा-या या उत्सवात अतिशय भरगच्च कार्यक्रम आहेत, ज्यांची तुलना एखाद्या विवाहप्रसंगी लावलेल्या बुफेशीच होऊ शकते. डिग्गी पॅलेस या ठिकाणी एकाच वेळी चार ते पाच वेगवेगळ्या जागांवर चर्चा आयोजिण्यात आल्या आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सात असे साहित्यिक वा वैचारिक कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी रसिकांना संगीताचा आस्वाद घेता येणार आहे.
यंदाची संगीत रजनीची थीम आहे भक्ती आणि सूफी. या भरगच्च कार्यक्रमांमध्ये कोण सहभागी होणार आहेत याची ही झलक : कवी गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी, गिरीश कर्नाड, गुरुचरण दास, हरी कुंझरू, मोहम्मद हनीफ, सिद्धार्थ वरदराजन, दीप्ती नवल, विनोद मेहता, कपिल सिबल (हे कवीदेखील आहेत!) ही ओळखीची भारतीय नावे यात आहेतच. परंतु, मार्क टुली, मायकल ओंदात्जे, डेव्हिड रेमनिक, रिचर्ड डॉकिन्स, आॅप्रा विन्फे्र, बेन ओकरी, फातिमा भुत्तो, स्टीवन पिंकर, टॉम स्टोपार्ड आदि पाश्चिमात्त्य परंतु भारतात वाचले जाणारे पत्रकार, विचारवंतही या उत्सवात सहभागी होणार आहेत.
यात चर्चेला येणारे विषयही विविधांगी आहेत. इंग्रजी भाषेची चटणी, मीराबाई आणि महादेवी, प्रेमकथा, धर्मयुद्धे, वाघ, अर्थशास्त्र, कविताकोष, निषेधात्मक साहित्य, पाकिस्तान, पॅलेस्टाइन, पत्रकारिता, अरब क्रांती, भाषांतर आदि विषयांवर त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांना बोलते करण्यात येणार आहे.
सर्वांसाठी (रश्दींसह) खुले
या उत्सवाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे येथे सर्वांना खुले आमंत्रण असते. विशेष अतिथींसाठी विशेष पास वगैरे नसतो. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला तुमच्या शेजारच्या खुर्चीवर आधीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असलेला वक्ता असू शकतो. मागच्या वर्षी एक रिक्षावाला उत्सवाला आला होता. त्याला विचारले की इकडे तू का आलास, तर तो म्हणाला, ‘मी असं ऐकलंय की इकडे गोष्टी सांगतात. मी माझ्या मुलांना शाळेत पाठवू शकत नाही की पुस्तकं आणून देऊ शकत नाही. मग इकडे गोष्टी ऐकून त्यांना सांगू तर शकतो!’ म्हणजेच, सलमान रश्दी येणार अथवा नाही, त्यांना संरक्षण हवेच, हा व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, हे जे म्हणणे आहे ते खरेच आहे. परंतु त्याव्यतिरिक्तही जेएलएफमध्ये बरेच काही आहे आणि त्याची झलक तुम्हाला रोज मिळत राहणार आहे, एवढेच! दैनिक भास्करने भास्कर भाषा या प्रकल्पांतर्गत या उत्सवातील काही कार्यक्रमांना मदत केली आहे.