आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धगधगते आसाम : विस्थापित भयभीतच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - आसाममधील दंगलग्रस्त भागातून विस्थापित झालेल्या लोकांत आजही प्रचंड दहशत आहे. त्यांना घरी परतायचे असले तरी या लोकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी थोडा अवधी लागेल, असे यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोनियांनी सोमवारी दंगलग्रस्त भागाचा दौरा केला. नंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

आसाममध्ये बोडोलँड क्षेत्रीय परिषदेच्या प्रभावक्षेत्रात 20 जुलैपासून दंगली सुरू आहेत. यात आतापर्यंत 76 लोक ठार झाले असून साडेचार लाखांहून अधिक लोकांनी घरे सोडून इतरत्र आर्शय घेतला आहे. हजारो कुटुंबं सध्या मदत छावण्यात वास्तव्यास आहेत. सोनिया व शिंदे यांनी दुपारी बोडो व अल्पसंख्याकांच्या दोन मदत छावण्यांना भेट दिली. दंगलग्रस्त कोक्राझार व धुबरी भागाचाही दौरा केला. राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगोई या वेळी सोबत होते. केंद्रीय गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच आसाम दौरा आहे.

मदत छावण्यांत पुरेशी सुविधा : मदत छावण्यांमध्ये पुरेशी मदत देण्यात येत असल्याने लोक समाधानी असल्याचे सोनिया म्हणाल्या. छावण्यात दोन-तीन मुलांची प्रकृती बिघडलेली आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. शांतता प्रस्थापित होण्यास थोडा अवधी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. छावण्यांमध्ये स्वच्छता आणि शौचालयांची व्यवस्था करावी, अशी सूचना सोनियांनी मुख्यमंत्री गोगोई यांना केली.