आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निवेश यांनी स्वत:ला ‘स्वामी’ म्हणणे सोडून द्यावे'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड: ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करणे स्वामी अग्निवेश यांना भलतेच महागात पडणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या या कृतीवर आर्य समाज व खाप पंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वामींनी आता भगवी वस्त्रे काढून ठेवावीत आणि अभिनय सुरू करावा, असा तिखट सल्ला हरियाणा आर्य समाजाच्या वतीने त्यांना देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर आर्य समाज व खाप पंचायत त्यांच्याविरोधात लवकरच एक ठराव संमत करणार असून त्यांनी स्वत:ला ‘स्वामी’ म्हणणे सोडून द्यावे, असे त्यांना सांगण्यात
येणार आहे.
स्वामी अग्निवेश हे एक दूरचित्र वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र, दोनच दिवसांत त्यांना या शोमधून बाहेर पडावे लागले होते. परंतु या शोमध्ये सहभागी होणे अग्निवेश यांना अडचणीचे ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत. खाप पंचायतीच्या मते कुठल्याही संत व्यक्तीला अशा कार्यक्रमांत सहभागी होणे शोभत नाही. त्यातही जो कार्यक्रम कुटंबातील सर्व सदस्य एकत्र बसून पाहू शकत नाहीत अशा अश्लील कार्यक्रमांत त्यांनी सहभागी व्हावे हे दुर्दैवी आहे. आर्य समाज या कार्यक्रमाच्या विरोधात अभियान चालवत आहे. संतांचे तेथे जाणे चुकीचे असून ते आर्य समाजाच्या नियमाच्या विरोधात आहे. आर्य समाजाचे प्रतिनिधित्व करणाºया स्वामी अग्निवेश यांनी यात सहभाग घेतल्याने समाजात चुकीचा संदेश गेला आहे.
स्वामी अग्निवेश हे हरियाणातील पुंडरी मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार तसेच शिक्षणमंत्री झाले होते. समाजात सुधारणावादी काम करणा-यांनी त्याची सुरुवात घरापासूनच करायला हवी, अशी खाप पंचायतीची धारणा आहे. त्यामुळेच स्वामींच्या
कृतीला त्यांचा विरोध असून समाजाचे प्रतिनिधित्व करणा-यांना दंड करण्याची गरज आहे.
असा होणार विरोध
> स्वामी अग्निवेश यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याबाबत नागरिकांना आवाहन.
> आपल्या उपदेशांवर अंमलबजावणी का केली नाही? असे स्वामींना विचारणार.
> हरियाणात आल्यावर स्वामींना तीव्र विरोध करणार.
> दयानंद सरस्वती यांच्या पायाला एका मुलीने स्पर्श केल्यावर त्यांनी तीन दिवस अन्न ग्रहण केले नव्हते. अग्निवेश त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत असतील तर मग आता ते कोणते प्रायश्चित्त घेणार?