आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - एनआरएचएम ( राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम ) घोटाळ्यातील आरोपी आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री बाबू सिंह कुशवाह यांना भारतीय जनता पक्षात सामावून घेतल्याने नाराज झालेल्या उमा भारतींनी बंड पुकारले आहे. आता निवडणूक प्रचारही करणार नाही आणि निवडणूकही लढवणार नाही, अशी भूमिका उमा भारती यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते. उमा भारती यांना भाजप खासदार मनेका गांधी यांनीही पाठींबा दिला आहे. यामुळे भाजपची पुरती कोंडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुशवाह प्रकरणाने भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. मित्र पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पक्षाला उभारी देण्यासाठी उमा भारती यांना मध्य प्रदेशातून पाठविण्यात आले होते. परंतु उमा भारती यांनी आता प्रचारच करायचा नाही, असा निर्णय घेतल्याने भाजपची मोठी फजिती झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमा भारती यांचा पारा चढला आहे. त्या ९ जानेवारीपासून निवडणूक प्रचार बंद करतील, अशी शक्यता आहे.
कुशवाह यांना पक्षात घेतल्याने सर्वजण नाराज आहेत. हा चुकीचा निर्णय झालाच कसा. हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला विचारण्यात आले नाही. बसपसारख्या भ्रष्ट पक्षातील भ्रष्ट नेत्याला घेण्याचा निर्णय चुकीचाच आहे, असे खासदार मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमा भारती यांच्याशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची चर्चा झाली असून थोड्याच वेळात उमा भारती यांचे वक्तव्य अपेक्षित आहे.
कुशवाह प्रकरणी पक्षातून मोठा विरोध होत आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी रथयात्रा काढणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेदेखील नाराज असल्याचे समजते.
गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांनीही कुशवाह यांना पक्षात घेण्यास जोरदार विरोध केला आहे. गुन्हेगार, बलात्कारी आणि भ्रष्टाचारी लोकांना पक्षात स्थान नाही, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मात्र कुशवाह यांचा बचाव केला आहे.
कुशवाह यांना तिकिट देण्यावरुन अडवाणी संतप्त? पक्षात दुफळी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.