आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिटेल क्षेत्रात 51% विदेशी गुंतवणुकीला परवानगी; वॉलमार्ट, टेस्कोसाठी भारताची दारे खुली

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात 51 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला सरकारने परवानगी दिली. यामुळे वॉलमार्ट, कॅरिफोर आणि टेस्को यासारख्या बड्या जागतिक कंपन्यांना भारताचे दरवाजे खुले झाले आहेत. सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रातही 100 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंगल क्षेत्रात आधी 51 टक्क्यांची मुभा होती. भारती एंटरप्रायजेसबरोबर भागीदारी असलेल्या वॉलमार्टचे भारतातील अध्यक्ष राज जैन यांनी तरतुदी पाहून निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. सत्ताधारी यूपीएतील द्रमुक, तृणमूल काँग्रेसने यास आधी विरोध दर्शवला होता.
दरम्यान, यामुळे ग्रामीण पायाभूत क्षेत्र मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे, तर ग्राहक, शेतकरी, उत्पादक, लघू व मध्यम उद्योजकांचा फायदा होणार असून, रोजगार वाढणार असल्याचे सीआयआयचे अध्यक्ष बी. मुथुरामन यांनी म्हटले आहे.
नेमके काय होणार
मल्टिब्रँड रिटेलसाठी विदेशी कंपन्यांना 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या 53 शहरात मॉल उघडता येतील. दोन स्टेअर्समध्ये 10 किलोमीटर अंतर ठेवावे लागणार आहे.
बड्या आंतरराष्ट्रीय मल्टिब्रँड कंपन्यांना किमान 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल. निम्मी गुंतवणूक कोल्ड चेन्स, प्रक्रिया व पॅकेजिंग या मूलभूत क्षेत्रात करावी लागेल.
रिटेलमध्ये 29.50 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे.
कंपन्यांना 30 टक्के निर्मित आणि प्रक्रियायुक्त माल लहान उद्योगाने देणे बंधनकारक आहे.
फळे, भाजीपाला, धान्य ,कडधान्ये, मांस, मासे व पोल्ट्री उत्पादने ब्रँडिंग न करता विकण्याची मुभा. यात सरकार व एजन्सीना खरेदीचे प्राधान्य राहील.
सिंगल रिटेल क्षेत्रात अन्नपदार्थ, लाइफस्टाइल, क्रीडा साहित्य विषयक उद्योगांवरील 51 टक्के एफडीआयचे बंधन काढून हे क्षेत्र खुले झाले आहे.
सिंगल रिटेल क्षेत्रातील अदिदास, गुस्सी, हरमेस, एलव्हीएमएच व कोस्टा कॉफीसारख्या कंपन्यांना पूर्ण अधिपत्त्याखाली भारतात विस्ताराची मुभा.