आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनापासून केलेली प्रार्थनाच देवाला आवडते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा एक संन्यासी जंगलातून जात होता. झाडाखाली त्याला एक गुराखी देवाची प्रार्थना करताना दिसला. तू एकटा असशील, तुझी काळजी घेणारे कोणीच नसेल म्हणून मी म्हणतोय तू मला तुझ्याकडे घेऊन जा. मी तुला छानपैकी अभ्यंगस्नान घालेन. तुझी काळजी घेईन. तुझ्या डोक्यातील उवा-लिखा काढेन. तुला स्वच्छ करेन. अशी प्रार्थना तो देवाकडे करत होता. संन्यासी त्याची प्रार्थना ऐकत होता. त्याला गुराख्याचा राग आला. तो त्याच्यावर भडकला आणि म्हणाला, ‘देवाकडे अशी प्रार्थना करतात का? गुराखी घाबरला. म्हणाला, ‘मला क्षमा करा मी अडाणी आहे.
माझ्यावर रागावू नका. माझे चुकले असल्यास मला प्रार्थना सांगा.’ हे ऐकताच तो संन्यासी खूश झाला. त्याने देवाकडे कशाप्रकारे याचना करायची ते गुराख्याला शिकवले. गुराखी म्हणाला, ‘मी अडाणी आहे. कृपया मला पुन्हा एकदा प्रार्थना सांगा. संन्याशाने पुन्हा गुराख्याला प्रार्थना कशी करायची हे सांगितले व तो जंगलाकडे निघाला. संन्याशाने सांगितल्याप्रमाणे गुराख्याने प्रार्थना केली. मनात आनंदी होत संन्यासी विचार करू लागला. परमेश्वराने ज्या कामासाठी पाठवले आहे, ते काम मी करतोय. मी एका वाट चुकलेल्या गुराख्याला पुन्हा परमेश्वराजवळ आणले.
संन्यासी जंगलातून जात असताना आकाशवाणी झाली, वीज कडाडली. हे काय केलेस तू? त्या गुराख्याला माझ्यापासून दूर करण्याचा अधिकार तुला कुणी दिला? का त्याला अशी प्रार्थना शिकवलीस? त्याची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहचत होती. मला त्यात गोडवा जाणवत होता. तू त्याला जे म्हणायला सांगितलेस त्यामुळे मला त्याच्या प्रार्थनेत कडवटपणा जाणवत आहे. तू माझ्या भक्ताला दूर केलेस. जा त्याची माफी माग. त्याला सांग, जी प्रार्थना शिकवली ती म्हणू नकोस. आकाशवाणी झाल्यानंतर घाबरलेल्या संन्याशाने त्या गुराख्याची माफी मागितली व त्याला म्हणाला. मला माफ कर, मी शिकवलेले सारे विसरून जा. तू तुझ्या पद्धतीनेच देवाची प्रार्थना कर.