आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अझलन शाह हॉकी : भारताचा पाकवर 2-1 ने विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह - स्टार स्ट्रायकर एस. व्ही. सुनीलने शेवटच्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलच्या बळावर गुरुवारी भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 2-1 ने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह भारताने अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेतील शेवट गोड केला. गत सामन्यातील पराभवामुळे भारत अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे. या धडाकेबाज विजयासह भारताने गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम ठेवले. शनिवारी पाकला इंग्लंडच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने अचूक खेळी करत दमदार सुरुवात केली. रचलेल्या डावपेचाची शानदार खेळी करत भारताने पाकचे गोलचे प्रयत्न दोनदा उधळून लावले. अखेर ड्रॅगफ्लिकर संदीप सिंहने भारताकडून गोलचे खाते उघडले. त्याने पाकची बचाव फळी व गोलरक्षकाला हुलकावणी देऊन 30 व्या मिनिटाला गोल केला. या बळावर भारताने पहिल्या हाफमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. आघाडीवर असलेल्या भारताने गोल करण्यासाठी धडपडत असलेल्या पाकला चांगलेच झुंजवले. अखेर 60 व्या मिनिटाला पाकला पेनॉल्टी कॉर्नरची संधी सार्थकी लावता आली. यावेळी सोहेलच्या गोलने पाकला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. सामना संपण्याला अवघे 90 सेकंद असताना सुनीलने थरारकपणे गोल करून भारताचा विजय निश्चित केला.
अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सहापैकी तीन सामन्यांत भारताला विजयी पताका फडकवता आली, तर तीन सामने गमावले.
भारताचे स्पर्धेतील विजय : भारत वि. वि. कोरिया (2-1), भारत वि. वि. मलेशिया (3-2), पाकिस्तान (2-1).
पराभव- न्यूझीलंड वि. वि.भारत (5-1), इंग्लंड वि. वि. भारत (3-2), अर्जेंटिना वि. वि.भारत (3-2)
कोरियाने इंग्लंडला बरोबरीत रोखले
दुसºया एका सामन्यात गुरुवारी दक्षिण कोरियाने तिसºया विजयाचा इंग्लंडचा प्रयत्न उधळून लावला. रंगतदार पद्धतीने खेळवला गेलेला हा सामना दक्षिण कोरियाने 1-1 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.

गुणतालिका
स्थान संघ सामने गुण
1 न्यूझीलंड 4 9
2 अर्जेंटिना 5 9
3 भारत 6 9
4 इंग्लंड 5 8
5 कोरिया 5 5
6 मलेशिया 4 5
7 पाकिस्तान 5 4