आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात 2019 साली आर्थिक मंदीच्या चर्चांनी जोर धरला होता. केंद्र सरकार आपल्या आर्थिक धोरणांमुळे सातत्याने टीकेचे धनी ठरत होते. याच विरोधांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांचे पती देखील आपल्या लेखणीतून अग्रस्थानी होते. होय, ते होते डॉ. परकला प्रभाकर अर्थातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती. हे ऐकून धक्का बसणे स्वाभाविकच आहे, पण वैचारिकरित्या या जोडप्यात तफावत आढळणे साहजिकच होते. निर्मला सीतारामन यांचे पारडे भाजपकडे झुकलेले तर डॉ. प्रभाकर हे पूर्वीपासूनच काँग्रेसचा प्रभाव असणाऱ्या कुटुंबातले होते.
आज निर्मला सीतारामन यांच्याविषयीची ही बाब सांगण्याचे कोणतेही वेगळे कारण असू शकत नाही, कारण आज त्या भारताच्या अर्थमंत्री म्हणून पाचव्यांदा केंद्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भारतीय राजकारणातल्या मोठ्या नावांपैकी सीतारामन हे नाव देखील नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात यशाची अनेक टप्पे गाठत होते. देशाच्या अर्थमंत्री म्हणून आपल्या कार्य व कौशल्याने राजकारणात वेगळा ठसा उमटवणाऱ्या सीतारामन आज 1 फेब्रुवारी रोजी (2023-24) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 च्या निमित्ताने मोदींच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून पदे भूषविणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात...
इंदिरा गांधींनंतर देशाच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी कार्यभार सांभाळला. सीतारामन या नेहमीच त्यांच्या वक्तव्यांसाठी चर्चेत राहिल्या आहेत. आज सलग पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत त्या इतिहासाच्या पानावर स्वत:चे नाव लिहीत आहे. 30 मे 2019 रोजी भारताच्या अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी पदभार स्वीकारला, ते आजतायत अर्थमंत्री पदाची सूत्रे त्याच्याच हाती आहेत. आज मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे.
जेएनयुमध्ये घेतले शिक्षण...
तामिळनाडूच्या मदुराई येथे एका ब्राह्मण कुटुंबात निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 आँगस्ट 1959 रोजी झाला. वडील नारायण सीतारामन हे रेल्वे प्रशासनात नोकरीला तर आई सावित्री सीतारामन या गृहिणी म्हणून घर सांभाळात असत. वडिलांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे सीतारमन यांना तामिळनाडूच्या अनेक ठिकाणी राहावे लागले. निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. पुढे नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना सीतारामन यांची ओळख डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी झाली. डॉ. परकला प्रभाकर यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून डायरेक्टरेटचे शिक्षण घेतले. उत्तम वक्ते व बुद्धिजीवी म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र आहे. डॉ. प्रभाकर व सीतारामन यांनी सोबत शिक्षण घेतले. डॉ. प्रभाकर यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडलेले होते, त्यांची आई आंध्र प्रदेशातून काँग्रेसच्या आमदारही होत्या. मात्र निर्मला सीतारामन या नेहमीच भाजपशी समविचारी असत.
1986 साली निर्मला सीतारामन आणि डॉ. परकला प्रभाकर हे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर सीतारामन लंडनल्या शिफ्ट झाल्या. लंडनमधील प्राईस वॉटर हाउस येथे मॅनेजर पदावर त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. परंतु लंडनमध्ये काम करण्याची ही सीतारामन यांची काही पहिलीच वेळ नव्हती, यापूर्वी त्यांनी तेथील होम डेकोर स्टोरमध्ये सेल्सगर्ल म्हणूनही काम केले होते.
राजकीय प्रवासाला सुरूवात...
निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात काम केले. पुढे त्यांनी 2003 ते 2005 या दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून काम पाहिले. निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) 2006 साली प्रवेश करत राजकीय कारर्किदीला प्रारंभ केला. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून 2010 साली सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदींचा 2014 साली ऐतिहासिक विजय झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात सीतारामन यांना कनिष्ठ मंत्रीपद देण्यात आले.
सीतारमन 2014 साली आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. भाजपने 2016 साली होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत निर्मला सीतारामन यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यांनी कर्नाटकमधून यशस्वीरित्या आपली जागा लढवली. निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सांभळले. त्यानंतर सीतारामन यांच्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला. वास्तविक येथेच सीतारामन यांनी इतिहास रचला होता. कारण पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवला.
संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत, मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात सीतारामन यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. खरे म्हणजे सीतारामन यांची इतिहास रचण्याची ही दुसरी वेळ होती, यापूर्वी 1970-71 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदासोबतच अर्थ खाते सुद्धा स्वत:कडे ठेवले होते. मात्र सीतारामन याच खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या.
अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री पदावरील कामगिरी...
षणमुख चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये केवळ र्थव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. 1947 पासून देशात 74 सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आले. 2023 चा अर्थसंकल्प मोदी सरकारचा 11 वा अर्थसंकल्प ठरणार आहे. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या इंदिरा गांधी देशाच्या दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या. मोरारजी देसाई यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याने इंदिरा गांधीनी अतिरिक्त प्रभार म्हणून अर्थ खाते स्वीकारले. परंतु देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान सीतारामन यांनीच मिळवला.
2017 सालापासून अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या एक तारखेला सादर करण्याची परंपरा सुरु झाली. आजवर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांनी मिळवला. या यादीत पुढे पी.चिदंबरम, प्रणव मुखर्जी, यशवंतराव चव्हाण, मनमोहन सिंग अशी नावे आहेत. याच यादीत आता निर्मला सीतारामन पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याची नोंद करत आहे.
माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे 2014 साली सुमारे 2 तासांचे पहिले प्रदीर्घ बजेट भाषण होते. मात्र निर्मला सीतारामन यांनी 2020 मध्ये 2 तास 40 मिनिटे बोलून जेटलींना मागे टाकत बजेट सादर करण्याचा नवा विक्रम आपल्या नावी केला. सीतारामन यांनी 2019 मध्ये अर्थसंकल्पाची महत्वाची कागदपत्रे ब्रीफकेसमध्ये ठेवण्याची परंपरा मोडली. त्यांनी कागदपत्रे लाल रेशमी कापडात गुंडाळलेली होती आणि त्यावर राष्ट्रीय चिन्ह होते. सीतारामन यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी टॅबलेटवरुन भाषण वाचले.
ग्राफिक्स : सचिन बिरादार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.