आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया:विदेशी विमानांनी फिरणारे 4 कोटी प्रवासी ठरतील टाटासाठी ट्रम्प कार्ड, टाटा समूहालाही उंच भरारी देईल एअर इंडिया

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय विमान कंपनी असावी अशी गरज भासत असतानाच टाटा समूहाकडे एअर इंडियाची मालकी आली आहे. २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद झाल्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी देशांतर्गत विमान कंपनीची आवश्यकता भासत होती. त्यामुळेच भारतातून विदेशात जाणाऱ्या प्रवाशांपैकी ६१% म्हणजे सुमारे ४ कोटी प्रवासी दरवर्षी विदेशी एअरलाइन्सने प्रवास करत होते. हे प्रवासी टाटासाठी ट्रम्प कार्ड ठरतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या तज्ज्ञांनुसार, विदेशी एअरलाइन्सकडून भारतीय प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एअर इंडियाची क्षमता आहे. कंपनीच्या नव्या प्रवर्तकाकडे पैशाची कमतरता नसेल. एअर इंडियाकडे अमेरिकेचे जेएफके, ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळासह उत्तर अमेरिका, युरोप, जपान आणि आखाती देशांच्या महत्त्वाच्या विमानतळांवर लँडिंग आणि पार्किंग स्लॉट आहेत, त्यांची संख्या ९०० आहे. दोन देशांत कराराचा अधिकारही एअर इंडियाकडे आहे. त्याशिवाय, भारतातही ९०० आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट आहेत. एअर इंडियाचे फ्रीक्वेंट फ्लायर प्रोग्रामचे ३० लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणानंतर ३२ वर्षांनी स्थापन झालेल्या आणि आज २७० विमानांचा ताफा असलेल्या दुबईच्या एमिरेट्स एअरलाइन्सचे अध्यक्ष टिम क्लार्क यांच्या मते, आता एअर इंडियाचे एमिरेट्सला मोठे आव्हान असेल. नागरी उड्डयन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, दुबई विमानतळावरून दरवर्षी सुमारे साडेआठ कोटी प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी ६०% एमिरेट्सने प्रवास करतात. पण भारतातून येणाऱ्या-जाणाऱ्या ६.४ कोटी प्रवाशांपैकी फक्त १०% प्रवासीच एअर इंडियातून प्रवास करतात. टाटाच्या नेतृत्वात ही वाटा ३०% झाला तर एकूण व्यवसाय तिप्पट होईल.

विदेशी कंपन्यांचे आव्हान
कमी अंतराच्या प्रवासात इंडिगो व एअर एशिया या कंपन्यांचा सामना करावा लागेल. दूर अंतरात अमिरात, कतार एअरवेज आणि लुफ्तांसाचे आव्हान असेल.

एकमेव भारतीय एअरलाइन, तिच्याकडे...
- लांब अंतरासाठी ५१ वाइड बॉडी विमानांचा ताफा.
- अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांत ९०० लँडिंग स्लॉट व पार्किंग.
- देशात लांब अंतराचे ९५ % आंतरराष्ट्रीय स्लॉट या कंपनीकडे.

बातम्या आणखी आहेत...