आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • A Strong Start To The New Financial Year; Sensex Again At 59,000 Points, Positive Atmosphere In Overseas Markets| Marathi News

भांडवल बाजार:नवीन आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात; सेन्सेक्स पुन्हा 59,000 अंकांवर, विदेशामधील बाजारात देखील सकारात्मक वातावरण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विदेशामधील बाजारातील सकारात्मक वातावरणाने बाजारात झालेल्या चाैफेर खरेदीमुळे भांडवल बाजारात नवीन आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात झाली. ७०८ अंकांनी झेपावत सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५९,००० अंकांचे शिखर सर केले. विदेशी निधी पुन्हा बाजारात येऊ लागल्यामुळे बाजाराला माेठा दिलासा मिळाला.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०८.१८ अंकांनी वाढून ५९,२७६.६९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समध्ये ८२८.११ अंकांची वाढ हाेऊन त्याने ५९,३९६.६२ अंकांची पातळी गाठली हाेती. निफ्टीमध्येदेखील २०५.७० अंकांची वाढ हाेऊन ताे १७,६७०.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

भव्य ऊर्जा धाेरणाला मिळालेली मंत्रिमंडळाची मान्यता, क्रूडची घसरण आणि जागतिक वायदा व्यवहारामधील सुधारणा यामुळे बाजारात तेजी परतली. तरीही रशिया-युक्रेन युद्ध, क्रूडची हालचाल आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण बैठका हे प्रमुख घटक भांडवल बाजारातील नजीकचा कल ठरवतील, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनाेद नायर म्हणाले.

सेन्सेक्स यादीतील समभागांमध्ये एनटीपीसीने सर्वाधिक वाढ नोंदवली. त्यानंतर पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, महिंद्रा यांच्या समभागांमध्ये चांगली वाढ झाली. परंतु टेक महिंद्रा, सन फार्मा, डाॅ. रेड्डीज लॅब, टायटन, इन्फाेसिस यांच्या समभागांची घसरण झाली.

शेअर बाजारात आर्थिक वर्ष २३ ची सुरुवात सकारात्मक झाली. दिवसाची सुरुवात काहीशी मंद झाली, परंतु दिवसभरातील व्यवहारांत बँका, ऊर्जा, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील समभागांची जाेरदार खरेदी झाली. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्समध्ये १,९१४.४९ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५१७.४५ अंकांची वाढ झाली आहे. दरम्यान, कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि सिमेंट उद्योगांच्या चांगल्या उत्पादनामुळे फेब्रुवारीमध्ये आठ पायाभूत सुविधा क्षेत्रांचे उत्पादनात ५.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

विदेशी निधीच्या खरेदीमुळेही बाजाराच्या वाढीला चालना
सेन्सेक्सच्या १.२१ % वाढी बराेबरच , बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक १.७१ %, मिडकॅप निर्देशांक १.३९% आणि लार्जकॅप निर्देशांक १.२८ % वाढले. याशिवाय विदेशी निधीच्या खरेदीमुळेही बाजाराच्या वाढीला चालना मिळाली. एनएसईच्या आकडेवारीनुसार एफपीआयनी भारतीय बाजारात १,९०९.७८ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. दुसरीकडे, बाजारातील तेजीमध्ये देशांतर्गत फंडांनी निव्वळ विक्री केली.