आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंब्याच्या निर्यातीत भारत आघाडीवर आहे. यंदा मात्र कोरोना संकटाने जग व्यापल्याने निर्यातीवर अनेक मर्यादा आल्या असूनही, राज्य कृषी पणन मंडळाने जपानमध्ये या हंगामातील आंब्याची पहिली निर्यात यशस्वी केली आहे. निर्यातीसाठीचे अनेक निकष आणि चाचण्या पार पाडून पणन मंडळाने ३०० मेट्रिक टन आंब्याची निर्यात जपानमध्ये केली आहे. नवी मुंबईच्या वाशीमधील केंद्रात व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधेवर प्रक्रिया करून, तीन निर्यातदारांच्या सहभागाने हा आंबा जपानमध्ये पाठविण्यात आला. आंब्याचे एक डझन आणि अर्धा डझन असे पॅकिंग करण्यात आले. निर्यातीची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. त्यासाठी जपानमधून तेथील कृषी विभागाचे अधिकारी येथे येतात. त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली प्रक्रियेचे काम चालते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे जपानी अधिकारी येथे येऊ शकले नाहीत. मात्र त्यांच्याशी पत्रव्यवहार करून कृषी पणन मंडळाने योग्य त्या चाचण्या, प्रक्रिया करून त्यांचे अहवाल जपान सरकारला पाठवले. त्याची छाननी केल्यावर जपान सरकारने आंबा आयातीस मान्यता दिली. त्यानंतर त्वरित केसर आणि बैगनपल्ली या जातीच्या आंब्यावर योग्य त्या प्रक्रिया करण्यात आल्या. जपानकडे जाणारी विमानसेवा उपलब्ध होताच, हा आंबा जपानच्या नरीटा येथे पाठविण्यात आला, अशी माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
आंब्यावर व्हेपर हिट ट्रीटमेंट
आंब्यावर व्हेपर हीट ट्रीटमेंट करताना आंब्याच्या गराचे तापमान ४७.५ सेंटिग्रेड तर चेंबरचे तापमान ५० सेंटिग्रेड, असे २० मिनिटांसाठी ठेवण्यात येते. त्या प्रक्रियेचे सर्व अहवाल जपानला पाठवावे लागतात. यंदाच्या हंगामात प्रथमच अशी प्रक्रिया करून जपानला ३०० मेट्रिक टन आंब्याची निर्यात शक्य झाली आहे. जपानमध्ये या आंब्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जपानकडून मंडळाला कळवण्यात आले आहे. - सुनील पवार, कार्यकारी संचालक - राज्य कृषी पणन मंडळ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.