आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणू महारोगराई संपूर्ण जगासाठी आरोग्याच्या समस्येसोबत आर्थिक विवंचनेचे कारण ठरली आहे. जगातील जवळपास सर्व मोठ्या अर्थव्यवस्था मंदीत जाणे निश्चित आहे. अनेक व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. मात्र, काही उद्योगपतींनी अशा विपरीत स्थितीतही आपल्या व्यवसायाला उंची दिली आहे. अरुण भरत राम आणि अरविंद लालही यांचा यात समावेश आहे. हे दोन्ही भारतीय उद्योगपती कोरोना काळात डॉलरच्या हिशेबाने अब्जाधीश झाले आहेत. म्हणजे त्यांचे नेटवर्थ १०० कोटी डॉलर(सुमारे ७.५ हजार कोटी रु.)पेक्षा जास्त झाले. अरुण भरत राम श्रीराम ग्रुप ऑफ कंपनीज(एसआरएफ)चे मालक आहेत. दुसरीकडे, अरविंद लाल डॉ. लाल पॅथ लॅब्जचे प्रमुख आहेत. हे दोघे अब्जाधीश झाल्याने भारतात आता डॉलरच्या हिशेबाने अब्जाधीशांची संख्या १०२ झाली आहे. अरुण भरत राम यांच्या कंपनीचे समभाग २५ मार्चपासून आतापर्यंत ६३ टक्के वाढले आहेत. फोर्ब्जनुसार, आता राम यांचे नेटवर्थ ११० कोटी डॉलर (सुमारे ८.३ हजार कोटी रु.) झाले आहे. अरुण भरत राम १४ कंपन्यांच्या संचालक मंडळात आहेत. जेके पेपर लिमिटेडसह जगातील ६ वेगवेगळ्या कंपन्यांचे ती नेतृत्व करते. एसआरएफची स्थापना १९७० मध्ये झाली होती आणि ही औषध उद्योगात आणि कीटकनाशकात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा व्यवसाय करते. याशिवाय एसआरएफ फॅब्रिक, रिअल इस्टेट आदी क्षेत्रातही आहे. ही दिल्लीच्या श्रीराम कॉलेज व श्रीराम स्कूल्सला प्रोत्साहन देते.
३० मार्चपासून १४% वाढले डॉ. लाल पॅथ लॅब्जचे शेअर
दुसरीकडे, अरविंद लाल एक डॉक्टर आहेत आणि डॉ. लाल पॅथ लॅब्ज चालवतात. ३० मार्चपासून १० जूनदरम्यान डॉ. लाल पॅथ लॅब्जचे समभाग १४ % वाढले. केंद्राने जेव्हापासून खासगी प्रयोगशाळांना कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी मंजुरी दिली तेव्हापासून या कंपनीचे समभाग वाढले आहेत. अरविंद लाल यांचे नेटवर्थ १०० कोटी डॉलर (७,६०० कोटी रु.) आहे. ७० वर्षीय डॉ. अरविंद लाल यांच्याकडे कंपनीत ५७% हिस्सेदारी आहे. डॉ. लाल पॅथ लॅब्जची स्थापना १९४९ मध्ये डॉ. अरविंद लाल यांचे वडील एस. के. लाल यांनी केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.