आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Food Oil Inflation Is Increasing Due To Consumer Mindset; Food Oil Imports Fall 32% In March

अनिश्चितता:खाद्यतेल महागाईला ग्राहकांच्या मानसिकतेची फोडणी; खाद्यतेलाच्या आयातीत मार्चमध्ये 32% घट

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • लाॅकडाऊन वाढण्याच्या भीतीने होतेय घरात गरजेपेक्षा जास्त साठवणूक

संताेष काळे

कोराेनाच्या विराेधात लढण्यासाठी करण्यात अालेल्या देशव्यापी लाॅकडाऊननंतर सध्याच्या स्थितीमुळे ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाला अाहे. भविष्यातील चिंतेमुळे घराेघरी गरजेपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला जात अाहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित विस्कळीत झालेले असले तरी ते सुधारण्यासाठी सरकार उपाययाेजना करत अाहे. त्यामुळे लवकरच हा पुरवठा सुरळीत हाेईल. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक हाेऊन उगाच साठवणूक करू नये, असा सल्ला उद्याेग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला अाहे.

देशातील खाद्यतेल उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एक्स्ट्रॅक्टर असाेसिएशन अाॅफ इंडिया संस्थेचे संचालक बी. व्ही. मेहता ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले की, साधारणपणे १५ ते २० लाख टन खाद्यतेलाचा राखीव साठा असताे. सध्या अायात तेल कमी प्रमाणात येत अाहे. देशात माेहरीचे ७५ लाख टन पीक कापणीसाठी तयार अाहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये स्थानिक पातळीवर माेहरीचे तेल उपलब्ध अाहे. साेयाबीनचा हंगाम संपलेला असला तरी साेयाबीन तेल महाराष्ट्रात उपलब्ध असून करडईचे ५० ते ६० हजार टनांपेक्षा जास्त तेल उपलब्ध अाहे. संपूर्ण देश काेराेनाशी लढा देत अाहे. एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनचा तिढा सुटला तर जूनपासून परिस्थितीत सुधारणा हाेऊ शकते.

कमाेडिटी तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर म्हणाले की, खाद्यतेलाच्या किमती जागतिक पातळीवर वाढलेल्या नसून देशातील मागणी अाणि पुरवठ्यातील पाेकळीमुळे सध्या अडचण निर्माण झाली. खाद्यतेल अायात हाेणाऱ्या देशांमध्येही लाॅकडाऊनसारखी स्थिती अाहे. त्याचाही परिणाम हाेत अाहे. परंतु जेएनपीटी व मुंद्रा बंदरावर अालेला खाद्यतेलाचा साठा जलद पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याने बाजारात लवकरच खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत हाेण्यास मदत हाेऊ शकेल.

ग्राहकांनी पॅनिक होऊ नये

संजयकुमार अँड कंपनीचे संजय कांकरिया म्हणाले, लॉकडाऊनच्या आधी चलन बाजारात डाॅलरचे मूल्य रुपयाच्या तुलनेत ७६ वर गेल्यामुळे खाद्यतेलाचे भाव लिटरमागे ९४ रुपयांवर गेले. उत्पादन घट व वाढलेल्या मालवाहतूक खर्चामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये ६ ते ७ रुपयांची तेजी अाली अाहे. अाैरंगाबाद शहराची महिन्याला १२ लाख लिटर खाद्यतेलाची गरज अाहे. त्यातून बाजारात साेयाबीन तेल उपलब्ध असून सरकीचे तेलही यात आहे. लाॅकडाऊनमुळे मागणी कमी अाणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने ग्राहक उगाचच पॅनिक हाेऊन घरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत अाहेत. पण हळूहळू तेलाचा पुरवठा हाेत असल्याने नागरिकांनी घाई करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

सीमाबंदी शिथिल झाली तर मालाचा पुरवठा सुसह्य 

खाद्यतेलाचा साठा भरपूर असून तुटवडा नाही. आधी व्यापारी साठेबाजी करायचे, पण लॉकडाऊन कालावधी वाढण्याच्या भीतीने नागरिक गरजेपेक्षा जास्त साठा करत आहेत.  सध्या जालन्यावरून तेलाची आवक होत नसून शेंगदाणा तेलाचा माल आहे तेवढाच आहे. करडईचे बी शेतकऱ्यांकडे तयार आहे, पण ती बाजार समितीमध्ये आणण्यास वाहन उपलब्ध नाही. हे लक्षात घेता सरकारने सीमाबंदी शिथिल केली तर मालाचा पुरवठा सुसह्य होण्यास मदत होऊ शकेल, असे मत औरंगाबादचे तेल व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी व्यक्त केले.

 • १९ ते २० लाख टन खाद्यतेलाचा देशातील मासिक वापर
 • ५ ते ६ लाख टन माेठ्या हाॅटेलपासून ते लहान टपरीतील वापर
 • २३० लाख टन देशातील खाद्यतेल मागणी (वार्षिक)

खाद्यतेल प्रकार - आयात देश

 • पाम तेल - मलेशिया, इंडोनेशिया
 • साेयाबीन - अर्जेंटिना, ब्राझील
 • सूर्यफूल तेल - युक्रेन (रशिया)

खाद्यतेलाची देशात झालेली आयात

 • तेल - मार्च २०२० - मार्च २०१९
 • आरबीडी पाम तेल - ३०,८५० - ३,१२,६७३
 • सोयाबीन - २,९२,४१० - २,९२,९२५
 • सूर्यफूल - २,९६,५०१ - २,९७,८८७

खाद्यतेल, साखर, पीठ साठा मर्यादेतून वगळावे

विविध राज्यांतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाद्यतेल उत्पादकांसाठी पुरवठा साखळी महत्त्वपूर्ण अाहे. काेराेनाचा मुकाबला करतानाच लाॅकडाऊनच्या कालावधीत कामगार, पुरवठा साखळी अाणि वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या उद्देशाने खाद्यतेलाबराेबरच साखर, पीठ यांचे उत्पादन करणारे विभाग अाणि डेपाे यांना साठवणूक मर्यादेतून वगळण्यात यावे, अशी मागणी साॅल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असाेसिएशनने केंद्र सरकारकडे केली अाहे.

बातम्या आणखी आहेत...