आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • FPI Invests Rs 23,000 Crore In Seven Sessions, Foreign Investors Return To Stock Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुभसंकेत:सात सत्रांमध्ये एफपीआयची 23 हजार काेटींची गुंतवणूक, विदेशी गुंतवणूकदारांची पावले पुन्हा शेअर बाजाराकडे

मुंबई9 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • पूर्ण मार्चमध्ये जेवढी रक्कम काढली, त्याच्या 40 % गेल्या 7 दिवसांत पुन्हा गुंतवणूक

काेराेना संकटामुळे बरीचशी पडझड सहन केल्यानंतर भारतीय शेअर बाजारासाठी एक चांगली बातमी आली आहे. शेअर बाजारात तेजीचे वारे वाहू लागल्यानंतर आता विदेशी गुंतवणूकदारही पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत. गेल्या ७ सत्रांमध्ये एफपीआयने (विदेशी पाेर्टफाेलिआे गुंतवणूकदार) भारतीय बाजारात २३,००० काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी संपूर्ण मार्च महिन्यात जितकी रक्कम काढली त्याच्या तुलनेत जवळपास ४०% रक्कम गेल्या ७ दिवसांत पुन्हा गुंतवली आहे.

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार एफपीआयने मार्चमध्ये विक्रमी ५८,६०० काेटी रुपये आणि एप्रिलमध्ये ४,१०० काेटींच्या शेअर्सची विक्री केली. मेमध्ये पुन्हा विदेशी गुंतवणूकदारांनी माेठ्या ब्लाॅक डीलच्या माध्यमातून १२,००० काेटी रुपयांची खरेदी केली हाेती. आता गेल्या ७ सत्रांतही(मेमधील तीन दिवसांचाही समावेश) विदेशी पाेर्टफाेलिआे गुंतवणुकदारांनी भारतीय बाजारात २३ हजार काेटी रुपये आेतले आहेत.

जपानमधून काढली रक्कम

तज्ञांच्या मते, काेराेना संकटाच्या काळातही विदेशी पाेर्टफाेलिआे गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराबाबत खूप सकारात्मक भूमिका घेतली आहे. काेराेना कालावधीत या गुंतवणूकदारांनी दक्षिण काेरिया आणि तैवानमध्येही गुंतवणूक केली असली तरी ती भारताच्या तुलनेत कमी आहे. एफपीआयने दक्षिण काेरियात २,६०७ काेटी रु. व तैवानमध्ये ६,४४१ काेटी रुपयांची खरेदी केली. जपानमधून त्यांनी २,६५७ काेटी रु. बाहेर काढले. एप्रिलनंतर या बाजारांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणुकीचा आेघ आला आहे.

सेन्सेक्स | दिवसभरातील कमाई गमावली, ८३ अंकांची वाढ

आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या व्यवहारात साेमवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स किरकाेळ वाढीसह बंद झाला. सकाळी सेन्सेक्स ५५३.९३ अंकांची उसळी घेत ३४,८४१.१७ अंकांच्या पातळीवर उघडला हाेता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील १०,३०० अंकांच्या वर व्यवहार करत हाेता. निफ्टी १०,३२८.५० अंकांच्या उच्चांकी पातळीवरून घसरून १०,१६७.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये १,८६३.१४ अंकांनी म्हणजे ५.७४ % वाढ झाली हाेती . सेन्सेक्स यादीतील १० आघाडीच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात २.४६ लाख काेटी रुपयांनी वाढ झाली हाेती. त्याचा सर्वाधिक फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना झाला.

का वाढत आहे गुंतवणूक

> जूनच्या पहिल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे हक्क भाग व काेटक महिंद्रा बँकेतील हिस्सा विक्री या दाेन माेठ्या व्यवहारांमुळे एफपीआयची गंुतवणूक वाढली आहे.

> भारतीय शेअर बाजार अन्य देशांच्या तुलनेत जास्त आकर्षक असून चांगल्या कमाईची आशा त्यांना वाटत आहे.

> काेराेनाच्या सुरुवातीला बहुतांश एफपीआयने जगभरातून आपली गुंतवणूक काढून घेतली व आता लाॅकडाऊन उघडल्यावर ते पुन्हा गुंतवणूक करत आहेत.

या शेअर्सना पहिली पसंती

एफपीआयने या कालावधीत काही महत्त्वाच्या शेअर्समध्ये जास्त गुंतवणूक केली आहे. बजाज फायनान्स, एसबीआय, टाटा स्टील, ओएनजीसी आणि टायटन गेल्या ७ सत्रांत टाॅप गेनर ठरले. या शेेअर्सनी या कालावधीत १० ते २३ % वाढ नाेंद केली. गेल्या ७ सत्रांत निफ्टीमध्ये जवळपास ९% आणि सेन्सेक्समध्ये ६.४ % वाढ नाेंद केली. सेन्सेक्स मे महिन्यात (१८ मे) २९,९६८.४५ या सर्वात नीचांकी स्तरावरून १४.४ % आणि निफ्टीमध्ये १५.२% वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...