आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक असणाऱ्या HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंटिंग रेटमध्ये (MCLR) मध्ये 0.05 हून 0.15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या या निर्णयानंतर अनेक ग्राहकांच्या कर्जाचा हप्ता वाढेल. नवे दर 8 मे 2023 पासून लागू होतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या MPC बैठकीत पॉलिसी रेट किंवा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करता तो तसाच ठेवला होता हे विशेष.
असे राहतील नवे दर
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, बदलानंतर आता एका रात्रीच्या कर्जासाठी एमसीएलआर 7.95 टक्के झाला आहे. याशिवाय एक महिन्याच्या कालावधीसाठी दिलेल्या कर्जावरील हा दर 8.10 टक्के झाला आहे. MCLR 3 महिन्यांसाठी 8.40 टक्के व 6 महिन्यांसाठी 8.80 टक्के करण्यात आला आहे.
तसेच 1 वर्षाचा MCLR 9.05 टक्के झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गृहकर्ज व वाहन कर्जासह बहुतांश ग्राहक कर्जे हे 1 वर्षाच्या MCLR शी जोडलेली असतात.
इतर मुदतीचे दर असे...
1 वर्षाच्या कालावधीच्या कर्जावरील MCLR वाढल्यामुळे सर्वाधिक ग्राहकांना फटका बसला आहे. कारण आता त्यांना गृह व वाहन कर्जासाठी जास्त खर्च करावा लागेल. इतर कालावधीच्या कर्जावरील या दरातील बदल पाहिल्यास, 2 वर्षांचा MCLR 9.10 टक्के झाला आहे, तर 3 वर्षांच्या मुदतीचा दर 9.20 टक्के झाला आहे. एचडीएफसी बँकेने कर्जदरात केलेल्या या बदलांचा केवळ नव्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही, तर यामुळे जुन्या ग्राहकांचे खिसेही अधिक रिकामे होणार आहेत. ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या कर्जावर लागू आहे.
MCLR म्हणजे काय?
मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट किंवा MCLR हा RBI द्वारे लागू करण्यात आलेला बेंचमार्क आहे. त्याच्या आधारावर बँका कर्जासाठी आपले व्याज दर निश्चित करतात. दुसरीकडे, रेपो रेटच्या आधारावर RBI बँकांना कर्ज देते.
RBI कडून रेपो दरात कपात केल्यामुळे बँकांना स्वस्त कर्ज मिळते. त्यानुसार त्या MCLR मध्ये कपात करून कर्जाचा EMI कमी करतात. पण रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकांना आरबीआयकडून महाग कर्ज मिळते. त्यामुळे त्यांना एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परिणामी, ग्राहकांवरील कर्जाचा भार वाढतो.
SBI-ICICI बँकेत एवढा व्याजदर
दरम्यान, आयसीआयसीआय बँकेतील 1 रात्र व 1 महिन्याच्या कर्जासाठी एमसीएलआर दर 8.50 टक्के, 3 महिन्यांसाठी 8.55 टक्के, 6 महिन्यांसाठी 8.70 टक्के व एका वर्षासाठी 8.75 टक्के एवढा आहे. याशिवाय, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI चा रात्रीचा MCLR दर 7.90 टक्के, 1 व 3 महिन्यांसाठी 8.10 टक्के, 6 महिन्यांच्या कर्जासाठी 8.40 टक्के व 1 वर्षाच्या कर्जासाठी 8.50 टक्के आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.