आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी योग्य उपचार आणि आर्थिक सुरक्षेसाठी आरोग्य विमा असणे खूप फायद्याचे ठरतेय. जर तुम्ही आतापर्यंत कोणताही आरोग्य विमा घेतलेला नसेल किंवा घ्यायचा विचार करत असाल तर उशीर करु नका. पण त्यापूर्वी आरोग्य विमा घेतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. हे आजच जाणून घ्या...
सर्वात आधी आरोग्य विमा म्हणजे काय? हे जाणून घेऊया.
जर तुम्ही आजारी असाल तर अशावेळी विमा कंपनी तुमच्या उपचारांचे खर्च उचलते. याअंतर्गत रुग्णालयात दाखल, उपचार, शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण इत्यादींशी संबंधित खर्च कंपनी करते. त्यामुळे आपल्या खिशावर (आर्थिक नुकसान) याचा भार पडत नाही.
कोरोनाकाळात आरोग्य विमा का गरजेचं आहे?
देशात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोना झाल्यास आणि उपचार खासगी रुग्णालयात करायचे असल्यास त्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे आपल्याला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. पण तुमच्याकडे आरोग्य विमा असल्यास तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे उपचार मोफत होतात. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विमा किती गरजेचे आहे हे यावरुन समजून येईल.
आरोग्य विम्यात काय समाविष्ट केले जाईल ते नक्की समजून घ्या?
आरोग्य विमा घेताना विमा कंपन्या खूप सार्या पॉलिसी देत असतात. प्रत्येक विमा कंपन्यांचे वेगवेगळे नियम असतात. त्यामुळे ज्या विमा कंपन्या जास्तीतजास्त सुविधा देत असतील अशाच पॉलिसी घ्या. उदाहरण त्या विमा पॉलिसीमध्ये चाचणी खर्च, रुग्णवाहिका खर्चासह इतरही बाबी समाविष्ट असायला हव्यात. जेणेकरून तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
आपण घरी राहून उपचार घेतल्यास विम्याचा लाभ मिळेल का?
ICICI लोंबार्डचे अंडररायटींग, क्लेम्स अँड री-इन्शुरन्सचे प्रमुख संजय दत्ता यांच्या म्हणण्यानुसार बर्याच कंपन्या घरगुती उपचारांवरील खर्चही पूर्ण करत आहेत. तर दुसरीकडे बर्याच विमा कंपन्या सरकारी क्वारंटाईन सेंटरवरील उपचारांचा खर्च उचलत आहेत. अशावेळी आपली कंपनी या सोईसुविधा देत आहेत की नाही याचा विचार जरुर करावा.
आरोग्य विम्यात कोरोना लसीकरणाचा खर्च कव्हर होईल का?
जर तुम्ही पैसे देऊन कोरोनाची लस घेतली असेल तर त्याचे पैसे आरोग्य विम्यात कव्हर होणार नाही. परंतु, तुमच्याजवळ ओपीडी कव्हर असेल तर ते आरोग्य विम्याव्दारे भरुन काढता येतील.
बाहेरून आणलेला ऑक्सिजन सिलिंडर किंवा औषधांचा खर्च कव्हर होईल का?
संजय दत्ता यांच्या मते, तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये रूग्णालयाच्या बिलात समाविष्ट असलेल्या सर्व खर्चाचा समावेश होईल. परंतु, तुम्ही जर ऑक्सिजन सिलेंडर किंवा औषध बाहेरुन विकत घेतले असेल आणि ते बिलामध्ये समाविष्ट नसेल, तर त्याचे खर्च विमा कंपनी करत नाही.
विमा कव्हरचा लाभ कधी घेता येईल?
आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचा अर्थ असा नाही की, पॉलिसी खरेदीच्या पहिल्या दिवसापासूनच विमा कंपनी आपल्याला कव्हर करेल. त्याऐवजी, आपल्याला दावा करण्यासाठी काही दिवस थांबावे लागेल. पॉलिसी खरेदी केल्यापासून तर विमा सेवेचा लाभ होईपर्यंत जो कालावधी असतो त्याला 'प्रतिक्षा कालावधी' म्हणतात. हा कालावधी 15 ते 90 दिवसांपर्यंत असू शकतो. अशावेळी एक लक्षात ठेवावे की, ज्या कंपनीचा वेटिंग पीरियड कमी असतो अशा कंपन्यांना प्राधान्य द्यायला हवे.
कोरोनासाठी स्वतंत्र पॉलिसी घेणे कितपत योग्य आहे?
यासंदर्भांत संजय दत्ता सांगतात की, जर आपल्याकडे आधीच आरोग्य विमा पॉलिसी असेल परंतु, ते पुरेसे नसल्यास आपण कोरोनाच्या उपचारांसाठी स्वतंत्र पॉलिसी घेऊ शकता. सरकारने याकाळात कोरोना नावावर वेगवेगळ्या पॉलिसी सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये 'कोरोना प्रोटेक्टर' आणि 'कोरोना कव्हर' आदी पॉलिसींचा समावेश आहे. परंतु, या सर्व परिस्थितीतदेखील आरोग्य विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण कोणत्यातरी आजाराने रूग्णालयात उपचार घेत असतो तेंव्हा ही पॉलिसी आपल्या कामात येते.
कोरोना उपचारांवर किती खर्च येत आहे?
कोरोनावर उपचार घेण्यासाठी एका व्यक्तीला 10 ते 12 लाख रुपये खर्च येत आहे. परंतु, हे खर्च त्या रुग्णांच्या वयावर अवलंबून आहे. जर एखादा रुग्ण वयस्कर असेल तर त्याच्या उपचार खर्चात देखील वाढ होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.