संकटात संधी / लॉकडाऊनमध्ये गृहिणींनी सुरू केला फूड डिलिव्हरी व्यवसाय; समोशापासून मांसाहारी पदार्थांचा समावेश

  • बहुतांश दुकाने बंद असल्याने घरातूनच सुरू झालेल्या छोट्या व्यवसायांकडे वळत आहेत ग्राहक

वृत्तसंस्था

May 20,2020 09:01:00 AM IST

लखनऊ. कोरोना विषाणू महामारीमुळे जगासमोर आरोग्याच्या समस्यांसह अनेक आर्थिक समस्याही उभ्या राहिल्या आहेत. विविध लहान-मोठे व्यवसाय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा कठीण काळात काही जणंानी व्यावसायिक आघाडीवर नवी सुरुवत करण्यात यश मिळवले आहे. भले हे हायफाय स्टार्टअपप्रमाणे कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत नसतील मात्र, घरांत टाळेबंदीत राहण्यात नाईलाज झालेल्या लोकांसाठी हा दिलासादायक अनुभव ठरला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात विविध भागांमध्ये गृहिणी आणि सामान्य नागरिकांनी खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. बहुतांश रेस्तराँ आणि ढाबे बंद असल्याने कोणत्याही जाहिरातीविना यश मिळत आहे. सुरुवातीस त्यांना कमी ग्राहक मिळाले. मात्र, त्यांच्या उत्पादनाचे कौतुक झाल्यानंतर ग्राहकांची संख्याही वेगाने वाढत आहे. कानपूर, वाराणसी आणि लखनऊमध्ये सुरू झालेल्या अशाच व्यवसायाला चांगले यश मिळाले आहे. जाणून घ्या अशाच तीन व्यवसायांची माहिती...

रक्षंदा खान लखनऊतील लोकांना खाऊ घालताहेत कोरमा, कबाब

नवाबांचे शहर लखनऊ आपल्या मांसाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लोकांना मांसाहारी पदार्थ मिळणे बंद झाले आहे. मात्र, बंदीनंतरही लखनऊमध्ये मटण विक्री सुरू होती. सुमारे ८०० रुपये किलो. रक्षंदा खान यांनी या संधीचा फायदा घेत मटण कोरमा, कबाब, मटण स्टू इत्यादी पदार्थांची होम डिलिव्हरी पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला. लखनऊमध्ये लॉकडाऊनपूर्वी एक मिठाई दुकानावर काम करणाऱ्या मुलाने रोजगार गमावल्यानंतर त्याने घरातच रसगुल्ले आणि बुंदी बनवायला सुरुवात केली.

अॅनिव्हर्सरी,वाढदिवसाच्या ग्राहकांना वाराणसीची नेहा पोहोचवतेय केक

वाराणसी येथील नेहा सुरुवातीला आ‌वड म्हणून बेकिंग करत होत्या. मात्र, लॉकडाऊन दरम्यान त्यांनी बनवलेल्या केकसाठी आजूबाजूच्या परिसरातून मागणी होत आहे. नेहा दररोज ७-८ केक विकत होत्या. लॉकडाऊनमध्ये घरातच वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी साजरी करणाऱ्यांकडून या केकची खरेदी केली जात आहे. नेहा सांगतात की, लॉकडाऊननंतरही हा व्यवसाय सुरू ठेवणार असून व्यापही वाढवणार आहेत. नेहाने दिलेल्या माहितीनुसार,गुणवत्ता आणि स्वच्छतेमुळे केकची मागणी वाढली आहे.

मुलांसाठी समोसे बनवण्यास सुरुवात, आता आजूबाजूच्या परिसरात डिलिव्हरी

कानपूर येथील रजनी शर्मा या देशातील इतर गृहिणींप्रमाणेच आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीला मुलांनी त्यांना घरी समोसे बनवण्यास सांगितले. मुलांसाठी एकदा-दोनदा समोसे बनवल्यानंतर आजूबाजूला राहणाऱ्या मुलांच्या मित्रांकडूनही मागणी सुरू झाली. रजनी यांनी समोसे बनवणे आणि आजूबाजूच्या परिसरात घरपोच पोहोचवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या दररोज १००-२०० समोसे बनवतात. तर, दिवसाला ४००-५०० रुपयांची कमाई करतात. रजनी सांगतात, लोक घरी येऊन समोसे घेऊन जात आहेत.X