आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • How Does The US Federal Reserve Affect The Indian Market, Why Did The Rupee Fall? Read Detailed

शेअर बाजारात घसरणीची कारणे:अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा कसा होतो भारतीय बाजारावर परिणाम, रुपया का पडला? वाचा सविस्तर

मुंबई21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीला भारतीय कारणे देखील असली तरी सर्वात मोठे किंवा महत्त्वाचे कारण जागतिक बाजारातील घसरण आहे. अमेरिकेत व्याजदर वाढीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. भारतच नाही तर जगभरातील शेअर बजाारावर अमेरिकन बाजाराचा परिणाम झालेला दिसून येतो.

शुक्रवारी अमेरिकन बाजारामध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकन बाजारातील प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स 880 अंकांनी घसरून 31,392 वर बंद झाला. S&P 500 देखील 3% आणि Nasdaq 3.5% ने खाली आले. तसेच युरोपियन मार्केट 2-3% घसरले. आशियाई बाजाराचा विचार केल्यास जपान, हाँगकाँग, चीन आणि तैवानचे बाजारही घसरणीसह बंद झाले.

या सर्वांचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे भारतीय बाजारात घसरण होण्यामागचे नेमके कारण काय? याचा रुपयावर का होतो परिणाम? या सह अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भारतीय बाजारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले

राष्ट्रीय शेअर बाजारावर सर्वाधिक परिणाम दिसून आला. निफ्टीचे सर्व 11 क्षेत्रीय निर्देशांक घसरले. 4.12% ची सर्वात मोठी घसरण आयटी निर्देशांकात झाली. तसेच बँका, वित्तीय सेवा, मीडिया, मेटल, PSU बँक, खासगी बँक आणि रियल्टी निर्देशांकात 3% पेक्षा जास्त घसरण झाली. यानंतर ऑटो इंडेक्समध्ये 2% घसरण झाली. तर फार्मा 1.83% आणि FMCG 0.94% ने घसरले.

अमेरिकन बाजारात घसरणीचे कारण काय?

अमेरिकन बाजारातील घसरण होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे महागाई दरात झालेली वाढ होय. येथील महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अमेरिकेतील महागाई दर 1981 नंतर मे महिन्यात 8.6% वर पोहोचला आहे. त्यामुळे फेडरल रिझव्‍‌र्हवर व्याजदर वाढवण्याचा दबाव असून, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या ते प्रति बॅरल 120 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे.

ही कारणेही महत्त्वाची

 • कंपन्यांमधील उत्पादनात घट झाल्याची आकडेवारी समोर आली, त्याचाही बाजाराच्या धारणेवर नकारात्मक परिणाम झाला.
 • अमेरिकेमध्ये महागाई दर गेल्या चाळीस वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
 • अमेरिकेची केंद्रीय बँक पंधरा जून रोजी पतधोरणाचा आढावा जाहिर करणार आहे. बाजाराला व्याजदरात वाढीची चिंता आहे.
 • अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

भारतातील वाढता महागाई दरही ठरले कारण

जागतिक बाजारात घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असला तरी यामागे काही भारतातील कारणेही महत्त्वाची ठरली आहेत. भारतातील महागाई दरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अपेक्षित दरापेक्षा जास्त वाढ दिसून येत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत दोन वेळा व्याजदरात वाढ केली आहे. या पुढील काळातही व्याजदरात वाढ करणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

बाजारात घसरण होण्यामागची भारतीय कारणे

 • भारतातील महागाई दर आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला
 • डॉलरच्या तुलनेत रुपयात होणारी घसरण
 • कच्च्या तेलाचे वाढते दर
 • रिझर्व्ह बँकेने वाढवलेले व्याजदर तसेच यात आणखी वाढ होण्याची शक्यता
 • ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ महागाई एप्रिलमध्ये 7.79% पर्यंत वाढली.

अमेरिकन गुंतवणूकदारांकडून विक्री

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर अमेरिकन गुंतवणूकदारांची धारणा नकारात्मक होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येतो. असे गुंतवणूकदार भारतीय बाजारात केलेली गुंतवणूक काढून घेतात. त्यामुळे विक्रीचा मारा झाल्याने भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येते.

भारत-अमेरिका व्यापारी संबंध

अमेरिकेसोबत भारताचा व्यापार सध्या उच्चांकी पातळीवर आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी प्रमुख पाच देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो. तसेच भारतातील आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे. अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक घडामोडीचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येतो.

भारतीय रुपयावरही परिणाम

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री आणि परदेशात डॉलरची मजबूती याचा रुपयाच्या दरावर परिणाम झाला. शुक्रवारी आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 77.81 वर उघडला. दिवसाच्या व्यवहारात, तो 77.79 या उच्चांकावर तर 77.93 या नीचांकावर गेला होता. त्याच वेळी, व्यवहाराच्या शेवटी, रुपया 19 पैशांनी घसरून 77.93 रुपये प्रति डॉलरवर आला.

बातम्या आणखी आहेत...