आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अब्जाधीश केशब महिंद्रा (वय ९९) यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. अमेरिकेतून पदवीधर झालेल्या केशब यांना शेतकरी किंवा सैनिक व्हायचे होते. १९४७ मध्ये त्यांनी महिंद्रा समूहाची सूत्रे स्वीकारली. १९६३ मध्ये अध्यक्ष बनले. २०१२ मध्ये त्यांनी हे पद पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवले. केशब टाटा स्टील, सेल, इंडियन हॉटेल्स या कंपन्यांचे संचालक व सियामचे अध्यक्ष होते. एमआरटीपी व उद्योगांच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते. फोर्ब्जने यादीत त्यांना ९,८५० कोटींंच्या संपत्तीसह देशातील प्रतिष्ठित अब्जाधीश म्हणून स्थान दिलेे. १९८७ मध्ये फ्रान्सने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला. जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास...
क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन : सरकारने विचारले - तुमच्यावर खटला का चालवू नये..? केशब उत्तरले - चालवा!
व्हार्टन नियतकालिकातील मुलाखतीत केशब म्हणालेे, ‘मी अनेकदा तरुण आणि मुलांना सांगतो. अशक्य गोष्टी साध्य करण्याचे, साकारण्याचे स्वप्न पाहा. धैर्यवान लोकांमध्येच जीवन बदलण्याची क्षमता असते. ही तळमळ आणि आक्रमकता केशब यांच्या निर्णयांमध्येही हाेती. वडील कैलाशचंद्र महिंद्रा आणि काका जगदीशचंद्र महिंद्रा यांचा वारसा पुढे नेण्यासाठी केशब १९४७ मध्ये या समूहात आले. त्या वेळी रणगाड्यांच्या भागांसाठी ब्रिटन आणि इतर देशांंवर अवलंबून राहावे लागत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्राने स्वतःच्या हिमतीवर जीपचे उत्पादन सुरू केले. पुरवठादार किंवा विक्रेते नव्हतेच. इंजिन, ट्रान्समिशन, अॅक्सल असे सर्व भाग देशातच तयार करून वर्षभरात २० हजार जीपचे उत्पादन झाले. पुढील तीन दशके महिंद्रा समूहाने नियमांपासून ते पुरवठा साखळीपर्यंतच्या मुद्द्यांवर लढा दिला. परवाना काळात कार बनवण्याचा त्यांचा अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला. कारण त्यांचा बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी करून कार निर्मितीचा प्रस्ताव होता. सरकारच्या मान्यतेशिवाय कंपन्यांना दरवाढ करता येत नव्हती. क्षमतेबाबतही काटेकोरपणा होता. एकदा सरकारने क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन केल्याबद्दल खटला का चालवू नये, असे विचारले. केशब यांचे उत्तर होते, ‘चालवा.’ त्यांनी विलीज, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, ब्रिटिश टेलिकॉम यांसारख्या कंपन्यांशी व्यावसायिक करारांमध्ये माेलाची भूमिका बजावली. १९६२ मध्ये इंटरनॅशनल हार्वेस्टरसोबत भागीदारी करून ट्रॅक्टर निर्मितीमध्ये विविधता आणली. ताे अत्यंत धाडसी निर्णय होता. आज महिंद्रा जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. २०१२ पासून त्यांनी दानधर्मालाही बराच वेळ दिला. हुडकोची स्थापना केली. झोपडपट्टीत फिरले. दरवर्षी २५ हजार मुलींना शिक्षण, कॅन्सरग्रस्तांना घरे देणे हे त्यांचे मोठे धर्मादाय प्रकल्प आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.