पाचवी मोठी गुंतवणूक / जिओ प्लॅटफॉर्ममध्ये केकेआरने 11 हजार 367 कोटीत खरेदी केली हिस्सेदारी

  • जिओला एक महिन्यात भेटली पाचवी मोठी गुंतवणूक

वृत्तसंस्था

May 23,2020 09:15:00 AM IST

नवी दिल्ली. मागील एका महिन्यात जिओ प्लॅटफॉर्मला पाचवी मोठी गुंतवणूक मिळाली आहे. अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी (पीई) फर्म केकेआरने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २.३२ टक्के भागीदारीसाठी ११.३३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आशिया खंडातील केकेआरची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. या करारासाठी केकेआरने जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी रु. आणि एंटरप्राइझ व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी वर्तवली आहे.

रिलायन्स समूहाने (आरआयएल) शुक्रवारी ही माहिती दिली. यापूर्वी फेसबुकने २२ एप्रिलला जिओ प्लॅटफॉर्ममधील ९.९९% हिस्सेदारी खरेदीची घोषणा केली. तेव्हापासून सुरू झालेली गुंतवणुकीची प्रक्रिया थांबलेली नाही. आतापर्यंत पाच मोठ्या गुंतवणूकदारांनी जिओ प्लॅटफॉर्ममधील १७.१२% भागीदारी खरेदी करून एकूण ७८,५६२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकनंतर जगातील आघाडीचे गुंतवणूकदार सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स आणि जनरल अटलांटिकने गुंतवणूक केली होती. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म ही संपूर्णपणे आरआयएलच्या मालकीची डिजिटल तंत्रज्ञान कंपनी आहे. दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ, जिओ अॅप, डिजिटल इकोसिस्टम आणि वेगवान इंटरनेट सेवा या अंतर्गत येते. रिलायन्सने ५ सप्टेंबर २०१६ ला जिओ बाजारात आणली होती. केवळ चार वर्षांत, जिओचे देशभरात ३८.८ कोटी युजर्स आहेत. १९७६ मध्ये स्थापना झालेल्या केकेआरला जागतिक खासगी उद्योगांमध्ये गुंतवणुकीचा दीर्घ अनुभव आहे.X