आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Mahatma Phule Jan Arogya Yojana; Eligibility Facilities Benefits | MJPJAY Benefits

MJPJAY योजना गरिबांसाठी वरदान:महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा कसा घ्यावा लाभ, काय आहे पात्रता? जाणून घ्या!

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 जुलै 2012 रोजी राज्यातील 8 जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली.

21 नोव्हेंबर 2013 रोजी या योजनेचा राज्यातील 28 जिल्ह्यांत विस्तार करण्यात आला. त्यानंतर या योजनेचे 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) असे नामकरण करण्यात आले. सध्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना होत आहे.

चला तर मग MJPJAY योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते? व या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे जाणून घेऊया...

MJPJAY चा उद्देश

राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये आहे.

योजनेचा लाभ कुणाला?

  • या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबही या योजनेचे लाभार्थी आहेत.
  • शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथालयातील मुले, शासकीय वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व त्यांचे कुटुंब तथा कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

योजनेच्या लाभासाठी कशी करावी नोंदणी?

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ती मदतही करतात. या योजनेसाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या दस्तावेजांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत देण्यात आलेले आरोग्य ओळखपत्र, असंघटीत कामगार ओळखपत्र. हे दोन्ही ओळखपत्र नसतील तर शिधापत्रिका किंवा छायाचित्रासह असणारे कोणतेही ओळखपत्र उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळख पत्र, वाहन चालक परवाना, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका आणि 7/12 उताराही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामी येतो. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने निर्धारित केलेली योग्य ती ओळखपत्रे ग्राह्य धरली जातात.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी 34 निवडक विशेष सेवेंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया तथा 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोनावरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा राज्यातील लक्षावधी नागरिकांनी लाभ घेतला आहे.

या संबंधित अन्य बातम्या वाचा

‘आयुष्मान भारत’ विस्तार:जनआरोग्य योजना रेशन कार्डाशी जोडण्याची तयारी, पाच लाखांच्या विमा संरक्षणासह लाभार्थींची एकूण संख्या जाणार 80 कोटींवर

पाच लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देणाऱ्या पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या (पीएम-जय) लाभार्थींची संख्या आणखी वाढवण्याची तयारी सुरू आहे. सध्या या योजनेंतर्गत ५५ कोटी लाभार्थी आहेत. ही संख्या वाढवून 80 कोटींवर जाऊ शकते. लाभार्थी वाढवण्यासाठी ही योजना रेशन कार्डाशी जोडण्याचा विचार केला जात आहे. यामुळे लाभार्थींचे ट्रॅकिंग शक्य होईल. यासंदर्भात राज्ये आणि नॅशनल अॅथॉरिटीमध्ये अनेक बैठकाही झाल्या. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा