• Home
  • Business
  • Mumbai Bakery Business hit hard as Migrant labourers leave amid coronavirus lockdown

मुंबईत पावचा तुटवडा / मजुरांनी मुंबई सोडताच बेकरी व्यवसायाला जबर फटका, मजुरच नसल्याने ब्रेडसह बेकरी आयटमचा तुटवडा

  • मजूर नसल्याने मालकांनाच करावे लागतेय प्रॉडक्शन, आठवडाभरात अनेक बेकरी युनिट बंद

वृत्तसंस्था

May 19,2020 11:22:00 AM IST

मुंबई. मजुरांनी महानगर सोडताच मुंबईची ओळख असलेल्या वडा-पाव मधून पाव गायब होणार की काय अशी समस्या निर्माण झाली आहे. मजुरांनी मुंबई सोडल्याचा पहिलाच फटका येथील बेकरी व्यवसायाला बसला आहे. या ठिकाणी बेकरी तर सुरू आहेत. पण, काम करण्यासाठी आता मजूर नाहीत. ते सगळेच पायी, ट्रक, सायकल आणि मिळेल त्या वाहनात आपल्या उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि इतर राज्यांतील मूळ गावी गेले आहेत. कोरोना व्हायरस आणि त्यातून लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हातात काम नव्हते. आता काम तर सुरू झाले पण प्रॉडक्शन करण्यासाठी मजूरच नाहीत असे संकट सध्या मुंबईतील बेकरी व्यवसायावर ओढावले आहे.

मजूर नसल्याने मालकांनाच करावे लागतेय प्रॉडक्शन

कुर्ला येथील मेट्रो बेकरीला भेट दिली असता याचे मालक हबीब अंसारी आपले जावई आणि केवळ दोन मजुरांना घेऊन टोस्ट आणि खारी स्वतःच बनवत असल्याचे दिसून आले. ते सांगतात, "मजूर नसल्याने मला आमच्या बेकरीची एक शाखा पूर्णपणे बंद करावी लागली आहे. आता या ठिकाणी सुद्धा केवळ 4 जणांवर काम सुरू असल्याने मी खूप व्यस्त आहे." हबीब यांच्या बेकरीवर रोज 400 ते 500 किलो बेकरी प्रॉडक्ट तयार केले जायचे. पण, आता हे प्रॉडक्शन अवघ्या काही किलोंवर येऊन ठेपले आहे. अंसारी पुढे म्हणाले, "आम्ही बेकरीतील मजुरांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, ते चक्क डबल भाडे देऊन ट्रकमध्येच आपल्या गावी निघून गेले."

आठवडाभरात अनेक बेकरी युनिट बंद

मुंब्रा येथील आणखी एक बेकरी मालक खुर्शीद अंसारी यांनी सांगिल्याप्रमाणे, "बेकरीवर काम करणारे जवळपास सगळेच मजूर आप-आपल्या गावी उत्तर प्रदेशच्या दिशेने निघून गेले. त्यामुळे एका आठवड्यातच मुंब्रातील जवळपास 7 ते 8 बेकरी बंद करण्यात आल्या आहेत." खुर्शीद यांच्या बेकरीवर लॉकडाउनपूर्वी 30 ते 35 मजूर काम कराचे. पण आता ती बेकरी बंद आहे. बेकरी व्यावसायिक हारून सिद्दीकी सांगतात, आम्ही जवळपास 70 बेकऱ्यांना यीस्ट (बेक करण्यासाठी लागणारा एक घटक) पुरवठा करत होतो. आता चक्क 61 बेकरीवाल्यांनी आमच्याकडून यीस्ट मागवणे बंद केले आहे. कारण, सध्या त्या सर्वच बंद आहेत. काही मजूरांनी आपल्या मालकांना सांगून तर काहींनी कोरोना आणि उपाशीपोटी मरण्याच्या भीतीने न सांगताच मुंबई सोडली. अशात बेकरी चालकांना आणि मालकांना पाव, ब्रेड आणि इतर बेकरी प्रॉडक्ट पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने मुंबईत एक प्रकारे बेकरी आयटमचा तुटवडा निर्माण झाला आहे.

X