आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाटा सन्सने कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, “कॅम्पबेल यांचे एअर इंडियामध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. ते उद्योग क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा एअर इंडियाला होईल. जागतिक दर्जाची विमान कंपनी तयार करण्यासाठी मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.
विमान उद्योगात 50 वर्षीय विल्सन यांना 26 वर्षांचा अनुभव आहे. यामध्ये फुल सर्विस आणि लो-कॉस्ट अशा दोन्ही एअरलाइन्सचा समावेश आहे. त्यांनी जपान, कॅनडा आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये 15 वर्षांहून अधिक काळ सिंगापूर एअरलाइन्स (SIA) ग्रुपसाठी काम केले आहे. विशेष म्हणजे SIA ची देखील टाटाच्या मालकीची एअरलाइन विस्तारा मध्ये भागीदार आहे.
टाटा समूहाचा भाग होण्याचा मान
कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, ‘प्रतिष्ठित एअर इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी आणि टाटा समूहाचा भाग होण्यासाठी निवड होणे हा सन्मान आहे. एअर इंडिया जगातील सर्वोत्तम एअरलाइन्सपैकी एक होण्यासाठी एक रोमांचक प्रवास करत आहे. ती महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी मी एअर इंडिया आणि टाटा भागीदारांमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे.’
विल्सन यांनी 1996 मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून केली सुरुवात
विल्सन यांनी न्यूझीलंडमधील कॅंटरबरी विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात वाणिज्य पदव्युत्तर (प्रथम श्रेणी ऑनर्स) पदवी प्राप्त केली आहे. 1996 मध्ये न्यूझीलंडमध्ये सिंगापूर एअरलाइन्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कॅनडा, हाँगकाँग आणि जपानमध्ये एसआयएसाठी काम केले.
2011 मध्ये स्कूटचे संस्थापक सीईओ बनले विल्सन
2011 मध्ये सिंगापूरला परतल्यानंतर, त्यांनी कमी किमतीच्या एअरलाइन स्कूटचे संस्थापक सीईओ म्हणून काम केले. 2016 पर्यंत ते या पदावर होते. एप्रिल 2020 मध्ये पुन्हा स्कूटचे सीईओ होण्यापूर्वी त्यांनी SIA येथे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले.
या वेळी त्यांनी प्राइसिंग, वितरण, ई-कॉमर्स, मर्चेंडाइझिंग, ब्रँड आणि मार्केटिंग, ग्लोबल सेल्स आणि एअरलाइन ओव्हरसीज ऑफिसेस सांभाळले आहे. आता त्यांच्याकडे एअर इंडियाची कमान सोपवण्यात आली आहे. स्कूट एअरलाईनचा त्यांचा अनुभव एअर इंडियाला खूप उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
इल्कर आयसी यांनी नाकारले होते सीईओ पद
टाटा यांनी यापूर्वी तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली होती, परंतु नंतर त्यांनी एअरलाइन्सची जबाबदारी घेण्यास नकार दिला.
टाटाच्या तीन एअरलाईन्स
टाटा सन्सच्या सध्या तीन एअरलाईन्स आहेत. यामध्ये एअर एशिया, विस्तारा आणि एअर इंडियाचा समावेश आहे. टाटा समूहाने 18,300 कोटी रुपयांना एअर इंडियामधील 100% भागिदारी खरेदी केली आहे. 27 जानेवारीला हा करार पूर्ण झाला आणि त्या दिवसापासून टाटा सन्स या कंपनीची मालक झाली.
टाटा सन्सने ताबा घेतल्यानंतर टाटा ही देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. त्याचा संपूर्ण हिस्सा टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.