आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ किती पैसा असेल? त्यांनी कुठे गुंतवणूक केली असेल, असे बरेच प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात. चला तर मग आजच्या बातमीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक संपत्तीची माहिती घेऊया... पंतप्रधान नरेंद्र मोदीही गुंतवणुकीच्या बाबतीत इतर मंत्र्यांप्रमाणे 'रूढिवादी' आहेत. विशेष म्हणजे मोदींनी शेअर बाजारात आतापर्यंत एकही रुपयाची गुंतवणूक केलेली नाहीये. पंतप्रधानांच्या नावे बँकेत 1.86 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि 8.9 लाख रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSS) आहे. यावितिरिक्त 1.5 लाख रुपयांच्या विमा पॉलिसी आणि 2012 मध्ये खरेदी केलेल्या 20,000 रुपयांच्या L&T इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स देखील आहेत.
3.07 कोटींची मालमत्ता
अधिकृत आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 31 मार्च 2021 पर्यंत 3.07 कोटी रुपयांची संपत्ती होती. गेल्या वर्षी ही रक्कम 2.85 कोटी रुपये होती. परंतु, यामध्ये 22 लाख रुपयांची वाढ झाल्याने ही रक्कम 3.07 कोटीवर पोहोचली. एसबीआयच्या गांधीनगर शाखेत चालणाऱ्या त्यांच्या एफडीच्या मूल्यात झालेली वाढ हे त्याचे कारण आहे.
1.86 कोटी रुपयांची एफडी
पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, मोदी यांच्याजवळ 31 मार्च रोजी 1.86 कोटी रुपयांची एफडी होती. ज्याचे मूल्य एका वर्षापूर्वी 1.6 कोटी रुपये होते. पंतप्रधान मोदी यांच्याकडे स्वत:च्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे समोर आले आहे. मोदींकडे 1.48 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. बँक खात्यात 1.5 लाख रुपये आणि 36,000 रुपये रोख आहेत.
1.1 कोटींचे घर
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून कोणतीही नवीन मालमत्ता खरेदी केलेली नाही. त्यांच्याकडे 2002 मध्ये खरेदी केलेले घर आहे, ज्याची किंमत सध्या 1.1 कोटी रुपये आहे. एकूण 14,125 चौरस फुटांच्या या घरात मोदींचा एक चतुर्थांश हिस्सा आहे.
पंतप्रधानांच्या वेबसाइटवर माहिती
आर्थिक वर्षांच्या शेवटी सर्व केंद्रीय मंत्री स्वेच्छेने त्यांची संपत्ती आणि दायित्वांची नोंद करतील असा निर्णय अटलबिहारी वाजपेयी सरकारने घेतला होता. राजकीय नेत्यांच्या जीवनात पारदर्शकता आणणे हा या निर्णयाचा हेतू होता. ही माहिती सार्वजनिक असून पंतप्रधानांच्या वेबसाईटद्वारे मिळवता येईल.
शहा हे मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री
इंग्रजी बिझनेस न्यूज पोर्टल मिंटनुसार, अमित शहा हे मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. गृहमंत्री अमित शहा यांची 31 मार्च 2021 रोजी एकूण संपत्ती 37,91,50,580 म्हणजे सुमारे 38 कोटी होती. गेल्या वर्षी 28.63 कोटी रुपयांत 9.28 कोटी रुपयांची वाढ झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.