आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

436 रुपयात मिळते 2 लाखांचे विमा संरक्षण:जाणून घ्या- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची प्रक्रिया, कोणाला आणि कसा मिळतो लाभ

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर येथील शिल्पा गायकवाड या महिलेचा आकस्मित मृत्यू झाला. काही दिवसाने त्यांचे पती रवींद्र गायकवाड हे पत्नीचे खाते बंद करण्यासाठी बॅंकेत गेले. पत्नीच्या खात्यावर असलेली थोडी बहुत रक्कम वळती करून पत्नीचे खाते बंद करू या उद्देशाने त्यांनी बॅंक गाठली. परंतू स्टेट बॅंकेच्या मॅनेजरने सर्व चौकशी करून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत तब्बल 2 लाखांची रक्कम रवींद्र गायकवाड यांच्या खात्यावर वळती केली. हे पाहून तर शिल्पा यांचे पती रविंद्र काही वेळ थक्क झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

हे सर्व कसे घडले याचा विचार तुम्ही नक्की करत असाल नाही का. त्याचे मुख्य कारण आहे, मृत शिल्पा गायकवाड यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत काही रक्कम कपात झाली होती. अर्थात त्याला शिल्पा गायकवाड यांनी परवानगी दिलेली होती. त्या विमा योजनेअंतर्गत त्यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळाला.

चला तर आज आपण जाणून घेणार आहोत की, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना नेमकी आहे तरी काय, या योजनेचा लाभ कसा घेता येतो, त्यासाठी काय पात्रता लागते, यासह सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. जेणेकरून अनेकांना या योजनेत सहभागी होता येईल...

एक परवडणारी मुदत विमा योजना
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक परवडणारी मुदत विमा योजना आहे. या अंतर्गत 436 रुपयांच्या प्रीमियमवर दरवर्षी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास दाव्याची रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला (नामांकित/सदस्य) दिली जाते.

18-50 वयोगटातील लोकांसाठी लागू
पीएमजेजेबीवाय (PMJJBY)18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे. ज्यांचे बॅंकेत एक खाते आहे. तसेच जे या योजनेत सामील होतात, त्यांच्या खात्यातून स्वयं-डेबिट करण्यास संमती देतात.

1 जून ते 31 मे या एक वर्षांच्या कालावधीसाठी लागू
2 लाख रुपयांची जीवन सुरक्षा 1 जून ते 31 मे या एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे. या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये आहे. प्रीमियमची रक्कम दरवर्षी 436 रुपये आहे. हे ग्राहकांच्या बँक खात्यातून दरवर्षी एका हप्त्यात 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी स्वयं-डेबिट केले जाते. ही योजना लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि इतर सर्व लाइफ इन्शुरन्सद्वारे ऑफर केली जात आहे.

मृत्यू पश्चात कसा करता येईल दावा
तुम्ही हा प्लॅन एलआयसीमार्फत घेऊ शकता, तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत देखील याबद्दल माहिती घेऊ शकता. क्लेम मिळविण्यासाठी तुम्हाला त्या विमा कंपनीकडे किंवा जिथून विमा काढला आहे, त्या बँकेकडे जाऊन दावा करावा लागेल. मृत्यू प्रमाणपत्रासोबत इतर आवश्यक कागदपत्रेही तेथे जोडावी लागतील. हा टर्म इन्शुरन्स असल्याने, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच यामध्ये कव्हरेजचा लाभ मिळेल. मुदत संपल्यानंतरही तो ठीक राहिल्यास योजनेंतर्गत कोणताही लाभ दिला जाणार नाही. तसेच इतर काही स्थिती आहेत, जिथे सदर व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही.

PMJJBY मध्ये प्रीमियम रक्कम कशी कपात होते
या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला दरवर्षी 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जो दरवर्षी मे महिन्यात ग्राहकाच्या बचत खात्यातून स्वयं-डेबिट केले जाईल. या योजनेअंतर्गत EWS आणि BPL सह जवळजवळ सर्व उत्पन्न गटातील सर्व नागरिकांसाठी प्रीमियमचा आर्थिक दर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण त्याच वर्षी 1 जूनपासून सुरू होईल आणि पुढील वर्षांच्या 31 मे पर्यंत असणार आहे. PMJJBY मध्ये विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही.

  • एलआयसी/विमा कंपनीला विमा प्रीमियम - 389 रुपये.
  • बीसी/मायक्रो/कॉर्पोरेट/एजंटसाठी खर्चाची प्रतिपूर्ती - 30 रुपये
  • सहभागी बँकेच्या प्रशासकीय शुल्काची परतफेड - 17 रुपये
  • एकूण प्रीमियम – 436 रुपये

45 दिवसानंतरच लागू जोखीम संरक्षण लागू
ज्या नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवायचा आहे. ते पात्रता अटी तपासून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. जर तुम्ही या योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला दरवर्षी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. दरवर्षी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम कापली जाईल. तुमचे नूतनीकरण केले जाईल.
नावनोंदणीच्या पहिल्या 45 दिवसांपर्यंत सर्व नवीन खरेदीदार या योजनेअंतर्गत दावा करू शकत नाहीत. 45 दिवस पूर्ण झाल्यानंतरच दावा करता येईल. पहिल्या 45 दिवसात कंपनीकडून कोणताही दावा निकाली काढला जात नाही. परंतु जर अर्जदाराचा मृत्यू अपघातामुळे झाला असेल तर या प्रकरणात अर्जदाराच्या कुटुंबीयांना रक्कम दिली जाईल.