• Home
  • Business
  • RBI decision | Repo rates now at 20 year lows; EMI of home loan of Rs 30 lakh is Rs 724. Will decrease

आरबीआयचे 2 बूस्टर / रेपो दर आता 20 वर्षांच्या सर्वात नीचांकी पातळीवर; 30 लाख रु.च्या गृहकर्जाचा ईएमआय 724 रु. घटणार

  • प्रमुख व्याज दर 0.4%ने घटवले, सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते फेड सवलतीला 3 महिन्यांची मुदतवाढ
  • आगामी काळात बँका बचतीवरील व्याज कमी करण्याची शक्यता

दिव्य मराठी

May 23,2020 07:08:00 AM IST

नवी दिल्ली. भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेला दुसरा बूस्टर डोस दिला. रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात शुक्रवारी अनपेक्षितरीत्या ०.४% कपात करण्यात आली. रेपो दर आता ४% आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५% झाला आहे. हा आतापर्यंतचा नीचांकी स्तर आहे. २० वर्षांपूर्वी २००० मध्ये हे दर होते. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा पूर्ण लाभ बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला, तर २० वर्षे मुदतीच्या ३० लाख रुपयांच्या गृहकर्जाचा ईएमआय ७२४ रुपयांनी कमी होऊ शकतो. आगामी काळात बँकांकडून बचतीवरील व्याज कपात होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने दुसऱ्यांदा पतधोरण समितीची बैठक निर्धारित वेळेपूर्वी घेतली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रेपो दर घटवले आहेत. आगामी काळात गरज भासल्यास दरात आणखी कपात केली जाईल. बँकेने यापूर्वी २७ मार्चला रेपो दरात ०.७५% कपात केली होती.

शक्यता : २०२०-२१ मध्ये वृद्धी नकारात्मक राहू शकते

कोरोना संकटामुळे २०२०-२१ मध्ये जीडीपी वृद्धी दर नकारात्मक राहू शकतो अशी शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तवली आहे.

कर्जाच्या हप्तेफेडीस आता ऑगस्टपर्यंत सूट

कर्जधारकांना मोठा दिलासा देत रिझर्व्ह बँकेने मोरेटोरियम तीन महिने आणखी वाढवला आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्तेफेडीस सूट राहील. पूर्वी ही सूट मार्च ते मेपर्यंत होती. मात्र, मुद्दलावर व्याजामुळे ईएमआयची संख्या वाढेल.

> होम आणि ऑटो लोनच्या ईएमआयची गणना एसबीआयच्या दरांवर आधारित आहे. विविध बँकांनिहाय कर्जावरील व्याज दरात १ ते १.५% फरक असतो.

X