आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Restructuring Of All Loans Like Home, Auto, 90% Loan Instead Of 75% Of The Price On Gold

पतधाेरण आढावा:गृह, वाहनसारख्या सर्व कर्जांची पुनर्रचना शक्य, सोन्यावर किमतीच्या 75% ऐवजी 90% कर्ज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेरटाेरियमला मुदतवाढ नाही, मात्र अार्थिक संकटात दिलासा

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पतधोरणाच्या आढाव्यात व्याजदरात कोणताही बदल केला नाही. मात्र, दिलासा देणारे दोन निर्णय जाहीर केले. यानुसार, किरकोळ कर्जाची पुनर्रचना करण्यास मंजुरी दिली असून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांना त्यांचे गृह, वाहन, वैयक्तिक व शैक्षणिकसारख्या कर्जांची पुनर्रचना करून थकबाकीदार होण्याचा धोका टाळता येईल. मार्च २०२० च्या पूर्वीपर्यंत ज्यांचा कर्जफेडीचा हप्ता थकलेला नाही अशांनाच ही सुविधा मिळेल. दरम्यान, कर्जवसुलीत दिलासा म्हणून ५ महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या मोरटोरियमला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि सोन्याच्या किमतीचे प्रमाण (एलटीव्ही) ७५ टक्क्यांवरून वाढवून ९० टक्के केले आहे. कौटुंबिक, व्यावसायिक अडचणींवर यामुळे मात करता येईल.

कर्जाशी संबंधित नेमके काय बदल झाले असे समजून घ्या...

असा होईल लाभ : १ लाखाचे सोने तारण ठेवून ७५ हजारांऐवजी ९० हजारांपर्यंतचे कर्ज

आतापर्यंत १ लाख रुपयांचे सोने तारण ठेवून जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांचे कर्ज घेता येत होते. आता एक लाखाच्या सोन्यावर ९० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेता येईल. तज्ज्ञांनुसार सोन्यावरील एलटीव्ही वाढवल्याने गरजूंना जास्त कर्ज घेता येईल व त्यांना दिलासा मिळेल.

५ लाखांहून अधिक... : गेल्या पाच महिन्यांत सोन्यावर मिळणारे कर्ज झाले दुप्पट

गेल्या मार्च महिन्यात १०० ग्रॅम सोन्यावर जास्तीत जास्त २,६५,५०० रुपयांचे कर्ज मिळत होते. तेव्हा सोन्याचा भाव दहा ग्रॅममागे ३५,४०० रुपये तर एलटीव्ही ७५ टक्के होती. आता तेवढ्याच सोन्यावर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज मिळू शकते. म्हणजे जवळपास दुप्पट.

कर्ज देणाऱ्या संस्थांच्या अडचणी वाढण्याची शक्यता...

तज्ज्ञांनुसार, या निर्णयामुळे कर्ज देणाऱ्या संस्था, विशेषत: गोल्ड लोन कंपन्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर आहे. यात कधीही बदल होऊ शकतो. जर कंपन्यांनी सोन्याच्या किमतीच्या ९० टक्के कर्ज दिले आणि पुढे सोन्याचा भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त उतरला तर कर्ज थकण्याचा धोका वाढेल. कारण कर्जाची रक्कम तारण ठेवलेल्या सोन्यापेक्षा जास्त होईल. २०१३ मध्येही एलटीव्ही ९० टक्के होते. मात्र, नंतर ते कमी करण्यात आले होते.

गोल्ड लोनचे दर

कर्जदात्या संस्था : व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया : ७.५०%

मणप्पुरम फायनान्स : १२-२९%

पंजाब नॅशनल बँक : ८.६०-८.८५%

मुथुट फायनान्स : २७% पर्यंत

बँक ऑफ बडाेदा : ९- ९.७५%

गावात सुरू होईल ऑफलाइन डिजिटल व्यवहार

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीची समस्या पाहता ऑफलाइन मोडमध्ये कार्ड आणि मोबाइलद्वारे किरकोळ डिजिटल व्यवहाराची योजना लवकरच सुरू केली जाईल. चाचणीसाठी अगोदर कमी रकमेच्या व्यवहारासाठी अशी प्रणाली सुरू होईल. चाचणी यशस्वी झाल्यावर त्याची व्याप्ती वाढवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...