लॉकडाऊन घोषणेनंतर बाजारात तेजी : पॅकेजमुळे शेअर बाजाराला दिलासा, सेन्सेक्सची तिसरी सर्वात मोठी उसळी

  • शेअर बाजारातील तेजीची तीन प्रमुख कारणे 

वृत्तसंस्था

Mar 26,2020 10:09:00 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही भारतीय शएअर बाजारात तेजी दिसून आली. बुधवारी तेजी-मंदीसह सुरुवात करणारा बाजार मोठ्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स १८६१.७५ अंकांनी (६.९८%) उसळून २८,५३५.७८ वर बंद झाला.


अंकांच्या दृष्टीने ही आजवरची तिसरी सर्वात मोठी उसळी आहे. तर, निफ्टी ४९६.७५ अंकांसह (६.३७%) वाढीसह ८२९७.८० वर स्थिरावला. या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.७ कोटी रुपयांची भर पडली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून १०८.४१ लाख कोटींवर पोहोचले. कोरोनाबाधित वाढत असूनही अमेरिक सरकारने दिलेल्या २ लाख कोटींच्या मदत पॅकेजमुले जगभरातील शेअर बाजारांना बळ दिले. बुधवारी २३५६ कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. यात १२०७ शेअर्समध्ये वाढ तर ९९३ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीसह कोटक बँक, मारुती, टायटन, एल अँड टी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स वधारले. तर इंडसइंड बँक, ओएनजीसी, आयटीसी आणि बजाज ऑटोचे शेअर्स घसरले. ऊर्जा, वित्त, बँक, वाहने व तेल व गॅस निर्देशांकात१० टक्के तेजी अाली.


शेअर बाजारात तेजी येण्याची तीन कारणे पुढील प्रमाणे :

रिलायन्स इंडस्ट्री आणि एचडीएफसीच्या शेअर्सची जोरदार खरेदी- भारतीय बाजारांत रिलायन्स इंडस्ट्री व एचडीएफसीच्या शेअर्सच्या जोरदार खरेदीने तेजी आली. या दोघांमुळे सेन्सेक्सला ११०० अंकांची वाढ दिली.

भारतही करणार मदत पॅकेजची घोषणा - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच मदत पॅकेजची घोषणा करू शकते.अर्थमंत्री याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताहेत. एका वृत्तानुसार सरकार बाजारात स्थैर्यासाठी ५० हजार कोटींचा निधीची व्यवस्था करू शकते.

अमेरिकी मदत पॅकेज - अमेरिकी सरकारने२ लाख कोटी डॉलरच्या मदत पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर बाजारातील वातावरण सकारात्मक झाले.

X