आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयोदशीला आज धनवर्षाव...:देशात 15 टन सोने विक्रीची आशा, रिअल इस्टेटमध्ये कोरोनापूर्व काळापेक्षा 15-20% विक्री वाढणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा धनत्रयोदशीला ज्वेलरी, रिअल इस्टेट, अॉटोमोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांत धनवर्षाव होण्याची आशा आहे. तज्ज्ञांनुसार, या शुभदिनी देशभरात १५ टनांपर्यंत सोन्याची विक्री होऊ शकते. घरांची विक्री २०१९ च्या तुलनेतही २०% पर्यंत जास्त होऊ शकते. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत मागणी प्रचंड असली तरी सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आली आहे. तथापि, टाटा मोटर्ससह इतर कार कंपन्या या सणासुदीसाठी सज्ज आहेत. दुसरीकडे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांत मोबाइल फोन व टीव्हीची सर्वाधिक मागणी आहे.

कार्सना प्रचंड मागणी, दुचाकी विक्री वाढण्याची मोठी शक्यता
ऑटोमोबाइल क्षेत्रात मागणी प्रचंड असली तरी सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे उत्पादन घटल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, आजवर ७ लाखांपेक्षा जास्त कारची बुकिंग झाली आहे. मात्र डिलिव्हरी उशिराने होईल. धनत्रयोदशी ते दिवाळीपर्यंत देशभरात १ ते सव्वा लाख कारची विक्री होते. यंदा सुमारे ७५ हजारांचीच विक्री होऊ शकेल. दुचाकींची विक्री वार्षिक आधारे २० ते २५% कमी होती. मात्र धनत्रयोदशी ते दिवाळीपर्यंत त्यात १० ते १५% रिकव्हरीची आशा आहे.

इक्विटीतून झालेला फायदा प्रॉपर्टीकडे वळवला जातोय
रिअल इस्टेट क्षेत्रात कोरोनापूर्व स्तराच्या १५ ते २०% जास्त विक्रीची आशा आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले, यंदा धनत्रयोदशी-दिवाळीला रिअल इस्टेट क्षेत्राच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत ३०-४०% वाढ होऊ शकते.२०१९ ची तुलना केल्यास घरविक्री १५% पर्यंत वाढण्याची आशा आहे. त्यामागील एक मोठे कारण म्हणजे मार्च २०२० मध्ये शेअर बाजारातील प्रचंड घसरणीच्या वेळी अनेकांनी इक्विटीत गुंतवणूक केली. त्यात कमावलेला नफा आता रिअल इस्टेटकडे वळवला जात आहे.

२०१९ च्या तुलनेत २०% पर्यंत वाढेल दागिन्यांची विक्री
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी म्हणाले, गतवर्षी सणांची चमक फिकी होती, मात्र यंदा चांगले वातावरण आहे. आरबीआयच्या उदार धोरणांमुळे बँकिंग यंत्रणेत रोकडतेचा प्रवाह आहे. व्याजदर नीचांकी पातळीवर आहेत. विक्रमी तेजीनंतर सोन्यात मोठी घसरण झाली आहे. ते म्हणाले, ‘यंदा धनत्रयोदशीला देशात १५ टन सोन्याचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.’ गतवर्षाच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला दागिने विक्री सुमारे १००% व २०१९ च्या तुलनेत १५-२०% वाढण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...