आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी किमतीवर विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतीत लवकरच दिलासा मिळू शकतो. पाम आणि सोयाबीनच्या किमतीत घसरणीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, किरकोळ किमतीत याचा परिणाम दिसायला आगामी एक महिन्यापासून अधिक काळ लागू शकतो. पाम तेलापासून शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन सर्व खाद्यतेलांच्या किमती गेल्या काही महिन्यांत विक्रमी उंचीवर पाेहोचल्या होत्या. एकट्या डिसेंबर महिन्यात याच्या किमतीत २० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीसह झालेल्या घटनाक्रमांनी याच्या किमतीवर अंकुश लावला आणि आता यामध्ये घसरणीची शक्यता दिसत आहे. खाद्यतेलांमध्ये पाम तेल सर्वात स्वस्त असते आणि याचा वापर प्रामुख्याने होतो. पाम तेलाच्या जागतिक उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशियाची ८५% हिस्सेदारी आहे. तज्ज्ञांनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यानंतर पाम तेलाच्या किमतीत तेजी यायला सुरुवात झाली होती. पाम तेल महाग झाल्याने सूर्यफूल, मोहरी, शेंगदाण्यासह सर्व खाद्यतेलांच्या किमतीत तेजी आली. मात्र, पाम तेलात पुन्हा नरमाई येत आहे. कमोडिटी एक्स्चेंज एनसीडीईएक्समध्ये याचा वायदा भाव डिसेंबरच्या तुलनेत २.८४% घटून ९५० रु. प्रति १० किलोवर आला.
मलेशिया जैवइंधनात २०% आणि ४०% पाम तेल मिसळण्याची आपली योजना वर्षभरासाठी लांबणीवर टाकू शकतो. यामुळे अतिरिक्त मागणी थंड बस्त्यात जाईल आणि पाम तेलाच्या किमतीत आणखी घट येईल. दुसरा मोठा दिलासा सोयाबीनमध्ये दिसू शकतो. या वर्षी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले आहे. सोयाबीनचा वापर कुक्कुटपालन व्यवसायात होतो. या वर्षी अचानक बर्ड फ्लू आल्याने पोल्ट्रीतून मागणी घटेल आणि सोयाबीनच्या किमती घसरत आहेत. देशाची मोठी सोयाबीन बाजारपेठ इंदूरमध्ये १४ दिवसांत सोयाबीनच्या किमती १५% घटल्या आहेत.
खाद्यतेलांच्या किमतींमध्ये ८ ते १०% घसरणीची शक्यता
जागतिक घटनाक्रमातील बदलामुळे खाद्यतेलांमध्ये घसरण येऊ शकते.कच्चे पाम तेल वायदे किमतीत ८ ते १० टक्के घट येऊ शकते. तसे झाल्यास किमती घटतील. - अजय केडिया, एमडी, केडिया अॅडव्हायझरी
या कारणांमुळे घसरतील किमती, एक महिना लागू शकतो
पाम तेल
मलेशिया जैवइंधनात २०% व ४०% पाम तेल मिसळण्याच्या योजनेची अंमलबजावणी एका वर्षासाठी लांबणीवर टाकू शकतो. यामुळे अतिरिक्त मागणी नसेल. मलेशियात लॉकडाऊनमुळे देशातील मागणी कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्ये केंद्राच्या नव्या शुल्क कपातीनेही याचे भाव कमी होत आहेत.
सोयाबीन
देशात या वर्षी १०४.५५ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्के जास्त आहे. सोयाबीनच्या विक्रीवर कुक्कुटपालन उद्योगात बर्ड फ्लू आल्याने परिणाम झाला आहे. यामुळे सोयाबीनची मागणी कमी होत आहे. या दोन्ही कारणांमुळे साेयाबीनचा भाव पडत आहे.
मोहरी
मोहरीचे नवे पीक येत आहे. या वर्षी मोहरीचे चांगले उत्पन्न होण्याची आशा आहे. यामुळे मोहरीच्या किमतीत घट येऊ शकते. केंद्र सरकारने पुन्हा माेहरी तेलात ब्लेंडिंगला परवानगी दिली आहे. म्हणजे, यामध्ये दुसरे स्वस्त तेल मिसळले जाऊ शकते. यामुळे मोहरीच्या तेलाच्या किमतीत नरमाई येऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.