आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेअर बाजारात तेजीचे लक्ष्मीपूजन, सेन्सेक्स 296 अंकांच्या वाढीसह 60,067 वर बंद

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते मुहुर्त ट्रेडिंगचा बेल वाजवून शुभारंभ करण्यात आला. - Divya Marathi
अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते मुहुर्त ट्रेडिंगचा बेल वाजवून शुभारंभ करण्यात आला.

दीपावलीच्या मुहूर्त सत्रात गुरुवारी शेअर बाजारात तेजीचा धमाका दिसला. संवत्सर २०७८ च्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स २९५.७० अंकांच्या वाढीसह ६०,०६७.६२ तर निफ्टी ८७.६० अंकांच्या वाढीसह १७९१६.८० वर स्थिरावले.

मुहूर्त सत्रात सेन्सेक्सच्या यादीतील महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, बजाज ऑटो, एलअँडटी, कोटक बँक, सन फार्मा आणि नेस्लेच्या समभागात लक्षणीय वाढ दिसली. तर आयसीआयसीआय बँक, अल्ट्रा टेक सिमेंट, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज लॅबचे समभाग घसरले.

दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू : विश्वनाथ बोदडे, सहउपाध्यक्ष, एलकेपी सिक्युरिटीज, नाशिक सेन्सेक्सचा ३७ टक्के, तर निफ्टीचा ४० टक्के परतावा मागील संवत्सरात सेन्सेक्सने ३७ टक्के तर निफ्टीने ४० टक्के परतावा दिला आहे. कोरोनाचे संकट, लॉकडाऊन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मरगळ, देशाचा कोसळलेला आर्थिक विकास दर ,वाढती महागाई या पार्श्वभूमीवर दोन्ही शेअर बाजारातील निर्देशांकांनी चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना खुश केले आहे.

संवत्सराच्या अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टीने आपले सर्वकालीन उच्चांक नोंदवले. संवत्सर २०७७ मध्ये अर्थात २०२० मधील दिवाळीपासून ते यंदाच्या दिवाळीपर्यंत सेन्सेक्सने १६४३० अंकांची कमाई केली तर निफ्टी ५१३६ अंकांनी वधारला.

दीर्घकालीन गुंतवणूक सुरूच ठेवावी : एलकेपी सेक्युरिटीजचे फंडामेंटल रिसर्च हेड एस रंगनाथन यांच्या मते, आगामी काळासाठी एस बी आय,भारत इलेक्ट्रॉनिक, व्ही गार्ड, रेमंड, या कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देऊ शकतील. आगामी काळाचा विचार करता बँकिंग, पर्यटन, आय टी, टेक्सटाईल, विद्युत निर्मिती व ग्राहकपयोगी क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक फायदाची ठरू शकते. गुंतवणूक करताना ‘बाय अँड डीप’ चे तंत्र वापरावे, म्हणजे मंदीच्या वेळी खरेदी, तेजीच्या वेळी टार्गेटनुसार विक्री असे व्यवहार करावेत, म्हणजे नुकसान होणार नाही.

आज शेअर बाजार बंद : शुक्रवारी (५ नोव्हेंबर) दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजाराला सुटी असल्याने त्या दिवशी मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार बंद राहतील.

बातम्या आणखी आहेत...