आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार, दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे महाराष्ट्रातील पहिल्या ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर निर्माण करण्यासाठी शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जांबुटके येथील ३१.५१ हेक्टर सरकारी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे मानले जाते. पुढील महिन्यात या क्लस्टरच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असून ४० आदिवासी उद्याेजकांना येथे प्लग अँड प्ले सुविधा उपलब्ध हाेणार आहे.
शासनाच्या उच्चाधिकार समितीची झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नाशिकपासून अवघ्या २० किलोमीटरवरील जांबुटके येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हे क्लस्टर उभे राहणार असून यासाठी ५० काेटींचा निधी आदिवासी विकास विभागाकडून अपेक्षित आहे. क्लस्टरसाठी जमीन शासनाचीच असल्याने त्याच्या भूसंपादनासाठी अडचण आली नाही. ही जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येत असून यावर एमआयडीसीकडून ४० इंडस्ट्रीयल शेड उभारले जाणार आहेत. प्लग अॅण्ड प्ले स्वरूपातील सुविधा असल्याने आदिवासी बांधवांना त्यांचे उद्योग येथे थेट सुरू करता येणार आहे. वर्षभरात हे क्लस्टर कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
अस्सल आदिवासी वस्तूंची हाेणार विक्री
या क्लस्टरमध्ये आदिवासी आणि महिला बचत गटांना संधी उपलब्ध हाेणार आहे. यात इंजिनिअरिंग, स्किल डेव्हलपमेंट, फूड प्रोसेसिंग आणि आदिवासी हस्तकला वस्तूंची निर्मिती असे चार सब क्लस्टर असतील. शिवाय या उत्पादनांचे विक्री केंद्र येथे असेल. नाशिक-पेठ रस्त्यावर अवघ्या २० किलाेमीटरवर हे क्लस्टर असल्याने नाशिककरांना थेट येथे भेट देऊन नागली, वारली, हातसडीचा तांदूळ, आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू , हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची थेट खरेदी करणे शक्य हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.