आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे जगभरातील विद्यार्थी ऑनलाइन शिकताहेत. याचा फायदा ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअप्सनाही होत आहे. या अॅप्सवर विद्यार्थ्यांप्रमाणेच गुंतवणूक वेगाने वाढत आहे. कोरोना काळात सुमारे ६ महिन्यांत देशातील ४ प्रमुख शैक्षणिक अॅपवर सुमारे ३.५ कोटी नवे विद्यार्थी आले आहेत. यात बायजू अॅप सर्वात पुढे आहे. नवीन विद्यार्थी येथे आपला अभ्यास करण्याबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आणि गेम खेळणेही शिकत आहेत. बायजूचे सीआेओ मृणाल मोहित सांगतात की, कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण गरजेचे झाले आहे. मात्र, कोणतीही गोष्ट शंभर टक्के ऑनलाइन किंवा शंभर टक्के ऑफलाइन होऊ शकत नाही. म्हणून भविष्यात अभ्यासाचे संमिश्र मॉडेल चालेल, ज्यात शाळांसोबतच ऑनलाइन शिक्षण खूप महत्त्वाचे असेल. भविष्यातील वर्गात तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा वाटा असेल. यामुळेच लॉकडाऊनदरम्यान बायजूचे वापरकर्ते वेगाने वाढत आहेत.
तर रिसर्च फर्म ट्रॅक्शन टेक्नॉलॉजीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये एज्युकेशन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक तीनपट वाढली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या कंपन्यांनी १.८४ अब्ज डॉलर जमवले. फोर्ब्ज इंडियाच्या एका वृत्तानुसार ही रक्कम ८१ डीलद्वारे जमवण्यात आली तर सन २०१९ मध्ये १०६ डीलद्वारे ५२ कोटी डॉलर जमवण्यात आले होते. एज्युकेशन अॅप वेदांतूचे सीईओ व सहसंस्थापक वामसी कृष्णा सांगतात, कोरोनाकाळात ऑनलाइन अॅप्स मुलांसाठी खूप महत्त्वाचे ठरले. यामुळेच आमच्या प्लॅटफॉर्मवर वेगाने विद्यार्थी वाढताहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या अॅपवर शिकणे खूप उपयुक्त आहे.
बायजू : ७ कोटी अॅप डाऊनलोड, ४५ लाख अॅन्युअल पेड युजर
बायजू अॅपच्या लाँचिंगनंतर पहिल्या चार वर्षांत ४ कोटी फ्री युजर्स त्याचा वापर करत होते. मात्र, गेल्या ५ महिन्यांत ३ कोटी नवे विद्यार्थी आले. ४५ लाख वर्गणीदार पेड अॅन्युअल पॅकेज घेत आहेत. बायजूवर ८५ टक्के विद्यार्थी त्यांच्या पॅकेजचे वार्षिक नूतनीकरणही करत आहेत.
अनअकॅडमी : ३ कोटी विद्यार्थी, महिन्याचा वॉच टाइम एक अब्ज मिनिट
अनअकॅडमी वरही सध्या ३ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. यातील साडेतीन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. कोरोनाच्या सुमारे ६ महिन्यांत दोन लाखांपेक्षा जास्त सक्रिय युजर्स वाढले. त्यांचा मासिक वॉच टाइम सध्या सर्वाधिक आहे, जो दरमहा एक अब्ज मिनिटे झाला आहे.
स्टेपअॅप: गेल्या ६ महिन्यांत वाढले १२ लाख युजर, अनेक भाषांमध्ये अॅप
लॉकडाऊनच्या आधी १० लाख युजर होते. मात्र, गेल्या ६ महिन्यांत १२ लाख युजर वाढले. या अॅपवर दरमहा सुमारे दोन लाख युजर वाढत आहेत. हे अॅप इंग्रजी, हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. ४०० पेक्षा जास्त आयआयटीचे अभियंते व डॉक्टरांनी कंटेंट तयार केला आहे.
मुलांना बुद्धिबळ, कोडिंगचीही शिकवण
> बायजूने एप्रिलमध्ये फ्री लाइव्ह वर्ग सुरू केले. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलचा अभ्यासक्रमही सुरू केला.
> ऑगस्टमध्ये अनअकॅडमीने बुद्धिबळाचे वर्ग सुरू केले. यात विश्वनाथ आनंदसह १३ आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर मुलांना बुद्धिबळ खेळणे शिकवत आहेत. प्रख्यात प्रोग्रॅमिंग कम्युनिटी प्लॅटफॉर्म कोडेशेफसह प्रोग्रॅमिंगचा कोर्सही सुरू करण्यात आला आहे.
> लॉकडाऊनदरम्यान मुलांच्या योग्य विकासासाठी वेदांतू अॅपने मुलांसाठी कोडिंगही सुरू केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.