आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Vodafone's Value Drops By Rs 8,765 Crore As Soon As Government Enters | Marathi News

रेस्क्यू ऑपरेशन:सरकारची एंट्री होताच 8,765 कोटींनी घटले व्होडाफोनचे मूल्य', व्होडाफोनमध्ये आता 35.8% वाटा सरकारचा

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावरील व्होडाफोन-आयडिया लि.मध्ये आता केंद्र सरकार सर्वात मोठे भागधारक असणार आहे. १६ हजार कोटी रु.च्या यंदाच्या थकबाकीच्या बदल्यात सरकारला ३५.८% हिस्सेदारी देण्याचा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवारी घेतला. यासाठी कंपनीच्या स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते आणि एजीआर म्हणजेच अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूचे कर्ज इक्विटीत बदलले जाईल. ते शेअर्सच्या रूपात सरकारकडे असेल.

व्होडाफोन ग्रुपकडे २८.५% , तर आदित्य बिर्ला समूहाकडे १७.८% वाटा असेल. माध्यमांत याबाबत वृत्त झळकताच कंपनीचे शेअर्स २०.५% कोसळले. कंपनीचे मूल्य ८,७६५ कोटी रुपयांनी घटले. मार्केट कॅप ३३.९ हजार कोटींवर आले. सोमवारी ते ४२.६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. सोमवारी कंपनीचा शेअर १४.८५ रुपयांचा होता, मंगळवारी तो ११.८० रुपयांवर आला. दुसरीकडे, सरकारला प्रतिशेअरमागे १० रुपयांची हिस्सेदारी मिळाली आहे.

कंपनीने हा निर्णय का घेतला?
कंपनीवर एजीआर आणि स्पेक्ट्रम परवान्याची ५८,२५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावर १६ हजार कोटींचे व्याज चढले आहे. कंपनीने रोख पैशांऐवजी इक्विटीच्या रूपात व्याज भरण्याचा पर्याय निवडला.

फायदा कुणाचा, कंपनी वा सरकारचा?
शेअर्समध्ये कर्ज फेडल्याने कंपनीची रोकड वाचेल. तिचा वापर ५-जी सेवांत करता येईल. दुसरीकडे, कंपनीची स्थिती पाहता सरकारला थकबाकीचे पैसे मिळणे अवघडच होते. परिणामी इक्विटीच्या रूपात सरकारला कंपनीत हिस्सेदारी मिळत आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?
व्होडाफोन-आयडिया दिवाळखोरीत गेली असती तर भारतीय बाजारात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या केवळ दोनच कंपन्या उरल्या असत्या. यामुळे या कंपन्यांच्या मक्तेदारीचा धोका असता. तो सध्या टळला आहे. यामुळे ग्राहकही एकािधकारापासून वाचले आहेत.

कंपनीवर अशी स्थिती का ओढवली?
व्होडाफोन आणि आयडिया आधी दोन वेगवेगळ्या कंपन्या होत्या. जिअोच्या एंट्रीनंतर त्यांचे वाईट दिवस सुरू झाले. जिओने कॉल दर शून्य करत डेटा अत्यंत स्वस्त केला. कंपनीला नवे ग्राहक मिळाले, तर स्पर्धकांचे प्रचंड नुकसान झाले. याच परिस्थितीत व्होडाफोन व आयडियाचे विलीनीकरण झाले. मात्र, नुकसान थांबले नाही. या नुकसानीला वैतागून दोन्ही समूहांच्या प्रवर्तकांनी भांडवली गुंतवणूक बंद केली. कंपनीवर ५८,२५४ कोटींची थकबाकी आहे. तसेच बँकांचे २६ हजार कोटी रुपये आणि बँक हमीची १.०८ कोटींची थकबाकी आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वास का उडाला?
कंपनीने सरकारला १० रुपयांच्या भावाने शेअर्स दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला. तसेच अनिश्चितताही निर्माण झाली.

कोणत्या अनिश्चितता आहेत?
सरकार सर्वात मोठे हिस्सेदार असल्याने ते संचालक मंडळात असतील का? अशा काही प्रश्नांमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. मात्र, असे काही होण्याची शक्यता कमीच आहे.

कंपनीची स्थिती बीएसएनएलसारखी होईल का?
याची शक्यता खूपच कमी आहे. बाजारात ३ खासगी टेलिकॉम कंपन्या असाव्यात, असा केंद्राचा प्रयत्न आहे. यामुळे मक्तेदारीची जोखीम नसेल. बाजारात सध्या ३ प्रमुख कंपन्या आहेत. जिओकडे ४२.६५ कोटी ग्राहक, एअरटेल ३५.३९ कोटी, तर २६.९० कोटी ग्राहक व्होडाफोन-आयडियाकडे आहेत.

बातम्या आणखी आहेत...