आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:शुद्ध पवित्र स्वराविष्कार हरपला

आशय गुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडित जसराज हे शास्त्रीय संगीताच्या त्या पिढतील गायक होते ज्यांनी शास्त्रीय रागदारी संगीता व्यतिरिक्त इतर संगीत-प्रकारांचे तितकेच कौतुक केले व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना सामान लेखले. संगीत कोणत्याही प्रकारचे असो, ते "संगीत' आहे तो पर्यंत मला आवडतं, ही त्यांची धारणा होती. "मला रॉक, पॉप संगीत आवडतं' इथपासून 'मायकल जॅकसन व मॅडोना यांचे संगीत मला आवडते' असं म्हणणारे पंडित जसराज हे वेगळे ठरतात. जसराज यांच्या नंतरच्या पिढीतील कलाकारांनी हा वैचारिक बदल पुढे नेला व कोणत्याही कलेला समान पातळीवर बघण्याची वृत्ती बळावत गेली.

१३ जानेवारी २००२ हा तो दिवस होता. ४९ व्या सवाई गंधर्व संगीत संमेलनाचा तो दुसरा व शेवटचा दिवस होता. पहिल्या सत्राची सांगता पंडित भीमसेन जोशी यांच्या राग शुद्ध सारंग, अभंग व भैरवी ने झाली होती. संध्याकाळी दुसरे सत्र सुरु झाले व त्याची सुरुवात राशिद खां यांचे गायन व नंतर झरीन दारूवाला-शर्मा यांचे सरोद वादन यांनी झाली. पं फिरोझ दस्तूर यांच्या "मारू बिहाग' ने एक वेगळाच रंग चढवला व शेवट पंडित जसराज व्यासपीठावर दाखल झाले. त्या दिवशी मी जसराज यांना पहिल्यांदा ऐकले. त्यांनी गायलेला "जयजयवंती' हा राग मला आज देखील आठवतो आहे. आणि त्यांच्या निधनाने आपण काय गमावलं आहे याची जाणीव देखील होते आहे.

शास्त्रीय संगीतासारख्या सुरुवातीला क्लिष्ट वाटणाऱ्या कलेची प्रस्तुती कशी असावी या बाबत प्रत्येक कलाकाराच्या मनात काही स्वतंत्र विचार असू शकतात. परंतु गाणं समजणारा श्रोता व त्या कलेकडे उत्सुकता किंवा कुतूहल या भावनेने आलेला नवा श्रोता या दोघांना आपल्याकडे आकर्षित करणे हा फार कमी कलाकारांना जमते. त्यात सर्व श्रोत्यांना "खुश' करणे या नादात अनेक कलाकार सादरीकरणात कसरती करून टाळ्या मिळवण्याचा देखील मार्ग निवडतात. परंतु पंडित जसराज यांनी जाणकार व गाण्याची समाज नसलेल्या परंतु आनंद घ्यायला येणाऱ्या अशा दोन्ही श्रोत्यांना आनंद तर दिलाच पण तो स्वतःच्या कलेचा दर्जा उत्कृष्ट ठेवून! त्यात कधीही कोणतीही तोडजोड झाली नाही.

मैफल सुरु होण्याआधी सुंदर जुळलेले तंबोरे व शेवटच्या श्रोत्यापर्यंत पोचणारा त्यांचा नाद, त्यात स्वच्छ मिसळणारा सूर, संथ लयीत बढत होणारी आलापी, तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा आवाज, खर्जाचा स्वच्छ स्वर, मींड, जलद व तरीही स्वच्छ आणि सुरेल ताना, लयक्रीडा करत जाणारी सरगम ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य म्हणावी लागतील. त्यात त्यांच्या खर्ज स्वराची तर लोकं आतुरतेने वाट बघायचे. स्वच्छ खर्जाचा स्वर हे स्वराचे एक वेगळेच भाव-दर्शन असते. त्याचा श्रोत्यांना अनुभव करून दिल्यानंतर पुढच्या दोन्ही सप्तकातील स्वरांना गोंजारत ते तार सप्तकातील सूरापर्यंत अलगद मींड घेऊन श्रोत्यांना चकित करून सोडायचे. बडा ख्यालातील रचना असो किंवा पुढे बंदिशीचे सादरीकरण असो, शब्दांचा स्पष्ट उच्चार व त्यांना दिलेलं महत्व हे त्यांच्या गाण्याची विशेषता म्हणता येईल.

सवाई गंधर्व महोत्सवातील त्या मैफली नंतर पंडित जसराज यांना अनेक ठिकाणी अनेक वेळा ऐकायचा योग आला. मुंबईचे गुणिदास संगीत संमेलन असो किंवा पार्ल्याचे ह्र्दयेश आर्टस् फेस्टिवल असो, त्यांची मैफल रंगली नाही असं कधी झालं नाही. परंतु या रंगणाऱ्या मैफलीत त्यांच्या भजनांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. "ब्रजे बसंतम नवनीत चौरंग', "गोविंद दामोदर माधवेती', "माई सावरे', "ओम नमो भगवते वासुदेवाय' ही त्यांची गाजलेली भजनं श्रोत्यांनी नक्कीच ऐकायला हवी. शब्दोच्चार, त्याची लयीशी घातलेली सांगड, शेवटपर्यंत टिकवून ठेवलेला सूर व एकूण सादरीकरणात आढळणारे माधुर्य हे त्यांच्या भजनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अर्थात यात त्यांच्या मनात असलेला भक्तिभाव देखील तितकाच कारणीभूत होता.

पंडित जसराज हे शास्त्रीय संगीताच्या त्या पिढतील गायक होते ज्यांनी शास्त्रीय रागदारी संगीता व्यतिरिक्त इतर संगीत-प्रकारांचे तितकेच कौतुक केले व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना सामान लेखले. संगीत कोणत्याही प्रकारचे असो, ते "संगीत' आहे तो पर्यंत मला आवडतं, ही त्यांची धारणा होती. त्यांच्या आधीच्या पिढीतील काही दिग्गज गायकांचे सिनेमा संगीत किंवा इतर प्रकारच्या संगीताकडे थोड्या कनिष्ठ नजरेने बघण्याची उदाहरणं सर्वश्रुत आहेत. त्या तुलनेने अगदी वेगळी भूमिका घेणारे, "मला रॉक, पॉप संगीत आवडतं' इथपासून 'मायकल जॅकसन व मॅडोना यांचे संगीत मला आवडते' असं म्हणणारे पंडित जसराज हे वेगळे ठरतात. जसराज यांच्या नंतरच्या पिढीतील कलाकारांनी हा वैचारिक बदल पुढे नेला व कोणत्याही कलेला समान पातळीवर बघण्याची वृत्ती बळावत गेली.

त्यांच्या याच विचारामुळे जसराज हे नव्या पिढीशी अगदी मोकळेपणाने जोडले गेले. ते आपल्या सर्वांना "रिऍलिटी शो' मध्ये परीक्षक म्हणून दिसले, तिथल्या युवा कलाकारांना प्रोत्साहन देताना दिसले व त्यांनी तिथे आपले गायन देखील सादर केले. तरुण पिढीला वेळ द्यायला हवा, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना योग्य ती संधी द्यायला हवी या मताचे ते होते. नाहीतर बहुतांश ज्येष्ठ कलाकार हे तरुण पिढीतील रियाजाचा अभाव निदर्शनास आणून देताना आढळतात किंवा एकंदर पूर्वीच्या काळात रममाण होऊन "आजची परिस्थिती' या विषयाकडे जरा नाखुशीनेच बघतात. जसराज या बाबतीत एकदम वेगळे ठरले. त्यांचा माध्यम क्षेत्रात देखील वावर होता व संगीत या विषयाचा प्रचार होण्यास त्याची पुरेपूर मदत झाली.

कदाचित याच कारणामुळे पंडित जसराज हे शिष्य घडवण्यास देखील यशस्वी ठरले. संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, रतन मोहन शर्मा हे त्यांचे शिष्य आज त्यांची विद्या पुढे नेत आहेत व संगीताची सेवा करत आहेत. याच बरोबर त्यांनी "जसरंगी जुगलबंदी', '"हवेली संगीत' या सारखे प्रयोग करून सादरीकरणात एक नवीन आयाम समाविष्ट केले. भारतीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी अमेरिका व कॅनडा येथील काही शहरांमध्ये विद्यालयाची स्थापना केली.

पंडित जसराज यांच्या निधनाने एक मोठा कालखंड मागे पडला आहे. जवळ-जवळ आठ दशकं गायन सादर करताना ते एकीकडे भारतीय शास्त्रीय संगीतातील सुवर्णकाळाचे साक्षीदार तर होतेच परंतु दुसऱ्या बाजूला ते आधुनिक काळाशी, संगीताशी जोडून घेणारे आजच्या पिढीला हवेहवेशे वाटणारे कलाकार देखील होते. अनेक दशकांची कारकीर्द असलेल्या कलाकारांच्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. या पुढे इतकी दशकं एखाद्या कलाकारा कडून सातत्याने संगीताचे सादरीकरण होईल का, किंवा त्याला/तिला तशा प्रकारचे श्रोते लाभतील का असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पंडित जसराज आपल्या बरोबर तो काळ घेऊन गेले आहेत. कदाचित, कायमचा!

gune.aashay@gmail.com

संपर्क - ९८३३८१४२२३