आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रसिक स्पेशल:आम्ही "ठाकरे'... "ठाकरे' या रानाची पाखरे!

अभिजित कुलकर्णी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या लिखाणाचा उद्देश आदित्य आणि तेजस ठाकरे बंधुंची वाहवा करण्याचा नाही तर एका नावाजलेल्या राजकीय घराण्यातील नवी पिढी राजकारण करताना पर्यावरणासारख्या अत्यंंत महत्त्वाच्या पण एरवी तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या विषयाला केंद्रस्थानी आणत आहे, याकडे लक्ष वधण्याचा आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा समर्थ वारसा लाभला आहे म्हणून निरुद्देशपणे कुरघोडीचे राजकारण करत राहणारी मुबलक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहावयास मिळतात. साहजिकच या भाऊगर्दीत अशाप्रकारे पर्यावरण संवर्धनाचे ध्येय बाळगून त्या विचाराने जाणीवपूर्वक वाटचाल करणारी राजकारण्यांची नवी पिढी तयार होत असेल तर सामाजिक चळवळींच्या हृासाच्या सध्याच्या काळात ते नक्कीच आश्वस्त करणारे म्हटले पाहिजे.

ध्येयवादाने प्रेरीत असलेल्या १९५०-६० च्या दशकांतील धुरंधर राजकारण्यांच्या तिसऱ्या पिढ्या तर ८०-९० च्या दशकात स्वतंत्रपणे पुढे आलेल्या राजकारण्यांच्या दुसऱ्या पिढीचा राज्यात सध्या बऱ्यापैकी बोलबाला आहे. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीतली ही ‘यंग ब्रिगेड’ पूर्णवेळ राजकारण करताना त्याला ‘प्रोफेशनल’ पद्धतीची जोड देताना दिसते. पंकजा मुंडे असोत, अमित देशमुख असोत, सुजय विखे असोत की रोहीत पवार असोत... प्रत्येकाने सक्रीय राजकारणाच्या पटावर आपल्या पद्धतीने मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरे घराण्याची तिसरी पिढी सुद्धा पर्यावरणाची पताका फडकावत आपले वेगळेपण जपताना दिसते. गेल्या काही दिवसांत आदित्य व तेजस हे ठाकरे बंधू पर्यावरणाशी निगडित असलेल्या दोन वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आणि ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवून गेली.

राज्याच्या कॅबिनेटमध्ये आदित्य यांचा समावेश होणार हे निश्चित झाल्यावर त्यांच्याकडे आवडीच्या विषयातले पर्यावरण खाते येणार, असा अंदाज अनेकांना आला होता. त्यामागे कारण होते ते आदित्य यांची मुंबई मेट्रो प्रकल्पातील आरे कारशेड बाबतची ठाम भूमिका आणि इतरत्रही विकासाच्या नावाखाली झाडांवर सर्रास कुह्राड चालविली जाण्याला त्यांचा असलेला विरोध. त्यानुसार पर्यावरण मंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ते धडाकेबाजपणे काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. पण, पाठोपाठ आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांचेच प्राधान्यक्रम बदलून गेले आणि तात्पुरत्या स्वरुपात का होईना पण बहुतेकांना आपापला अजेंडा मागे सारावा लागला. पर्यावरणाच्या बाबतीत आदित्य यांचेही तसेच काहीसे झाले असावे. मात्र, आता केंद्र सरकारच्या नव्या कोळसा खाणींना परवानगी देण्याच्या मुद्द्याला विरोध दर्शवत आदित्य आपला अजेंडा रेटण्यासाठी सरसावले आहेत. केंद्राने कोळसा खाणींसाठी दिलेल्या या परवानग्यांमध्ये प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळच्या खाणीचाही समावेश असल्याचे दिसताच आदित्य यांनी त्याविरोधात थेट केंद्राशी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयाविरोधात लगेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचा आशय देखील ट्विटरव्दारे सार्वजनिक व्यासपीठावर मांडला आहे. आम्ही राज्यातील वन्य जीवांचे नुकसान सहन करू शकत नाही अशी ठाम भूमिका आदित्य यांनी घेतली आहे. केंद्राने निर्देशित केल्यानुसार या परिसरात खाणी सुरू झाल्या तर त्यामुळे ताडोबा आणि अंधारी पट्ट्यातील वन्य जीवनच उद्ध्वस्त होण्याचा धोका लक्षात घेता, आपण हे घडू देणार नसल्याचे सांगत त्यांनी केंद्रावर शरसंधान  केले आहे. 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत बंदर कोळसा ब्लॉक परिसरात कोळसा खाणींसाठी परवानगी दिल्यास वाघांच्या अस्तित्वासह अन्य वन्य प्राण्यांचे कॉरिडॉर उद्ध्वस्त होणार असल्याचा आक्षेप काही स्थानिक पर्यावरण प्रेमींनी घेतला आहे. बंदर कोळसा ब्लॉक परिसराचे भौगोलिक महत्त्व पर्यावरणदृष्ट्या अनन्यसाधारण आहे. हा भाग ताडोबा प्रमाणेच बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील वन्य प्राण्यांसाठी महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. असा कॉरिडॉर वन्य जीवांच्या अस्तित्वासाठी अत्यंत गरजेचा असतो. पण, तिथे कोळसा खाणींसारखे प्रकल्प सुरू झाल्यास वाघांसह वन्य जीवांमध्ये तीव्र संघर्ष उभा राहील. या ठिकाणच्या मानवी वस्त्यांमधील हिंस्र प्राण्यांचा वावर आणि हल्ले यामध्ये वाढ होऊन उभयतांच्या जिवाला एकमेकांपासून धोका उत्पन्न होईल, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आदित्य यांनी या आणि अशा मुद्द्यांकडे अंगुलीनिर्देश करत राज्याचा पर्यावरण मंत्री या नात्याने केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना लिहिलेले पत्र पर्यावरणवाद्यांना बळ देणारे आहे. किंबहुना, तसे ते मिळावे याच उद्देशाने त्यांनी त्यातील तपशील  सोशल मीडियाचा आधार घेत जगजाहीर केला. एवढेच नव्हे तर तर प्रसंगी या मुद्यावरून केंद्राशी संघर्ष करण्याची तयारी असल्याची जोडही त्याला द्यायला ते विसरले नाहीत. या निर्णया विरोधात केंद्राला पाठवलेल्या पत्रातील भाषा विनंतीची आहे, पण ‘बिटवीन द लाईन्स’ बऱ्याच अर्थपूर्ण आहेत. भविष्यात या प्रश्नी काय तोडगा निघतो ते पाहणे औत्सुक्याचे असले तरी तूर्त या निमित्ताने आदित्य यांनी पर्यावरणवादी म्हणून आपली प्रतिमा अधिक ठळक करून घेण्याची संधी साधण्याचे चातुर्य दाखविले हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.

एका बाजूला आदित्य यांनी वन्य प्राणी आणि पर्यावरण रक्षणासाठी असा पवित्रा घेतला असताना दुसरीकडे त्यांचे लहान बंधू तेजस यांनी पालीची एक दुर्मिळ आणि अज्ञात अशी प्रजाती शोधून काढत आगळ्या वेगळ्या पद्धतीने पर्यावरण संवर्धनाला हातभार लावला आहे. तेजस यांचे प्राणी, पक्षी प्रेम सर्वज्ञात आहे. सर्प, पाली, सरडे अशा एरवी सहसा लोक ज्यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंत करतात त्या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी तर त्यांना विशेष ममत्व आहे. त्यामुळे आपल्या समविचारी मित्रांसमवेत ते जंगले तसेच डोंगर-कपाऱ्यांत फिरण्याचा त्यांना छंद आहे. त्यामागचा उद्देश केवळ भटकंती एवढाच नसतो तर दुर्मिळ प्रजाती शोधणे, संशोधन करणे यावर त्यांचा कटाक्ष असतो. 

मध्यंतरी कर्नाटक मधील सकलेशपूर भागातल्या जंगलात फिरत असताना परिसरातल्या उभ्या शिळांमध्ये तेजस आणि त्यांच्यासोबत असलेले अक्षय खांडेकर, शौनक पाल व इशाम अगरवाल या चौघांना वेगळ्या प्रकारच्या पाली आढळल्या. या पालींची गोलाकार बुब्बुळे, इतर पालींच्या तुलनेत अधिक असणारी लांबी, कातडीचा रंग आणि नरांच्या पायावरील ठराविक आकाराच्या ग्रंथी यामुळे त्या भारतात सामान्यत: आढळणाऱ्या अन्य पालींच्या तुलनेत वेगळ्या असल्याचे त्यांच्या नजरेत भरले. मग या मंडळींनी त्यावर अधिक खोलात जाऊन संशोधन सुरू केले. त्यासाठी या कुळातल्या पालींचे वेगवेगळे नमुने तपासले. अगदी जनुकीय अभ्यासापर्यंत त्याचा पाठपुरावा केल्यावर पालींची ही प्रजाती आजवर ज्ञात असलेल्या भारतीय पाली प्रजातींपेक्षा वेगळी असल्यावर शिक्कामोर्तब झाले. मग त्याचे नामकरण वगैरे पुढले सोपस्कार पार पडल्यावर त्या संदर्भातला शोधनिबंध नुकताच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. तब्बल चार ते पाच वर्षाच्या संशोधनाअंती या नव्या प्रजातीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 

पश्चिम घाटातील जैव विविधतेच्या दृष्टीकोनातून तेजस आणि त्यांच्या टीमने केलेली ही कामगिरी नक्कीच खूप मोलाची ठरणार आहे. त्यामुळे तेजस यांची या क्षेत्राशी संबंधित मंडळींकडून वाखाणणी होत आहे. या अगोदर देखील तेजस आणि टीमने पश्चिम घाटामध्ये एक वेगळ्या प्रजातीचा सर्प प्रथमच शोधून काढला होता. तेजस यांनी तो शोधल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘स्नेक बोईगा ठाकरे’ असे करण्यात आले आहे, हे विशेष. 

आदित्य आणि तेजस यांचे चुलत बंधू व राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे देखील प्राणीप्रेमी आहेत. या लिखाणाचा उद्देश ठाकरे बंधुंची वाहवा करण्याचा नाही तर एका नावाजलेल्या राजकीय घराण्यातील नवी पिढी राजकारण करताा पर्यावरणासारख्या अत्यंंत महत्त्वाच्या पण एरवी तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या विषयाला केंद्रस्थानी आणत आहे, याकडे लक्ष वधण्याचा आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा समर्थ वारसा लाभला आहे म्हणून निरुद्देशपणे कुरघोडीचे राजकारण करत राहणारी मुबलक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहावयास मिळतात. साहजिकच या भाऊगर्दीत अशाप्रकारे पर्यावरण संवर्धनाचे ध्येय बाळगून त्या विचाराने जाणीवपूर्वक वाटचाल करणारी राजकारण्यांची नवी पिढी तयार होत असेल तर सामाजिक चळवळींच्या हृासाच्या सध्याच्या काळात ते नक्कीच आश्वस्त करणारे म्हटले पाहिजे. 

abhikul10@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser