आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडिया-मेनिया:सावधान ! फेसबुक तुमच्यात फूट पाडतंय...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक भोसले

अफवा, चुकीच्या बातम्या आणि द्वेषात्मक आशयाचा अधिकाधिक गतीनं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाजमाध्यमं हे महत्त्वाचे वाहक म्हणून काम करतात. आपल्याला कदाचित वाटू शकतं की, आपल्या लोकांना कोणतंही संवाद तंत्रज्ञान द्या, त्याचा वापर ते फक्त द्वेष पसरविण्यासाठीच करू शकतात. काही प्रमाणात हे खरंही आहे. पण तुमच्या हातात असणारं संवाद तंत्रज्ञानच म्हणजे विशषत: सोशल मिडिया तुम्हांला द्वेष पसरविण्यासाठी प्रवृत्त करत असेल? त्याची रचनाच द्वेष पसरविण्यासाठी पूरक असेल तर?

समाजमाध्यमं समाजात तेढ निर्माण करतात असं अनेक वेळा आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या घटनांमुळं वाटत असतं. फेक न्यूज, अफवा, द्वेषात्मक आशय, व्हिडिओ, छायाचित्रं यांचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भारतात तर अनेक वेळा हे आपल्या लक्षात आलं आहे. समाजमाध्यमांमधून खोट्या आणि द्वेषात्मक आशयाच्या झालेल्या प्रसारामुळं विशिष्ट समुदाय, विचारधारा, सामाजिक समुह, संस्था यांना टार्गेट केलं गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा तर लोकांचे जीवही गेले आणि तणावाची परिस्थितीही निर्माण झाली. यासाठी अनेक वेळा समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांना दोष देता येतो, तसंच माध्यमांचा वापर करण्याची साक्षरता नसल्याचंही सांगितलं जातं. पण आता असं लक्षात आलंय की, आपण जी समाजमाध्यमं वापरतो, त्यातही विशेषत: फेसबुक हे तंत्रज्ञान म्हणूनच समाजात तेढ निर्माण करणारं आहे. 

समाजमाध्यमं समाजात तेढ निर्माण करतात का? ही चर्चा २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सुरू झाल्यानंतर फेसबुकच्या संशोधन टीमनं यावर काम करायला सुरूवात केली होती. दोन वर्ष संशोधन केल्यानंतर फेसबुकच्या ह्या संशोधकांच्या टीमच्या असं लक्षात आलं की, फेसबुकचा अल्गोरीदम समाजात तेढ निर्माण करण्यास आणि विभाजनास कारणीभूत ठरत आहे. अल्गोरिदम म्हणजे फेसबुकची एक संख्यात्मक तांत्रिक प्रणाली... तुम्ही फेसबुक उघडल्यानंतर तुमच्या टाईमलाईनवर कोणाच्या, कोणत्या आणि कधीच्या पोस्ट, कोणत्या क्रमाने दाखवायच्या हे ठरविण्याचं काम हे अल्गोरिदम करत असतं. हे ठरविण्यासाठी तुमच्या मित्रयादीत कोण आहे, तुम्ही कोणासोबत असता, कोणाचे फोटो लाईक्स करता, कोणत्या पेजेसना लाईक्स करता, कोणाच्या कोणत्या पोस्टवर कमेंट करता ह्या सगळ्या माहितीवर प्रक्रिया करून तुम्ही फेसबुक उघडल्यानंतर तुम्हांला काय दाखवायचं हे फेसबुकचा अल्गोरिदम ठरवत असतो. लोकांना अधिकाधिक वेळ फेसबुक वापरण्यासाठी किंवा खिळवून ठेवण्यासाठी ही प्रणाली फेसबुकसाठी महत्त्वाची आहे.

फेसबुकची ही अल्गोरिदम प्रणाली समाजात फक्त तेढ निर्माण करत नाही तर द्वेषात्मक आशयाचा प्रसार करणाऱ्यांच्या विशेषत: उजव्या विचारधारेच्या लोकांच्या मतांना फेसबुकवर प्रोत्साहन मिळत असल्याचंही ह्या संशोधकांच्या लक्षात आलं. फेसबुकचा जागतिक व्याप पाहता ही गंभीर बाब होती. त्यामुळं फेसबुकने हे थांबविण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलणं अपेक्षित होतं. पण झालं उलटंच, फेसबुकचे मालक आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनाला केराची टोपली दाखविली, एवढंच नव्हे तर हा संशोधन प्रकल्पही बंद केला गेला. फेसबुकच्या अल्गोरिदममुळं वाढत असलेली सामाजिक तेढ लक्षात घेता त्यासंबंधी कोणतीही महत्त्वाची पावलं उचलण्यास फेसबुकच्या उच्चपदस्थांनी असमर्थता दर्शविली. हे सगळं २०१८ मध्ये घडलं. 

दोन वर्षानंतर द वॉल स्ट्रीट जर्नल या माध्यमसंस्थेनं २६ मे २०२० रोजी या सर्व घडामोडी संदर्भातली महत्त्वाची स्टोरी प्रकाशित केली. त्यामुळे फेसबुकला अशा पद्धतीच्या धोरणांमुळं आता मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. फेसबुक ही समाजमाध्यमांमधली सर्वात मोठी कंपनी आहे. व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामची मालकीही त्यांच्याकडेच आहे. कंपनीचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग सातत्यानं तेढ निर्माण करणारा आशय, खोट्या बातम्यांचा फेसबुकवरून होणारा प्रसार याबदद्ल चिंता व्यक्त करत असतो. पण फेसबुकचा अल्गोरिदमच यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं संशोधन फेसबुकने लपवणं, त्यासंबंधी कोणतीच पावलं न उचलणं यामुळं फेसबुकची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

अर्थात याला सध्या अमेरिकेमध्ये घडत असणाऱ्या गोष्टीही कारणीभूत आहेत. जगातील बहुतांश महत्त्वाच्या समाजमाध्यम कंपन्या ह्या अमेरिकन आहेत. अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं ह्या समाजमाध्यम कंपन्यांचं तंत्रज्ञान, कार्यपद्धती या सगळ्याचा उहापोह आता मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. 

राजकारण आणि विशेषत: निवडणुका हे समाजमाध्यमांसाठी महत्त्वाचे महसुलाचे स्त्रोत आहेत. तसंच खोट्या बातम्यांचा सर्वाधिक प्रचार आणि प्रसार हा निवडणुकीच्या काळातच पाहायला मिळतो असं अनेक संशोधानांती सिद्ध झालं आहे. अशामध्ये समाजमाध्यमांचा वापर करून खोट्या बातम्यांचा प्रसार करण्यात आणि द्वेष पसरविण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील आघाडीवर असतात. त्यांनी केलेल्या अशाच एका चुकीच्या आणि खोट्या तथ्यांवर आधारलेल्या ट्विटवर ट्विटरकडून त्यांच्या धोरणानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई करत ट्विटरनं त्यांच्या माध्यमाचा खोट्या बातम्या आणि द्वेष पसरविण्यासाठी वापर करू दिला जाणार नाही असा अप्रत्यक्ष संदेश अमेरिकेच्या राष्ट्रध्याक्षांना आणि त्यांच्या समर्थकांना दिला. हे सगळं होत असताना मार्क झुकेरबर्गनं मात्र समाजमाध्यमांनी अशा पद्धतीची तथ्यांची तपासणी करण्याविरोधात भूमिका घेतली होती. म्हणजे काय तर समाजमाध्यमांचा कशासाठी वापर होतोय याच्याशी देणं घेणं न ठेवता आपण फक्त पैसे कमावत राहण्याची ही भूमिका होती. समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती असायला हवं. आपण ज्यांचा वापर करतो आहोत ती समाजमाध्यमं आणि तंत्रज्ञान मुळातच तेढ निर्माण करण्यासाठीच आहे याची जाणिव असणं गरजेचं आहे. 

हे फक्त अमेरिकेत घडतंय असं नाही. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतातील फेसबुकच्या राजकीय, सामाजिक व्यवहार आणि कार्यपद्धतीबद्दल काम झालेलं आहे. त्यावर सिरिल सॅम आणि परंजोय गुहा ठाकूरता या अभ्यासकांनी "द रियल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया' हे पुस्तकही लिहिलं आहे. ते मराठीतही भाषांतरित झालेलं आहे. भारत ही फेसबुकसाठी मोठी बाजारपेठ आहे. फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहेत हे याठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. मंगळवारी २०२० सालचा डिजिटल न्यूज रिपोर्ट रॉयटर्स माध्यम संशोधन संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला. त्यातही फेसबुकवरून सर्वाधिक २८ टक्के खोट्या बातम्यांचा प्रसार केला जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आता फेसबुकचे कर्मचारीही कंपनीच्या तेढ निर्माण करणाऱ्या कार्यप्रणालीचा विरोध करताना दिसत आहेत. 

फेसबुकचे वापरकर्ते म्हणून तुमच्यासाठी विचार करण्याची गोष्ट म्हणजे, तुम्ही फेसबुकला नियंत्रित करता की फेसबुक तुमच्या वापर करण्याला, व्यक्त होण्याला, आवडी-निवडीला आणि विचार पद्धतीला नियंत्रित करतं आहे ? 

bhosaleabhi90@gmail.com

लेखकाचा संपर्क - ८६६८५६१७४९

बातम्या आणखी आहेत...