आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडिया-मेनिया:आंदोलन... जनचळवळ अन् गोदी मीडिया...!

अभिषेक भोसले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरात सरकार विरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनांमध्ये काही दिल्लीस्थित वृत्तवाहिन्यांना आंदोलकांनी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. तसंच आंदोलकांनी त्यांच्याविरोधात गोदी मीडिया गो बॅकच्या घोषणाही दिल्या. आंदोलकांनी माध्यमांविरोधात घेतलेली ही भूमिका समजून घेतली पाहिजे.

उत्तर भारतात थंडीची लाट येण्यापूर्वी शेतकरी आंदोलनाने दिल्ली वातावरण तापले आहे. ह्या शेतकरी आंदोलनाने देश ढवळून निघाला आहे. आंदोलनाचा प्रभाव पाहता आणि त्याचा दिल्लीवर होणारा प्रपभाव पाहता उशीरा का होईना मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांना हे आंदोलन कव्हर करण्याची गरज जाणवली आणि मग ह्या वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी ‘चलो आज कुछ तुफानी करते है, किसान से बात करते है’ या आवेशात आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. आंदोलनकर्त्यांपैकी त्यांचे स्वागत करायला कोणीच इच्छूक नव्हते. उलट आंदोलक त्यांच्यावर बहिष्कार घालण्याच्या मनस्थितीमध्ये होते. आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वाच्या वृत्तवाहिन्यांशी संवाद साधण्यास नकार दिला. हे सगळं एवढ्यावरच थांबले नाही तर त्या पत्रकारांना अपमानित करण्यात आले. पुढं ह्या वृत्तवाहिन्यांच्या विरोधात गोदी मीडिया गो बॅक चे नारे देण्यात आले. ह्या सर्व घडामोडींचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

शेतकरी या विशिष्ट वृत्तवाहिन्यांवर का चिडले आहेत? झी न्यूज, आज तक आणि रिपब्लिक टीव्ही या तीन वृत्तवाहिन्यांवर दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांविरोधात आम्ही मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहोत पण ह्या दिल्लीस्थिती वृत्तवाहिन्यांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. जेव्हा आता आम्ही दिल्लीकडे कूच केली तेव्हा ह्या माध्यमांना आम्ही दिसायला लागलो. त्यामुळे आता आम्हांला त्यांच्याशी बोलायचे नाही. तसेच या वृत्तवाहिन्या आता ज्या पद्धतीने आंदोलनाचे वार्तांकन करत आहेत, ते शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय देणारे वार्तांकन नाही असेही आंदोलकांना वाटतं आहे. उलट या वृत्तवाहिन्या त्यांच्या वार्तांकनामधून आंदोलनाला बदनाम करत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. विशेषत: झी न्यूज वृत्तवाहिन्यांनी #andolanmainkhalistan असा हॅशटॅग वापरत कृषी विधेयकांच्या ज्या मुळ मुद्द्यांभोवती आंदोलन उभे राहतं आहे, त्या मुळ मुद्दावरून देशाचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे मुद्दाम आंदोलनाला बदनाम करण्याचा कट असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

शेतकऱ्यांचे हे सर्व मुद्दे रास्त आहेत. ह्या तिन्ही वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन पाहिल्यास किंवा शेतकरी आंदोलनाबद्दलचे कार्यक्रम पाहिल्यास शेतकऱ्यांना का राग येत असेल याची जाणिव होऊ शकते. म्हणूनच शेतकरी त्यांना "गोदी मीडिया' म्हणत त्यांच्या आंदोलनातून हाकलून देत आहेत. गोदी मिडिया म्हणजे सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारची वकिली करणारी माध्यमे. जी माध्यमं सतत सरकारचे गौरवीकरण करत असतात. सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलने उभी राहत असतील तर त्या आंदोलनांना दुर्लक्षित करणे, आणि त्यांचे वार्तांकन केलेच तर ते सरकारची प्रतिमा चांगली कशी राहिल या दृष्टीनेच कसे करता येईल यासाठी ही माध्यमे काम करतात असे दिसून येते.

हे फक्त आत्ता शेतकरी आंदोलनांमध्ये घडतं आहे का? तर नाही. सीएए-एनआरसीविरोधातील आंदोलनामध्येही ह्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्यात आला होता. जेएनयूमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर जे आंदोलन उभे राहिलं त्यावेळीही आंदोलकांनी याच वृत्तवाहिन्यांवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी आज तक वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन आंदोलनातून हाकलून देण्यात आली होती त्याचा व्हिडिओही आपल्यापैकी काहीनीं कदाचित पाहिला असेल.

ह्या सर्व वृत्तवाहिन्यांचा सरकारविरोधातील आंदोलने कव्हर करताना एक पॅटर्न आहे, जो प्रत्येक वेळी स्पष्टपणे जाणवत असतो. तो म्हणजे आंदोलन करणाऱ्यांची बदनामी करणे. म्हणजे जेएनयूमधील विद्यार्थ्यांपासून ते आत्ता सुरू असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत आंदोलकांची कशी बदनामी होईल आणि हे आंदोलक सरकारविरोधात आवाज उठवत असताना ते राष्ट्रविरोधी कसे आहेत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न ह्या वृत्तवाहिन्या करत असल्याचं लक्षात येते. म्हणजे जेएनयूच्या विद्यार्थ्यांविरोधीत "टुकडे टुकडे गँग' ते आत्ताच्या आंदोलनाबद्दल "आंदोलन मै खलिस्तान' हे हॅशटॅग सदर वृत्तवाहिन्यांच्या आंदोलनांच्या कार्यक्रमावेळी प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करत असतात. वृत्तवाहिन्यांचे निवेदक त्यांच्या बोलण्यातून सदर हॅशटॅगचा मारा प्रेक्षकांवर करत असतात. त्यामुळे ज्या मुळ मुद्दांवर देशातील नागरिक आंदोलन करत आहेत ते मुद्दे बाजूला राहतात. त्याबद्दल जी चर्चा वृत्तवाहिन्यांवरून व्हायला हवी होती ती होत नाही. उलट मूळ मुद्द्यांना बगल देण्याचा जाणिवपूर्वक केलेलाच हा प्रयत्न आहे हे जाणवत राहतं. मागच्या काही वर्षापासून हे घडतं आहे. मागच्या काही वर्षापासून हे सतत अनुभवल्यानंतर या वर्षात पार पडलेल्या आंदोलनातील नागरिकांनी आता मात्र ह्या वृत्तवाहिन्यांवर बहिष्कार टाकायला सुरूवात केली आहे. तेच सध्याच्या शेतकरी आंदोलनातही दिसत आहे.

तसेच दुसरीकडे आंदोलकांना आता त्यांची बाजू लोकांपर्यंत पोचविण्यासाठी वृत्तवाहिन्यांची गरज उरली नाही. सोशल मिडियामुळे आंदोलनं आता इतर नागरिकांपर्यंत पोचत आहेत. सोशल मीडियावर नागरिक त्याबद्दलबोलत आहेत. ही सर्व नवीन स्पेस उपलब्ध झाल्यानंतर जर सरकारधार्जिण्या वृत्तवाहिन्या आंदोलनामध्ये येऊन त्यांचीच बदनामी करण्याचा डाव साधत असतील तर ह्या शेतकऱ्यांना सदर वृत्तवाहिन्यांबदद्ल येत असलेला राग आपण समजून घेतला पाहिजे.

खरे पाहिले तर, अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर ह्या वृत्तवाहिन्यांनी कोणत्याच आंदोलनांना न्याय दिला नाही. उलट त्यांनी आंदोलनांकडे लक्ष कसे जाणार नाही यासाठी इतर इव्हेंट्सचे पूर्ण वेळ प्रेक्षपण करण्यावर भर दिला. किंवा नवे वाद आणि इव्हेंट्स जन्माला घातले. जसे की दिल्लीला शेतकरी घेरत आसताना वृत्तवाहिन्या मात्र पंतप्रधानांच्या वाराणसी दौऱ्याचे पूर्णवेळ थेट प्रेक्षपण करण्यात व्यस्त होत्या. म्हणजे किमान तो दिवस तरी लोकांपर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय होतंय ते पोचणार नाही.

आंदोलनांपासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी वृत्तवाहिन्यांचा आणि दूरदर्शनच्या केल्या गेलेल्या वापराबद्दलच्या अनेक घटना आहेत. त्यासाठी सत्ताधारी अनेक युक्त्यांचा वापर करत असतात. अशीच एक घटना इंदिरा गांधींबदद्लही आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर 1977 मध्ये दिल्लीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आणि ह्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे हे लक्षात आल्यानंतर लोकांनी ह्या सभेला जाऊन नये म्हणून त्या काळात प्रचंड गाजलेल्या बॉबी सिनेमाचं प्रक्षेपण दूरदर्शनवर करण्यात आलं होतं. अर्थात नागरिकांचा रोष इतका होती की, बॉबी सिनेमाला नाकारून नागरिकांनी सभेला मोठी गर्दी केली होती. त्यामुळं अशा पद्धतीनं दूरदर्शनचा आणि वृत्तवाहिन्यांचा वापर करण्याचा भारतीय लोकशाहीचा मोठा इतिहास आहे. आणि त्या परंपरेतून आपण गोदी मीडियापर्यंतच्या टप्प्यावर आल आहोत आणि ‘गोदी मिडिया गो बॅक’ हा नागरिकांचा आता त्याला प्रतिसाद आहे.

bhosaleabhi90@gmail.com

लेखकाचा संपर्क - ८६६८५६१७४९

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser