आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडिया-मेनिया:अमेरिकन मीडिया ट्रम्पला भिडला!

अभिषेक भोसले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. २०१६ मध्ये वृत्तवाहिन्यांनी निवडून आणलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील माध्यमे यांच्यातील मागील चार वर्षांचे संबंध तणावाचे राहिले. भांडवली चरित्र असणारी अमेरिकन प्रेस संघटितपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून माध्यम स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात काही प्रमाणात एकवटली गेली.

चार वर्षापूर्वी ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून निवडून आले. निवडणूक काळात त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करण्याची उघड मोहिमच डोनाल्ड यांनी निवडून आल्यानंतर सुरू केली. पत्रकारांना लक्ष्य करणाऱ्या ट्रम्प समर्थकांचे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत खात्यावरून शेअर केले जाऊ लागले. महिला पत्रकारांबद्दल अश्लिल शेरेबाजी करण्यात येऊ आली. खरे तर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन टेलिव्हिजन इंडस्ट्रीने निवडून आणलेले राष्ट्रध्यक्ष होते हे उघड होतं. अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी जाहिररित्या ट्रम्प यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. जवळपास दोनशे वर्तमानपत्रांनी हिलरी क्लिंटन यांना समर्थन दिले होते. तर फक्त २० वर्तमानपत्रांनी ट्रम्प यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. वृत्तवाहिन्या मात्र ट्रम्प यांच्या बाजूने होत्या. फॉक्स न्यूजसारखी अमेरिकेत सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असणारी वृत्तवाहिनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करत होती.

निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी मात्र अमेरिकन माध्यमांविरोधात दंड थोपाटले होते. चार वर्षाच्या व्हाईट हाऊसमधील त्यांच्या कारकिर्दीत ट्रम्प विरोधातील माध्यमांना लक्ष्य करणे हे नित्याचे झाले होते. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्येही घसरण झाली. पण मागच्या चार वर्षाच्या काळात अमेरिकन प्रेसनेही डोनाल्ड ट्रम्प यांचा पिच्छा मात्र सोडला. विशेषत: वर्तमानपत्रांनी संघटित भूमिका घेतल्या हे महत्त्वाचे. ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर पत्रकारांविरोधात जी द्वेष मोहिम सुरू केली होती, त्यानंतर यूएस प्रेस कार्पोरेशननी ट्रम्प यांना त्यांच्या शपथविधीच्या तीन दिवस अगोदर एक जाहीर पत्र लिहिले होते. त्यात पुढचे चार वर्ष ट्रम्प आणि अमेरिकन प्रेस यांच्यातील संबंध कसे असतील याचा खुलासा केला होता. राष्ट्राध्यक्ष म्हणून माध्यमांना ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश नाकारतील, तरी आम्ही आमची जबाबदारी न विसरता लोकांसमोर सत्य आणू असे प्रेस कार्पो.नी जाहिर केलं होतं. पुढे प्रेस कार्पो. नी ट्रम्प यांना उघडपणे आव्हान दिले होते, की आम्हाला रोखून दाखवा. ह्या सगळ्यात प्रेस कार्पों.नी अमेरिकन नागरिकांना पुढच्या चार वर्षात अमेरिकन प्रेस इतिहासातील माध्यम म्हणून काम करण्याचे सर्वोच्च स्टॅण्डर्डस् प्रस्थापित करेल अशी ग्वाही दिली होती.

आज चार वर्षानंतर प्रेस कार्पो.च्या ह्या पत्राचा विचार करताना अमेरिकन माध्यमांनी नक्कीच ते उच्च स्टॅडर्ड्स त्यांच्या कामातून प्रस्थापित केले असे म्हणायला नक्कीच वाव आहे. ट्रम्प यांना अडचणीत आणू शकेल असे वार्तांकन करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार आणि माध्यमसंस्थांना जाणिवपूर्वक व्हाईट हाऊसपासून दूर ठेवण्यात आले. अनेकांचा जाहिर अवमान करण्यात आला. त्यातल्या अनेक व्हिडिओ क्लिप्स सतत व्हायरल झाल्याचे आपण पाहिलेच असेल. ह्या सगळ्यांमध्ये अमेरिकन प्रेसनी ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण मात्र घातले नाही. अर्थात ट्रम्प यांना समर्थन करणारी माध्यमे होतीच. त्यांचे प्रमाणही मोठे होतं. पण जी ट्रम्पविरोधात होती त्यांनी संघटितपणे ट्रम्प यांच्या माध्यमांवरील हल्ल्यांना तोंड दिलं. फक्त तेवढ्यावरच ही माध्यमे शांत राहिली नाहीत तर त्यांना जाहिर भूमिका घेतल्या. आपला राष्ट्राध्यक्ष त्याच्या कारकिर्दीत किती वेळा खोटं बोलला याच्या नोंदी ठेवल्या. ते आकडे लोकांसमोर मांडले. राष्ट्रध्यक्ष खोटारडा आहे हे ओरडून सांगण्याचे संघटित धाडस त्यांनी दाखविले. राष्ट्रध्यक्ष वंशविरोधी, पुरूषी आहे हे सतत ते बोलत राहिले. अर्थात या सगळ्याची किंमत त्यांना मोजावी लागली. व्हाईट हाऊस ह्या बातमीच्या मुख्य केंद्रपासून त्यांना दूर ठेवण्यापासून ते ही सगळी माध्यमे फेक मिडिया असल्याच्या ट्रम्प यांच्या प्रचारालाही त्यांना सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी या सर्व माध्यमांना अमेरिकन नागरिकांचे शत्रू संबोधले होते.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या माध्यमस्वातंत्र्य निर्देशांकामध्ये घसरण झाली. पत्रकारांना लक्ष्य तर केले जात होतेच. या सगळ्याविरोधात अमेरिकन वर्तमानपत्रांनी एकत्रित येऊन केलेली कृती ही ऐतिहासिक ठरली. बोस्टन ग्लोब या वर्तमानपत्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमेरिकेतील जवळपास ३०० पेक्षा अधिक वर्तमानपत्रांनी ट्रम्प यांच्याविरोधात संघटित भूमिका घेतली. या सर्व वर्तमानपत्रांनी १५ ऑगस्ट २०१८ ला त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये माध्यम स्वातंत्र्याबद्दलचे संपादकीय प्रकाशित केले. ३०० पेक्षा जास्त वर्तमानपत्रांची एकाच दिवशीची ही सामूहिक कृती महत्त्वाची होती. त्यामुळे भांडवली असलेल्या अमेरिकन माध्यमांनी स्वत:चे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केलेल्या ह्या कृती जिथे जिथे माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणली जातेय त्यांच्यासाठी दिशादर्शक आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. बातम्यांसाठी माध्यमांची शर्यत लागलेली असताना ही सामूहिक आणि ठाम कृती महत्त्वाची होती. अर्थात ट्रम्प यांना यामुळे काही फरक पडण्याचे कारण नव्हतं. अमेरिकन माध्यमे ट्रम्प यांच्यातले तणाव आजही कायम आहे. निवडणुकीतली पराभवानंतर मात्र ट्रम्प हे माध्यमांविरोधात जास्तच आक्रमक झाले आहेत. फेक मिडिया हा शब्द वापरल्याशिवाय ते माध्यमांचा उल्लेखही करत नाहीत. एकीकडे ट्रम्प आपला पराभव मान्य करत नसताना, ट्रम्प यांची खंबीरपणे पाठराखण करणाऱ्या फॉक्स न्यूजनेही बायडेन यांचा विजय मान्य केला हे महत्त्वाचे.

खरे तर ट्रम्प यांच्या खोटारडेपणा लोकांसमोर उघड करण्यात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थात सोशल मिडिया हातात असताना हे सोपे नाही. माध्यमांनी फक्त खोटापणा उघड केला नाही, तर ट्रम्प यांच्या खोट्या तथ्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यापासूनही स्वत:ला रोखले. याचे ताजे उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी चालू असताना ट्रम्प यांचे सुरू असलेले लाईव्ह भाषणाचे प्रसारण अर्ध्यातच थांबवण्याच्या निर्णय. आपल्या भाषणात ट्रम्प अनेक खोटी तथ्थ लोकांसमोर मांडत असल्याचे सांगत अनेक वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचे प्रसारण थांबविले. ह्या वृत्तवाहिन्यांनी ट्रम्प यांच्या भाषणाचा सर्वाधिक अप्रमाणिक आणि खोटरडे भाषण असा उल्लेख करत त्याविरोधात त्यांच्या अधिकार क्षेत्रात राहून भूमिका घेतल्या. भूमिका काय होती तर लोकांपर्यंत फक्त सत्य पोहचले पाहिजे. अमेरिकन माध्यमांनी जाणिवपूर्वक स्वत:च्या वृत्तवाहिन्यांचा वापर ट्रम्प यांच्या खोटेपणाचा प्रसार करण्यासाठी होवू दिला नाही हे महत्त्वाचे. त्यामुळं ट्रम्प यांच्या पराभवात माध्यमांचा वाटाही महत्त्वाचा आहे. bhosaleabhi90@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser