आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडिया-मेनिया:ब्रेकिंग रिअॅलिटी, मेकिंग इव्हेंट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक भोसले

भारतीय समाज उत्सव प्रिय आहे हे आपण सतत ऐकत आलो आहोत. आपणही समाजाचेच भाग आहोत असं समजून वृत्तवाहिन्यांनी वार्ताकनाचे नवे इव्हेंट कल्चर पेरले. आज त्याचा वटवृक्ष झालाय. सामाजिक, धार्मिक उत्सवामध्ये आपण एकत्र येतो, म्हणून किमान त्या उत्सवांना महत्त्व तरी देता येते. पण वृत्तवाहिन्यांच्या इव्हेंट कल्चरमध्ये लोकशाहीप्रणालीमधील त्यांच्या असलेल्या भूमिकेपासूनच त्यांना दूर नेले. ह्या सगळ्यात आपण प्रेक्षक म्हणून कशापासून तुटलो? 

पाच वर्षांचा प्रिन्स आठवतोय! २००६ सालचे हरियाणा. कुरूक्षेत्र जिल्ह्यातल्या एका खेड्यामध्ये पाच वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रिन्सला वाचविण्यासाठी चाललेल्या ४८ तासांच्या बचावकार्याचं मॅरेथॉन वार्तांकन आपल्याला प्रेक्षक म्हणून १४ वर्षापूर्वी नवे आणि अपवादात्मक होते. वृत्तवाहिन्यांचे निवेदक "जब तक प्रिन्स नही बचेगा, तब तक हम यहाँ से नही हटेंगे' म्हणत त्या सगळ्याचे निवेदन करत होते.  वृत्तवाहिन्यांच्या स्क्रिनकडे डोळे लावून बसलेला भारत थांबला होता. त्या काळात वृत्तवाहिन्या पाहणारे ४० टक्के प्रेक्षक फक्त तेच वार्तांकन पाहत होते. वृत्तवाहिन्यांना प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवायचे नवीन मॉडेल मिळाले होते. ६० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स तर वाचला पण भारतीय वृत्तवाहिन्यांचे पुढे काय झाले? प्रिन्सच्या या वार्तांकनाने रूजवलेल्या इव्हेंट कल्चरच्या खोल दरीमध्ये इथल्या पत्रकारितेचे काय झाले? प्रेक्षकांचे काय झाले?   अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर चालू असलेल्या उपचाराची आणि त्यांच्या हालचालींसंबंधीचे क्षणाक्षणाचे वार्तांकन वृत्तवाहिन्यांवर सुरू आहे. अमिताभ बच्चन प्रांतविधीला गेले, हे खाल्लं, हे केलं, ते केलं हे दाखविणाऱ्या  वृत्तवाहिन्यांच्या स्क्रिनची छायाचित्रे अनेकजण सोशल मिडियावर टाकत आहेत. पत्रकारितेची खिल्ली उडवली जातेय. वृत्तवाहिन्या इव्हेंट स्वरूपात तुम्हाला जे दाखवित आहेत  ती पत्रकारिता नाहीये, त्यामुळे अशा पोस्ट वाचायला मिळणे साहजिक आहे, पण हे आजच्या वृत्तवाहिन्यांचे  कल्चर आहे. त्यांनी ते आत्मसात केले आहे. कारण हे केल्याने त्यांना जाहिरातीमधून पैसे कमविण्यासाठी लागणारी डोळ्यांची संख्या मिळते. वृत्तवाहिन्यांना तुमची गरज नाहीये, त्यांना तुमच्या डोळ्यांची गरज आहे. 

खासगीकरणाने २४ बाय ७ वृत्तवाहिन्यांना जन्म दिला. प्रेक्षकांना सतत व्यस्त ठेवण्याची गरज लक्षात घेत वार्तांकन, प्रक्षेपण आणि सादरीकरणाच्या पद्धती बदलल्या. कमी खर्चात आपण प्रेक्षकांना जास्तीत वेळ व्यस्त ठेवू शकतो हे लक्षात आल्यानंतर विशिष्ट राजकीय नेत्यांच्या जवळपास सर्व सभा सतत लाईव्ह दाखविणे, समांतर एखादं पॅनेल डिस्कशन घेणे यातून कंटेट गरज पूर्ण व्हायला लागली. कधी कधी एखादा नेता ई.डी. कार्यालयाला जात असेल तर त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत ग्रामीण भारतातील जनतेला मुंबई दर्शनही घडवून आणले जाऊ लागले. मग लोकांमध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नावर वार्ताकन करण्याची पद्धत मागे पडत गेली. आता काही अपवाद वगळता जवळपास सर्व बातम्या ह्या दुय्यम स्त्रोतांवर आधारलेल्या असतात आणि न्यूजरूमचे रूपांतर कॉमेंट्री बॉक्समध्ये झाले आहे. 

मागच्या काही दिवसांमधली उदाहरणे घ्यायची झाली तर सुशांत राजपूतची आत्महत्या, विकास दुबे एनकाऊंटर, पतंजलीने लावलेला तथाकथित कोरोनावरील औषधाचा शोध, माननीय पंतप्रधानांचा लेह – लडाख दौरा, मार्च एप्रिलमध्ये त्यांनी दिवे लावण्याची किंवा गॅलरीमधून टाळ्या – थाळ्या वाजविण्याचे केलेले आवाहन आणि ह्या आठवड्यातल्या अमिताभ बच्चन यांना कोरानाची लागण आणि राजस्थानमधील राजकीय घडामोडी ह्या सगळ्यांचा भारतीय वृत्तवाहिन्यांनी पद्धतशीर इव्हेंट केलेला आपल्याला दिसतो. 

ह्या सगळ्या घडामोडी नक्कीच महत्त्वाच्या होत्या. त्याचे क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहचविले जात होते. पण त्या काळात फक्त याच घडामोडी महत्त्वाच्या होत्या का ? मग घडत असलेल्या इतर घटनांचे काय झालं असेल? घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने विचारले गेले पाहिजेत अशा कळीच्या प्रश्नांचे काय ?

"गेट किपिंग' हे माध्यमांचे एक महत्त्वाचे कार्य आहे. गेट किपिंगचे कार्य म्हणजे माध्यमं ठरवतात की कोणत्या घटना, बातम्या, माहिती प्रेक्षकांपर्यंत जाऊ द्यायची. अनेक गोष्टींच्या आधारे कोणती बातमी महत्त्वाची हे ठरविले जाते. अर्थात माध्यमात काम करणाऱ्या लोकांची वैयक्तिक मते ह्या सगळ्यावर परिणाम टाकत असतातच. इव्हेंट क्लचरने माध्यमांच्या ह्या गेट किपिंगला जास्त बळकटी दिली. त्यातून अनेक महत्त्वाच्या घडामोडी, घटना मुख्य प्रवाहातील माध्यमांमधून दाखविल्याच जात नाहीत. अनेक वेळा त्या गोष्टी लोकांच्या जगण्या मरण्याशी संबंधित असू शकतात. म्हणजे कोरोना लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित कामगारांबद्दलचे  वार्तांकन, माध्यमांनी पायी चालणाऱ्या कामगारांचा इव्हेंट केला पण त्यातून त्यांच्या जीवनात झालेले सामाजिक, आर्थिक बदल यांची सविस्तर माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचू दिली नाही. जी माहिती सरकारी यंत्रणेला धोरणे ठरविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते ती माहिती मात्र त्या इव्हेंट करण्याच्या प्रयत्नांमध्ये समोर येऊच शकली नाही. 

पतंजली समूहाने कोरानावरचे औषध काढलं. वृत्तवाहिन्यांना इव्हेंट करण्यासाठी परफेक्ट अशी घटना होती. त्यांनी ते केलेही. पण ह्या औषधाबद्दल नीट समजून न घेता, त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी न समजून घेता, त्याला प्रश्न न विचारता पंतजलीच्या भक्तीरसात मुख्यप्रवाहातील बहुतांश माध्यमे वाहून गेली. गांभिर्याने पत्रकारिता करणाऱ्या काही माध्यमांनी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते औषध कोरोनाचे नसल्याचे पतंजलीला स्विकारावे लागलं. इव्हेंट कल्चरनी पत्रकारितेमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या पाठपुरावा करण्याच्या पद्धतीचा ऱ्हास घडवून आणला.

म्हणजे आता स्थलांतरित कामगारांचे काय होतेय ? कोरोना बद्दलच्या धोरणांचे काय ? चीनसोबतच्या वादात सीमेवर शहीद झालेल्या जवानाचे काय ? काश्मीरचे काय ? विकास दुबे प्रकरणाचे काय? दररोजच्या नव - नव्या इव्हेंट्सनी कालपर्यंत पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांच्या स्मृतीमध्ये राहत नाहीत. जगण्याशी संबंधित प्रश्नांची उकल झालीये का, समस्या सुटल्या आहेत का, धोरणे आखली जात आहेत का ह्यांबद्दल प्रश्न विचारायची गरज माध्यमांनाही राहत नाही आणि अर्थात प्रेक्षकांनाही. भिंतीवरच्या टि.व्ही नावाच्या खिडकीसदृश्य वस्तूने प्रेक्षकांना जगाशी जोडत असल्याचा फील देत भिंतीच्या पलीकडं रस्त्यावर काय चाललंय यापासूनही तोडले. 

घटनांचे तासन् – तास वार्तांकन करून क्षणाक्षणाचे अपडेट देत प्रेक्षकांना फक्त उत्तेजित करायचे. त्यातून तुम्हांला आनंद येतो, चीड येते, राग येतो, संताप वाटतो, दु:ख होतं, नैराश्य येतं. पण त्याचे पुढे काही होण्याआधीच नवा इव्हेंट तुमच्या डोळ्यामोर सुरू झालेला असतो. जे तुम्ही पाहताय ते वेगळं जग आणि राहताय ते वेगळं जग ही सीमारेषा ओढली जाते. इव्हेंटमध्ये तुमची रिअलिटी ब्रेक केली गेलेली असतेच, म्हणून तर त्या गोष्टीचे पुढे काय झाले हे समजून घेण्याची गरज प्रेक्षक म्हणून आपल्याला भासत नाही. बच्चन यांना केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या इव्हेंटमध्ये मग इतर भागातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे ? वाढत असलेली रूग्णसंख्या, वैद्यकीय सोयी – सुविधा, आरोग्य व्यवस्थेवरचा तणाव, विविध समाज गटांवरील परिणाम याबद्दल बोलण्याची समजून घेण्याची स्पेस नष्ट केलेली असते. तोपर्यंत त्या तात्पुरत्या इव्हेंटने वृत्तवाहिन्यांना पाहिजे असलेले आय बॉल्स टीआरपीच्या संख्येमध्ये रूपांतिरत केलेले असतात. 

bhosaleabhi90@gmail.com
लेखकाचा संपर्क - ८६६८५६१७४९

बातम्या आणखी आहेत...