आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडिया-मेनिया:‘लोकल’ ही "होकल' रहेगा!

अभिषेक भोसले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय मुख्य: प्रवाहातील वृत्तमाध्यमांचं चारित्र्य हे पुरूषसत्ताक, जातीयवादी आणि शहरकेंद्री आहे, हे सर्वप्रथम स्विकारल्याशिवाय आपण हाथरससारख्या घटनांचा माध्यमांच्या अनुषंगाने विचार करू शकत नाहीत. हाथरसच्या घटनेने वृत्तमाध्यमांसंबंधीचे काही कळीचे मुद्दे परत एकदा चर्चिण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात स्थानिक पत्रकारिता आणि स्थानिक विषयांच्या वार्तांकनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

हाथरसची घटना घडून पुढच्या दोन-तीन दिवसात एक महिना पूर्ण होईल. बलात्कार झाला होता की नाही इथंपासून ते आदित्यनाथ सरकारविरोधातले कटकारस्थान इथपर्यंतचे अनेक मुद्दे पुढचे काही दिवस पुसटसे का होईना आपल्या स्मृतीमध्ये रूजविले जातील. मर्यादित माध्यमसंस्थांच्या हातात बहुतांश वाचक आणि प्रेक्षक एकवटलेल्या देशात स्थानिक मुद्दांवर बोलणारे पत्रकार आणि स्थानिक पत्रकारितेबद्दल यानिमित्ताने बोलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याला कारणही आहे. १४ ऑक्टोबरला घडलेल्या हाथरसच्या घटनेला बातमीमुल्य निर्माण होण्यासाठी १४ दिवस लागतात. पीडितेचा मृत्यू झाला, तो मृत्यू दिल्लीत झाला यामुळे तरी चौदाव्या दिवशी ही घटना मुख्य: प्रवाहातील माध्यमांच्या ब्रेकिंग न्यूज बनण्याच्या कामी आली.

पुढे लिहित असलेली काही वाक्ये नीट वाचा. ती परत परत वाचण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस या ठिकाणी १९ वर्षीय एका दलित मुलीवर गावातील सवर्णांकडून सामूहिक बलात्कार केला जातो, तिची जीभ कापली जाते. १४ दिवस ती जगण्यासाठी संघर्ष करत असते. सोशल मिडियावरून या घटनेची माहिती नागरिकांना व्हायला लागताच स्थानिक प्रशासन ही फेक न्यूज असल्याची भूमिका घेते. तिच्या मृत्यूनंतर घरच्यांच्या संमतीशिवाय तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. "परत परत वाचण्याची गरज' हे अशासाठी आहे की, योगी आदित्यनाथ सरकारविरूद्ध कट यापद्धतीच्या बातम्यांच्या तुफान माऱ्यासमोर मुळ घटना आपल्या विस्मृतीत जाऊ नये म्हणून परत परत ती वाचली पाहिजे.

दिल्लीतील माध्यमांसमोर अनेक इतर महत्त्वाचे विषय असल्यामुळे कदाचित चौदा दिवस त्यांना ही घटना दिसली नसेल. हाथरससारख्या ठिकाणी त्यांचे वार्ताहार नसतील असेही आपण समजूयात. किंवा त्यांना जाणिवपूर्वक ह्या घटनेचे वार्तांकन करायचेही नसेल. मग अशा परिस्थितीमध्ये हाथरससारख्या घटनांचे लगेच वार्तांकन होण्याची शक्यता असू शकत नाही का?

लोकल जर्नालिझम म्हणजे स्थानिक पत्रकारिता अशा परिस्थितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असते. आपल्या छोट्या-छोट्या शहरांमध्ये अनेक स्थानिक पेपर चालविले जात असतात. त्यांचा खप मर्यादित असतो. त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असते. जाहिरातीही मर्य़ादित असतात. पण ही वर्तमानपत्रे, स्थानिक वाहिन्या आणि प्रादेशिक भाषांमध्ये काम करणारे स्थानिक पत्रकार अशा घटनांना वाचा फोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असतात. स्थानिक वर्तमानपत्राच्या फोटो आणि कात्रणांमुळे अनेक वेळा मोठ्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना ह्या घटनांची माहिती होत असते. अनेक वेळा सोशल मिडियावर एखाद्या स्थानिक पत्रकाराने लिहिलेल्या आशयामुळे किंवा फोटो, व्हिडिओमुळेही अशा घटना समोर येण्याची शक्यता असते. एवढे होऊन देखील मुख्य: प्रवाहातील माध्यमांमध्ये अशा घटना दाखविण्यासाठी मोठा कालावधी जावा लागतो. अनेक वेळा ग्रामीण भागातील जातीय अत्याचार, बलात्काराच्या घटना कशा समोर येणार नाहीत यासाठीच व्यवस्थेचा एक मोठा भाग काम करत असतो. अर्थात अनेक वेळेला माध्यमे आणि पत्रकार त्या व्यवस्थेचे भाग असतात. काही वेळेला मोठ्या माध्यमसंस्थांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांमधील जातीय, पुरूषी आणि शहरकेंद्री नेणिवेमुळेही अशा घटना दडपल्या जाण्याची शक्यता असते. अनेक अडथळे पार केल्यानतंर हाथरस सारख्या एखाद्याच घटनेला मग एवढी जागा मिळते.

तुम्हाला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित रामरहिम सिंग आठवतोय का? या गाजलेल्या प्रकरणातील लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या घटनांना पहिल्यांदा वाचा फोडण्याचं काम एका स्थानिक वर्तमानपत्राने केलं होतं. "पूरा सच' या स्थानिक वर्तमानपत्राने बलात्कार झालेल्या साध्वीचे पत्र प्रकाशित केले होतं. त्याची किंमत ह्या वर्तमानपत्राच्या संस्थापक राम चंदर छत्रपती यांना चुकवावी लागली होती. पत्र प्रकाशित झाल्याच्या काही काळातच छत्रपती यांची हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर डेरा सच्चा सौदा प्रकरण किती गाजले हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. विचार करा, "पूरा सच' किंवा राम चंदर छत्रपतींनी हे पत्र छापले नसते तर हे प्रकरण माहिती तरी झाले असते का किंवा त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला शिक्षा तरी मिळाली असती का? स्थानिक पत्रकारितेचे महत्त्व सांगणारी ही एकच घटना नाही. महाराष्ट्रात विशेषत: शेतकरी आत्महत्यांबद्दलचे किंवा पेड न्यूजबद्दलचे जे वार्ताकन झालं, त्याची मुळे स्थानिक वर्तमानपत्रांनी जीव धोक्यात घालून, मर्यादित मनुष्यबळ आणि सुविधांच्या बळावर प्रकाशित केलेल्या बातम्यांमध्ये मिळू शकतात.

हे सगळं असले तरी भारतातील स्थानिक पत्रकारितेची स्थिती चिंताजनक आहे. अनेक स्थानिक वर्तमानपत्रे आणि माध्यमसंस्था आर्थिक नुकसान पेलावत नसल्यामुळे बंद पडत चालल्या आहेत. स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सामाजिक दबावाला सातत्याने ह्या स्थानिक माध्यमसंस्था आणि पत्रकारांना सामोरे जावे लागते. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर चर्चेत असलेल्या विषयांच्या अनेक वेळा थेट स्थानिक राजकारणावर काही परिणाम पडत नाही. पण स्थानिक विषयांचे जर वार्तांकन होत असेल तर त्याचा स्थानिक राजकारणावर परिणाम व्हायला सुरूवात होते. ज्यांचे हितसंबंध अशा स्थानिक विषयांच्या वार्तांकनामुळे बिघडू शकतात अशी मंडळी हे विषय बातम्यात येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतातच.

पिडितेच्या मृत्यूनंतर हाथरसमध्ये पोहचलेल्या राष्ट्रीय माध्यमांना जो काही अनुभव आला त्यावरून देखील आपल्याला स्थानिक पातळीवरून संवेदनशील पद्धतीने काम करणाऱ्या कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. जातीय हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांचे वार्तांकन होऊ नये म्हणून माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर हाथरसच्या केसमध्ये झाला. "इंडिया टुडे' वृत्तवाहिनीची पत्रकार तनुश्री पांडे हिच्या वार्ताकनामुळे अर्ध्या रात्री लपवून केल्या जात असलेल्या अंत्यसंस्काराची घटना देशासमोर आली. हे वार्तांकन केले जात असताना बेकायदेशीररित्या तनुश्री हिचा फोन प्रशासनाकडून टॅप करण्यात येत होता. हे सगळं इथेच थांबत नाही तर ह्या तिच्या फोनच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सरकारला पूरक भूमिका घेणाऱ्या संकेतस्थळांना पुरविल्या गेल्या. तिच्या वार्तांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. अशा पद्धतीच्या वापर सातत्याने जातीय आणि अल्पसंख्यांकाविरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांविरोधात केल्या जातातच. जर तनुश्री पांडे सारख्या दिल्लीस्थित वृत्तवाहिनीमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला हे सहन करावं लागत असेल तर स्थानिक पत्रकारांसोबत काय होत असेल याची कल्पना येऊ शकेल.

स्थानिक राजकारणामध्ये जात, पुरूषसत्ताकता आणि त्यातला हिंसाचार, शोषण हे महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात. आणि अशा विषयांना वाचा फोडण्याचे काम अनेक वेळा पत्रकारितेमध्ये केले जाते. त्यामुळे स्थानिक पत्रकारितेला बळकटी देणे हे गरजेचे आहे. स्थानिक पत्रकारितेला बळकटी मिळवून देणारे अनेक प्रयोग भारताच्या अनेक भागांमध्ये सुरू आहे आहेत. आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पातळीवर त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आता गरज बनणार आहे, नाही तर हाथरस सारख्या घटना चौदा दिवस माध्यमांतून बाहेर ठेवता येऊ शकतात.

bhosaleabhi90@gmail.com

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser