आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:शेती पाण्यात, नेते शेतात...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली शेती हा मान्सूनचा जुगार. याचा प्रत्यय यंदा राज्यात आला. परतीच्या प्रवासात रेंगाळलेल्या मान्सूनने राज्यात; विशेषत: मराठवाडा, प. महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांतील शेती उद्ध्वस्त केली. खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीत वाहून गेला. शेती पाण्यात गेली... आणि नेत्यांचे दौरे सुरू झाले. मुख्यमंत्री ‘लॉकडाऊन’ सोडून बांधावर पोहोचले. जागेवरच त्यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश दिले. इकडे विरोधी पक्षनेत्यांचीही एकच घाई उडाली. त्यांनीही शेतीच्या बांधावरुन सरकारवर बाण सोडण्याची संधी वाया घालवली नाही. नेमेचि येतो पावसाळा... प्रमाणे हे सारे घडते आहे. दुष्काळ असो की अतिवृष्टी, गारपीट असो; तेवढ्यापुरते बांधावर जात बळीराजाचे सांत्वन करायचे, मदत जाहीर करायची आणि पुढचा पावसाळा, आपत्ती येईपर्यंत सारे विसरून जायचे. हेच वर्षानुवर्षे घडते आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीवर उपाय शोधण्याचे काम कोण करणार, हा खरा प्रश्न आहे. ‘मेघगर्जनेसह जोरदार पाऊस’ असा इशारा देऊन हवामान खात्याने हात झटकणे आता बंद केले पाहिजे. मंडळनिहाय, तालुकानिहाय, गावनिहाय हवामानाचा अचूक अंदाज देणारी यंत्रणा उभी राहिली, तर यातील निम्मे प्रश्न मिटतील. नुकसान टाळता येईल. सरकारनेही नेहमीप्रमाणे हेक्टरी पाच-पंचवीस हजार रुपये देऊन जबाबदारी टाळणे योग्य नाही. वर्षभरात अशा नैसर्गिक आपत्ती केव्हा येतात, का येतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा नेमून त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे. नाहीतर मग दरवर्षीच या आपत्ती येणार, मंत्री दौरे काढणार, विरोधक गळा काढणार. बळीराजाच्या डोळ्यातील पाणी थांबवण्यासाठी हा नेहमीचा सोपस्कार टाळून, मळलेल्या वाटा सोडून, नव्या धोरणांसह कामाला लागावे लागेल. तसे झाले तरच या बांधावरच्या दौऱ्यांचा काहीतरी फायदा होईल. अन्यथा, पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे शेती पाण्यात अन् नेते शेतात असे चित्र कायम राहील. त्यातून काहीच साध्य होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...