आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीएचबी'च्या कथा अन व्यथा...:साहित्याचं भूत आणि भाकरीची भोकाडी

ऐश्वर्य पाटेकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"सीएचबी' (clock hours basis) म्हणजे घड्याळी तासिका तत्त्वावर नेमलेले कंत्राटी प्राध्यापक. राज्यातले सुमारे दहा हजार कंत्राटी प्राध्यापक हे सीएचबीला शैक्षणिक आदर्शाला दिलेली सगळ्यात मोठी शिवी आहे असे समजतात. महाराष्ट्रदेशी "शिक्षणसम्राट' नावाचा जो शोषकवर्ग जन्माला आला त्याने शासनाच्या संगनमताने सुरू केलेली ही कैक वर्षांपासूनची पिळवणूक... या कंत्राटी प्राध्यापकांमध्ये साहित्य अकादमी आणि राज्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांपासून ते अगदी आदिवासी समाजातील उच्चशिक्षितांचा समावेश... विनाअनुदानित खाजगी शिक्षणसंस्थांचा भांडवलशाहीला पोषक गुलामांची फौज निर्माण करणे आणि तिला स्वस्तातले मजूर उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्देश उरला आणि खऱ्या अर्थाने इथूनच शिक्षणक्षेत्राच्या अधोगतीला सुरवात झाली. सीएचबी किंवा विनाअनुदानित प्राध्यापक हे या अधोगतीचे शेवटचे टोक आहेत. या शोषणाविरुद्ध आता राज्यातील सगळे कंत्राटी प्राध्यापक आंदोलनाच्या भूमिकेत शिरले आहेत. "दिव्य मराठी रसिक'ने "सीएचबी'च्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी राज्यभरातून हे पिळवणुकीचे अनुभव गोळा केले. आजपासून दर रविवारी यातील काही निवडक आणि विदारक अनुभव "रसिक'च्या वाचकांसाठी...

अलीकडे मी माझ्या परिचय पत्रातून ‘सहायक प्राध्यापक’ असल्याची ओळख वगळायला लागलोय. हे करताना मला फार आनंद होतो, असे नाही. व्यवस्थेनं मला असं करण्याला मजबूर केलं. थोडबहू तरी निस्तरून सांगतो.

साहित्याच्या भारावलेल्या दिवसांचं भूत आईनं एका झटक्यात खाली उतरून ठेवलं. मोलमजुरी करत शिक्षण घेतलं ते घेतांना तसंही स्वप्न वगैरे नव्हतच की, आपण शिक्षकबिक्षक होऊ. शिक्षक होण्याचे ‘रेट’ लाखाच्या आकड्यात अन इथे दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. ते सगळं मांडलंच नं मी माझ्या ‘जू’ आत्मकथनात. कथा, कादंबऱ्या, नाटकं लिहून हाताशी असतानाही ‘जू’ समोर ठेवायचं कारण हेच होतं प्राप्त परिस्थिती समोर यावी. फक्त एक चुकलं की त्याच्या शेवटच्या पानावर ‘परिचय पत्र’ छापलं. मराठीचा प्राध्यापक आहे म्हटल्यावर प्राध्यापकाचे पगार काही कमी नसतात. खरं आहे मात्र त्यात अनुदानित अन विनाअनुदानित असा फरक आहे. मी सहायक प्राध्यापक आहे मात्र विनाअनुदानित महाविद्यालयाचा. या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची अवस्था कोरडवाहू शेतकऱ्यापेक्षाही अत्यंत वाईट असते. शेतकऱ्याकडे तरी सहानुभूतीने पाहिले जाते. तसे याचे नसते. त्याला त्याचे दुखणे सांगताच येत नाही.

तर सांगायचे हे आहे की आईने साहित्याचं भूत मानगुटीवरून उतरवून ठेवलं. झालं असं की काही वर्षांपूर्वी मला ‘मो यान’ नावाचा साहित्यिक माहिती झाला. अन त्याचं तत्वज्ञानही; मो यान म्हणतात की ‘रिकाम्या पोटाने मानमतराब यश सामाजिक प्रतिष्ठा यांचं काहीच वाटत नाही!’ हेच मला माझ्या आईनं जरा निराळ्या पद्धतीने २००० सालात ऐकवलं होतं. एम. ए. ची डिग्री हातात आली होती; अन नेमका मला कवितेसाठीचा पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार घेऊन जेव्हा मी घरी आलो, आई गोधडी शिवत होती. तिला म्हणालो, ‘आई मला पुरस्कार मिळालाय.’ आई म्हणाली ‘लेका, तुझ्या ह्या पुरस्काराची भाकरी थापता आली असती तर एकवेळच्या जेवणाची चिंता मिटली असती! खरं सांगतो तेव्हा पुरस्कार खूप छोटा छोटा होत गेला अन भाकर वाढत वाढत जाऊन पृथ्वी गोलाएवढी! मग लेखणी खाली ठेऊन नोकरीची शोधाशोध सुरु झाली. योगायोगाने एका नामांकित संस्थेच्या नुकत्याच विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या महाविद्यालयात घड्याळी तासावर नोकरी लागली. खरंतर त्या वर्षा दोन वर्षाच्या काळात चिक्कार अनुदानित महाविद्यालये एकाच वेळी पेव फुटल्यासारखी राज्यभर सुरु झाली होती. त्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयातल्या प्राध्यापकाची नोकरी स्वस्त झाली होती. सुरुवातीला बरं वाटलं ज्याला त्याला प्राध्यापक म्हणून घ्यायला; मात्र पुढचं भीषण वास्तव बोकांडी येऊन बसलं. धड त्याच्यातून बाहेर पडता येईना. जागीच खुडकोंबडी. मीही त्याच वारीतला. आज न उद्या अनुदान मिळेल ह्या आशेवर काम करत राहिलो. दरम्यानच्या काळात महाविद्यालयात विद्यापीठाची एल. आय. सी. कमिटी आली. त्यातले एक मेंबर मला म्हणाले,

“अरे तुमच्यासारख्या साहित्यिकाने अनुदानित महाविद्यालयामध्ये काम करायला हवं, आधी नेटसेट करा! ते जर केलं नाही तर तुमची ही संस्था आज ना उद्या पॅनल लावेल तर तुम्हाला आहे तिथेही काम करता येणार नाही!”

अनुदानित महाविद्यालयाविषयी मी जाणून होतो. त्यांना द्यायला तीस-पस्तीस लाख रुपये आपल्याकडे नाही. मात्र त्यांच्या ह्या म्हणण्याने मी हादरलो की ‘आहे तिथेही काम करता येणार नाही!’ विनाअनुदानित का होईना चतकोर भाकर आपल्याला मिळतेय नं! हे सुख आधी होतं पण ते जास्त काळ टिकलं नाही. माझ्याही महाविद्यालयात नेट-सेट पात्रता प्राप्त प्राध्यापकाची भरती सुरु झाली. अन ज्यांनी महाविद्यालसाठी कष्ट वेचले त्या प्राध्यापकांना घरी जावं लागलं. त्यांना शेतीबाडी होती. पण माझ्यासारख्याचं काय? संस्था चालकांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता एवढीच संधी! त्यामुळे रात्रदिवस झटून नेट-सेटचा अभ्यास. दरम्यानच्या काळात एम फीलही पूर्ण केलं. लेखक कवी गंुडाळूनच ठेवलेला होता. लिहिलेल्या कवितांचं बाड धूळखात पडलं होतं. कवितासंग्रह-बिंग्रह काही काढायचा नाही. म्हणजे तसाकाही रसच उरला नव्हता. मात्र शब्दालय प्रकाशनच्या प्रकाशिका आणि मराठी साहित्यातील महत्वाची कवयित्री सुमतीताई लांडे माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या ‘तुझ्या कवितांचं बाड दे मला, त्यांचं काही बरंवाईट करते मी!’ धूळ झटकून ते बाड त्यांच्याहाती सुपूर्द करून मी विसरूनही गेलो. मधल्या काळात काव्यसंग्रह आला अन त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मला खरंच आनंद झाला नाही. कारण मला हवं होतं फक्त नेट-सेटचं सर्टिफिकेट, पण ते काही हाती लागेना. साहित्य अकादमीचं सर्टिफिकेट युजीसी काही ग्राह्य धरणार नव्हती. दरम्यान नेमाडे सर दिल्लीत एका कार्यक्रमात भेटले म्हणाले, “अरे तुझी हलाखीची परिस्थिती कानावर आली होती, पडला काही फरक या पुरस्काराने?”

खरोखर काहीच फरक पडला नाही. उलट अडचणीत भरच पडली. त्या काळात खूप चॅनलवाले मागे लागले तरी त्यांना तोंड दाखवलं नाही. अन पुरस्कार मिळाला म्हणून कुठल्या संस्थांचा सत्कारही स्वीकारला नाही. साहित्यवर्तुळात असा समज झाला की साहित्य अकादमी मुळे तो वर गेला, मिजास करून राहिला! ज्या वास्तवाला मी सामोरे जात होतो तेव्हा हारतुरे घेत बसणं मला काही रुचत नव्हतं. हे काही लोकांना सांगू शकत नव्हतो. माझ्यातला प्राध्यापक जगणार होता नेट-सेटच्या पात्रतेमुळे. तो जगला तर साहित्यिक जगणार होता. संस्थाचालकांना त्यांच्या महाविद्यालयात वाड्मय मंडळाचा उद्घाटक म्हणून मी हवा पण प्राध्यापक म्हणून नको. एकदाची नेट-सेट पात्रता मी मिळवली. मग खूप आनंद झाला की आपल्या हक्काच्या चतकोर भाकरीला आता आपण वंचित राहणार नाही. तोपर्यंत नऊ वर्ष उलटली होती. दोन जागा मराठीच्या होत्या. विनाअनुदानित महाविद्यालय असूनही उमेदवार दोनशेच्या वर आले होते. मी निश्चिंत होतो की आपण नऊ वर्ष काम केलंय म्हणजे आपलीच वर्णी लागणार. मात्र शिक्षण व्यवस्थेच्या किडीचा पहिला डंख इथेच अनुभवायाला मिळाला. जास्त उमेदवार आल्यामुळे व्हीसी नॉमिनीने मराठी विषयाच्या सब्जेक्ट एक्सपर्टला पाच उमदेवार निवडून द्यायला सांगितले नंतर त्यांची मुलाखत संपूर्ण पॅनल समोर घेण्यात येणार होती. मराठीचे सब्जेक्ट एक्सपर्ट तथाकथित नामांकित समीक्षक होते. माझ्या परिस्थितीसकट मला व्यक्तिश: ओळखायचे असे म्हणण्यापेक्षा माझ्या गुरुस्थानीच ते होते. त्यांनी मला पाचमध्येही निवडलं नाही. सरळ सरळ डावललं होतं. संस्थेची कृपा की त्यांनी मला सहाव्या स्थानावर ठेवलं. साहजिकच माझीच निवड होऊन ‘सहायक प्राध्यापक’ झालो.

आता वनवास संपावा तर नाहीच! माझे संस्थाचालक ग्रेट होते मात्र त्यांनी नेमलेली माणसं ग्रेट असतीलच असे नाही. माझ्यानंतर लागलेल्या रोजंदारी तत्वावर असलेल्या प्राध्यापकांचे पगार वाढू लागले मात्र नोकरीत कायम असलेल्या माझ्यासारख्या प्राध्यापकांचे पगार आहे तिथेच. मग मात्र हादरा बसला. यावर कळस म्हणजे माझ्याबरोबर लागलेल्या शिपाई कर्मचाऱ्याचा पगारही माझ्यापेक्षा वाढवा. बाहेरचं वास्तव जाणून असल्यामुळे प्राप्त परस्थितीचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. पंधरा वर्षांचा काळ उलटला. काही जवळची माणसं मला म्हणू लागले. ‘तू इंटरव्ह्यू देत फिरत नाही, तुझ्यासारख्या साहित्यिकाला कोण नाकारणार?’

इंटरव्ह्यूचे सत्र सुरु झाले. एकतर वेळ निघून गेलेली. वयानेही चाळीशी पार केलेली. इतके कडूकाळे अनुभव जमा झाले की त्याने शिक्षणव्यवस्थेचं जगडव्याळ आणि आक्राळविक्राळ स्वरूप समोर आलं. जे फार भीषण आहे. शिक्षणसंस्था ह्या ज्ञानदानाचं मंदिर नव्हे तर छुप्या बाजारपेठा झालेल्या आहेत. विद्यापिठाचे पॅनलही या संस्थाना दबकून असतात की काय काही कळत नाही. शिक्षणसंस्था उमेदवार निवडते अन निवडलेल्या उमेदवारावर पॅनल गपगुमान शिक्कामोर्तब करतात. मग कशाला हवं पॅनलचं नाटक? विद्यापीठाने तो अधिकार संस्था चालकांना देऊन टाकावा म्हणजे माझ्यासारख्या भाबड्या उमेदवाराचे श्रम वाचतील! वयाची त्रेचाळीशी ओलांडलेल्या उमदेवाराने चाळीस लाख रुपये नोकरीसाठी देणं म्हणजे वेडेपणाच, तरीही ह्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी खिशात दिडकी नसतानाही एका संस्थाचालकाला मी ऑफर देऊन आलो. मग कळलं नुसते पैसेही कूचकामी आहेत वशिलाही हवा. तो काही बाजारात विकत मिळत नाही. मग नादच सोडला. फक्त इंटरव्ह्यू देत रहायचे असे ठरवले.

वर्तमानपत्रात सदर लेखन करायचो. वेगवेगळ्या स्तरांतून वाचकांचे फोन यायचे माझी मिसेस म्हणाली. “एवढे फोन तुम्हाला येतात; एखादा बरं सस्थाचालकांचा येत नाही!” फोन करणारे सृजनशील आणि भावनिक वाचक असतात. संस्थाचालक वाचक थोडेच आहेत? ते तर कधीच व्यापारी झाले! हे मी तिला कसं सांगणार?

मागे एका नामांकित संस्थेच इंटरव्ह्यूला गेला होतो. जागा एक, उमदेवार मात्र शेदोनशे. तिथे गेल्यावर एका उमदेवाराने मला ओळखलं. त्यानं इतरांना सांगितलं, जो तो माझ्याबरोबर सेल्फी काढू लागला. मी आणखीनच नर्वस झालो. माझ्यातल्या प्राध्यापकाचं मला काही वाटत नाही. मात्र साहित्यिक अशापद्धतीने समोर आला की आणखीनच त्रास होतो. पंचवीस सव्वीस वयाची ही उमदी मुले प्राध्यापक होऊ पाहणारी आणि त्यांच्या समोर आपण काय आदर्श ठेवला? की आपण अजूनही सुशिक्षित बेकार. वर साहित्य अकादमीचं बिरूद; ते मला अश्वत्थामाच्या भळभळणाऱ्या जखमेसारखं वाटतं! आता आपणच ही ‘सहायक प्राध्यापकाची’ कवचकुंडले उतरवून ठेवायची. त्याशिवाय आपली सुटका नाही या सनातन दु:खातून.

साहित्याचं भूत सोडायला तयार नाही अन भाकरीची भोकाडी ही अशी भिववत दूर पळवते आहे.

साहित्य अकादमीच्या पुरस्काराचं काय करायचं???

oviaishpate@gmail.com

लेखकाचा संपर्क - ८८३००३८३६३